Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

खान्देश मिल जमीनप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा
जळगाव / वार्ताहर

गेल्या २५ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या येथील खान्देश स्पिनींग मीलची जागा सरकार जमा करण्याची मागणी तसेच त्याजागी आय. टी. पार्कला दिलेल्या नियमबाह्य़ परवानगी बाबत तक्रार

 

करण्यात आल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. खान्देश मील कामगार युनियनचे एस. आर. पाटील यांनी या प्रकरणी ६ ऑक्टोबर २००८ रोजी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करून दोन महिन्यात निर्णय घेण्याचा आदेश दिल्याचे सांगण्यात येते. खान्देश मील ९ ऑगस्ट १९८४ रोजी बंद पडली. त्यामुळे हजारो मील कामगार देशोधडीला लागले. या २५ वर्षांच्या काळात अनेक कामगारांचे निधन झाले तर काही आजारी पडले. तरीही कामगारांना वा त्यांच्या कुटुंबियांना अद्याप हक्काची रक्कम मिळालेली नाही अशी संबंधितांची तक्रार आहे. जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी उल्हास साबळे यांनी खान्देश मील बाबत सातत्याने आंदोलने केली आहेत. राज्यात अनेक वर्षांपासून काँग्रेसचेच सरकार असताना स्वपक्षीय नेते व मंत्र्यांनीही साथ दिली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. साबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत मीलची जागा १९७१ मध्ये ९९ वर्षांच्या कराराने दिली होती. तो करार १९७८ मध्येच संपला असल्याचे निदर्शनास आणून देत १९७९ पासून या जागेवर विविध करापोटी शासनाची तीन कोटी ८१ लाख थकबाकी असल्याचे म्हटले आहे. विकास योजनेतील औद्योगिक वापर दर्शविण्यात जागांवर नियंत्रण नियमावली नुसार बांधकाम आवश्यक असताना महापालिकेने याबाबत मंजूर नकाशांना नियमबाह्य़ मंजुरी दिली असल्याचेही साबळे यांनी म्हटले आहे. बंद मीलच्या जमिनीबाबत शासकीय धोरणानुसार नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेकडे कामगारांना घरे बांधणे आदी कामांसाठी एक तृतीयांश जागा वर्ग केलेली नाही असेही तक्रारीत म्हटले आहे. या शासकीय जागेची किंमत ३५० ते ३६० कोटी असताना तसेच शासनाची करापोटी कोटय़वधीची थकबाकी असताना जळगाव महापालिकेने कोणतीही माहिती न घेता तसेच जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता मीलच्या जागी आय. टी. पार्कला परवानगी दिली. यात बेकायदा मार्गाचा अवलंब झाला असल्याचा आरोप करीत हे गंभीर व फौजदारी गुन्ह्य़ास पात्र असे कृत्य असल्याचेही साबळे यांनी म्हटले आहे.