Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

जमाते इस्लामी हिंदच्या अधिवेशनात सर्वधर्म समभावाचा नारा
धुळे / वार्ताहर

सर्व मानव समान असून कुणी गरीब-श्रीमंत, लहान-मोठा नाही. प्रत्येकाच्या हक्काचे रक्षण व्हावे, कोणत्याही प्रकाचा भेदभाव करण्यात येऊ नये, असे विचार येथे जमाते इस्लामी हिंद, महाराष्ट्रतर्फे

 

आयोजित सर्वधर्मिय खुल्या अधिवेशनात सहभागी वक्त्यांनी मांडले.
गरीबनवाज नगर येथील अलहेरा स्कूलच्या मैदानात इज्तेमा-ए-आम कार्यक्रमांतर्गत ‘नवसमाज निर्माण करू या’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना तौफिक असलम खान यांनी व्यक्तीचा खरा खुरा विकास हाच उत्कृष्ट समाजाचा विकास आणि राष्ट्र उन्नतीचे द्योतक असल्याचे सांगून समाजात स्त्रियांना सुद्धा त्यांचे अधिकार प्रदान करण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. बामसेफचे नितीन गायकवाड यांनी मुसलमानांचा बहुजन समाजात अंतर्भाव होतो असे सांगितले. धर्माच्या आधारावर कुणाला गुलाम बनविण्यात येऊ नये. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व प्रदान करणारी देशाची घटना सर्वाना समान हक्क बहाल करते, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सेवा संघाचे प्राचार्य विश्वासराव भदाणे यांनी धर्म मानवाच्या कल्याणासाठी वैचारिक रसायनाचे स्त्रोत असून माणसाने माणसाला माणसाप्रमाणे वागविले पाहिजे असे सांगितले. महेंद्र निळे यांनी वेगवेगळ्या समाजात सहयोग, प्रेम, विस्वासाची बावना, वृद्धींगत करण्यासाठी अशा प्रकारचे संमेलन अतिशय लाभदायक असल्याची भूमिका मांडली. सतीष चौधरी यांनी वाईटावर प्रतिबंध आणि चांगुलपणाचा प्रसार समाजात व्हावा ज्यामुळे सगळ्यांचे भले होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
मौलाना जैद अय्यूबी यांच्या कुराण पठणाने अधिवेशनाचा प्रारंभ झाला. महिला प्रतिनिधी फिरोगा बाजी (पुणे) अस्मा फताही (नाशिक), यूथविंगचे अब्दुल हसीन इस्मानी, जिल्हा समन्वयक आणि एस. आय. ओ. चे जिल्हा संघटक नजीन फर्जान तसेच जमाअतचे प्रदेश सचिव अतील शेख यांनी संघटनेचा उद्देश व सेवा कार्याची माहिती दिली.
दुसऱ्या सत्रात विविध विषयांवर मान्यवरांचे विचार प्रबोधन झाले. ‘मुस्लिम समाजाचे ऐक्य’ यावर मौलाना अब्दुल हमीद अजहरी, ‘इस्लामचा संदेश’ या विषयावर अब्दुल तहवाब मुहम्मदी, ‘इस्लामी परिवार आणि वस्ती’ यासंबंधी मौलाना गुलाम रसूल कादरी यांची भाषणे झाली. तत्पूर्वी, घेण्यात आलेल्या इस्लमी सामान्य ज्ञान परीक्षेतील यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी सर्वधर्म संघाचे फादर अब्राहम, अॅड. आ. जी. पाटील, आत्माराम पाटील, प्राचार्य जे. जी. खैरनार, शेख हुसैन गुरुजी आणि सुभाष अहिरे यांच्यासह नाशिक, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्य़ातील विचारवंत मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.