Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९

‘ग्रेप सिटी’ म्हणून प्रख्यात असलेल्या नाशिक व परिसरात रविवारी सायंकाळी झालेली गारपीट आणि पाऊस यामुळे काढणीवर आलेल्या द्राक्षबागा भुईसपाट होऊन कोटय़वधीचे नुकसान झाले. द्राक्षाबरोबरच अनेक ठिकाणी गव्हाचे पीक देखील आडवे झाले. याशिवाय हरभरा, कांदा व भाजीपाला या पिकांचीही गारपीट व पावसामुळे मोठी हानी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नाशिकसह सिन्नर, दिंडोरी, निफाड या भागात झालेल्या पावसामुळे तेथील पिकांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल घेऊन शासनस्तरावरून तातडीने मदत उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत आहे.

गारपिटीच्या संकटातही शोधली पुढाऱ्यांनी संपर्काची संधी
संदीप तिवारी / वणी

नाशिक जिल्ह्य़ात झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष बागायतदारांवर संकट कोसळले असताना लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांवरील हे संकटही आपल्यासाठी फायदेशीर कसे ठरेल, याचा अंदाज घेत राजकीय पुढाऱ्यांनी सोमवारी सकाळपासून बांधा-बांधावर हजेरी लावण्यात धन्यता मानल्याचे दिसून आले. महत्वाची बाब म्हणजे, मतदारसंघाची पुनर्रचना होण्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत ज्यांनी आपल्याला मतदान केले, ते मतदार या प्रक्रियेत वगळले गेल्यामुळे अशा नुकसानग्रस्तांची साधी भेट घेण्याची तसदीही काही लोकप्रतिनिधींनी घेतली नाही.

जय हो!
भाऊसाहेब : दोन दिस झाले पंचमीला, पर तुझ्या अंगावरला रंग अजून उतरला न्हाई, भावडय़ा..
भावडय़ा : यंदा रंग जरा जास्तच घट्ट होता अन् डी.जे.च्या तालावर स्वत: ‘भाऊ’ ठेका धरत असल्यानं आणखीनच उत्साहात एकमेकांना रंगवायची चढाओढ लागली होती आमची, म्हणून असेल कदाचित.
भाऊराव : रंगपंचमीला तुम्हा पोरा-टोरांमध्ये येऊन नाचायला वेळ मिळाला म्हणजे तुमच्या भाऊंच्या तिकीटाचं काही खरं नाही वाटतं ?
भावडय़ा : झालं का सुरू तुमचं राजकारणातलं पॉल्टिक्स ? अहो, आमच्यामध्ये ते नेहमी असेच मिसळतात, म्हणून तर आम्ही त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतो.

औद्योगिकीकरण हा केवळ कृत्रिमरीत्या फुगवलेला फुगाच!
प्रश्न जिव्हाळ्याचे, प्रतिनिधी / नाशिक

राज्य शासनाने मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या विभागाला सुवर्ण चतुष्कोन (गोल्डन क्वाड्रंॅगल) जाहीर केला असून मुंबई-पुणे-नाशिक ही शहरे औद्योगिकीकरणासाठी कागदोपत्री ‘ओव्हरफ्लो’ झाली असल्याचा अहवाल रंगवला गेल्यामुळे यापुढे अविकसित मराठवाडा आणि विदर्भाकडे गुंतवणूक खेचली जाईल, असा राज्यकर्त्यांचा कयास आहे. तथापि, नाशिक शहर खरोखरच औद्योगिकीकरणासाठी ‘ओव्हर फ्लो’ झाले असेल तर गेल्या काही वर्षांत रोजगार क्षमतेत किती वाढ झाली,

‘पायाभूत सुविधांकडे लक्ष देणे आवश्यक’
उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात पायाभूत सुविधांचा अभाव हा सर्वात मोठा अडथळा आहे. गेल्या पाच वर्षांपासून आपण नाशिक-मुंबई महामार्गाच्या चौपदरीकरणाविषयी ऐकतो आहोत. तो पूर्ण व्हायला अजून एक वर्ष लागणार आहे. हवाई सेवा आताशी कुठे सुरू झाली आहे. नाशिकला रेल्वे टर्मिनस नसल्याने कोणतीही गाडी या स्थानकावरून सुटत नाही. विकास प्रक्रियेत अवरोध ठरणारी ही बाब असून त्यामुळे स्थानिक प्रवाशांना मर्यादीत कोटय़ावर विसंबून रहावे लागते.

राजवाडे मंडळाच्या उपक्रमास विश्व मराठी साहित्य संमेलनात प्रतिसाद
धुळे / वार्ताहर

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणे, संस्थेच्या पुस्तकांसाठी देणगीदार शोधणे व संस्थेच्या प्रकाशनांची विक्री करणे या उद्देशासाठी अमेरिकेतील विश्व मराठी साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या येथील राजवाडे मंडळाच्या प्रतिनिधींना अपेक्षित प्रतिसाद मिळाला. मंडळाच्या काही पुस्तकांना प्रायोजकही लाभले आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा व मुख्य चिटणीस प्राचार्य डॉ. सर्जेराव भामरे यांनी दिली. राजवाडे यांच्या ग्रंथसंपदेचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील विविध विद्यापीठांमधील अभ्यासक येथे येत असतात. राजवाडे यांचे साहित्य सातासमुद्रापार जावे या हेतुने मंडळाने अमेरिकेतील विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून उपक्रम राबविला. हा उपक्रम कमालीचा यशस्वी झाला. मंडळाच्या काही पुस्तकांना प्रायोजकही लाभले. कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथील अशोक काकडे व नेहा काकडे यांनी ‘शिवाजी महाराजांची राजनिती’ या पुस्तकाच्या पुर्नप्रकाशनासाठी ५५ हजार रूपयांची मदत केली. याशिवाय काहींनी सुमारे एक हजार डॉलपर्यंत देणगी देऊन उपक्रमाला प्रोत्साहन दिले. मंडळाच्या काही प्रकाशनांची विक्रीही झाली. मंडळाच्या स्टॉलला अनेक मान्यवरांनी भेट देऊन त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रस्तावास वीजग्राहक समितीचा विरोध
नाशिक / प्रतिनिधी

शहर भारनियमनमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वीज दरवाढ प्रस्तावास वीज ग्राहक समितीने विरोध केला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स जादा दर वीज कंपनीस देऊन अधिक वीज मिळविण्यासाठी वितरण कंपनीस प्रस्ताव देण्याच्या विचारात आहे. शहरात वीज दरवाढ करण्याच्या या प्रस्तावास वीज ग्राहक समितीने विरोध करण्याचे ठरविले असून ग्राहकांनी या संदर्भात करण्यात येणाऱ्या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन वीज ग्राहक समितीतर्फे करण्यात येत आहे. शहरात शुन्य भारनियमनाची अमलबजावणी करण्यासाठी कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ग्राहकांनी ९५ टक्के पेक्षा जास्त वीज बिलाचे पैसे देय तारखेच्या अगोदर भरण्यासाठी आग्रह धरावा, कारण ग्राहक सध्या ९५ टक्के बिलाचे पैसे भरीत आहेत. तसेच सर्व झोपडपट्टय़ांमध्ये एक हजार रूपयांत नियमित वीज कनेक्शन द्यावे. म्हणजे शहरातील वीज गळती २५ वरून २० टक्क्यांपर्यंत कमी होईल. त्यामुळे शहरात शुन्य भारनियमनाची अमलबजावणी कायद्यानुसार होईल व त्यासाठी ग्राहकांकडून जादा पैसे घेण्याची वेळ येणार नाही, असे वीज ग्राहक समितीने म्हटले आहे. वीज कंपनी व महाराष्ट्र चेंबरच्या या ग्राहक विरोधी धोरणास ग्राहकांनी लेखी पत्र लिहून विरोध करावा किंवा ९४२२२६६१३३, ९८८१०८००१३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वीज ग्राहक समितीतर्फे अॅड. मुकुंद बुब, अॅड. अमोल पाचोरकर, मधुकर कुऱ्हाडे, शंकरराव मुळे, अनिल नांदोडे, नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचे विलास देवळे यांनी केले आहे.

‘लघुउद्योग भारती’तर्फे आज नाशिकमध्ये महिलांचा सत्कार
प्रतिनिधी /नाशिक

येथील लघुउद्योग भारती शाखेतर्फे २१ व्या शतकातील विविध क्षेत्रातील महिलांच्या कर्तृत्वाचा व भरीव कामगिरीची समाजाला ओळख व्हावी या हेतुने, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग, अर्थशास्त्र, विधी, सरकारी अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्र्यंबकरोड येथील इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनियर्स मध्ये मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती, लघुउद्योग भारतीच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष डी. जी. जोशी यांनी दिली. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर हा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृदुला फडके, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य डॉ. एम. एस. गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.