Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९

उद्योगांपुढेही प्रश्न पाण्याचाच
प्रश्न जिव्हाळ्याचे, वार्ताहर / धुळे

जिल्ह्य़ाची भौगोलिक स्थिती उत्तम आहे, जमिनीची प्रतवारीही तेवढीच उत्तम आहे. पण गरज आहे ती सिंचनाची. सिंचनाच्या मुद्यांवर सर्वच राजकीय नेते जाहीर कार्यक्रमात भाषणाची संधी मिळाल्यास तोंडसुख घेतात. पण, त्यामुळे मूळ प्रश्न काही सुटत नाहीत. निवडणूक आली की सिंचनासोबतच औद्योगिक विकासाचे प्रश्न चर्चेत येतात, त्यावर तोडगा काढण्याचे मार्गही सुचविण्यात येतात. पण, प्रत्यक्षात घोषणा पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जात नाही. पश्चिम महाराष्ट्राची प्रगती झाली ती अधिकाधिक प्रमाणात सिंचनामुळेच. सिंचन हा विकास प्रक्रिया गतीमान होण्यासाठी महत्वपूर्ण निकष असला तरी त्याचे महत्व लोकप्रतिनिधींनी कधी जाणून घेतलेले नाही. परिणामी, पाण्याच्या उपलब्धतेअभावी येथे उद्योगांची उभारणीही होऊ शकलेली नाही.

रोजगार उपलब्ध होण्याची ‘रोहयो’ मजुरांना आशा
वार्ताहर / धुळे

रोज काम मिळत नाही, मिळालेच तर ते किमान वेतनही मिळू शकणार नाही इतपत, पेमेंट न मिळणे, दारिद्र्यरेषेखाली येणाऱ्यांना शिधापत्रिका नाहीत अशा विविध स्वरूपाच्या व्यथांचा पाढा मजुरांनी विधी प्राधिकरणासमोर वाचला आणि मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीशांसह सर्वाच्या भुवया उंचावल्या. श्रमिकांच्या कल्याणासाठीची रोजगार हमी योजना नेमकी कशी राबविली जात आहे याचा लेखाजोखा दिडशे मजुरांच्या उपस्थितीत आणि विधी प्राधिकरणाच्या न्यायाधीशांसमोर सादर झाल्यानंतर प्राधिकरणाने हे सारे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे.

रावेरमध्ये काँग्रेसपुढे बंडखोरी टाळण्याचे आव्हान
घडामोडी, जळगाव / वार्ताहर

जिल्ह्य़ातील रावेर लोकसभा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाटय़ाला येणार हे जवळपास निश्चित झाले असून उमेदवारीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. एकाला उमेदवारी मिळाल्यावर इतर नाराज इच्छुकांचा फटका काँग्रेसला बसत असल्याचे याआधीही दिसून आले असून ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. उमेदवार अजुनही जाहीर न करण्यामागे हे एक कारण असल्याचे सांगण्यात येते.

धुळ्यात काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी
धुळे / वार्ताहर

सर्वच पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले असून स्वत:च्या भागातही प्रभाव पाडू न शकलेल्या पदाधिकाऱ्यांनीही लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिल्याचा फायदा तिकीट मिळविण्यासाठी होऊ शकतो असे या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. दरम्यान युतीच्या जागा वाटपात मतदार संघ भाजपकडेच राहिल्याने उमेदवारीसाठी इच्छुक अधिक जोमाने कामाला लागले आहेत. धुळे लोकसभा मतदार संघाने बहुतांश वेळा काँग्रेसची साथ केली असल्याने या पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. इतर राजकीय पक्षांना मतदार संघाचे एकूण क्षेत्रफळ पाहून सर्वत्र प्रभाव असणाऱ्या उमेदवाराचा शोध घेणे म्हणजे एक आव्हान झाले आहे. परंतु पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या धुळ्यात काँग्रेससाठी ती अडचण नाही. त्यामुळेच की काय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेले काँग्रेसचे विद्यमान ग्रामीण जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनीही उमेदवारीसाठी तयारी सुरू केल्याचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. सनेर यांच्या या प्रयत्नांना खो घालण्याचे काम पक्षातीलच त्यांच्या विरोधकांनी सुरू केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला कोणत्या भागातून प्रतिसाद लाभला, स्वत:च्या विधानसभा मतदार संघातील किती गण आणि गटांमध्ये काँग्रेसने बाजी मारली, दस्तूरखुद्द सनेर हे तरी निवडणूक जिंकले का, असे प्रश्न विचारले जात आहेत. सनेर यांच्या कार्यकाळात काँग्रेसच्या सत्तास्थानांमध्ये वाढ होण्याऐवजी शिंदखेडा व धुळे पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यातून गेली. राष्ट्रवादीने साक्री पंचायत समितीवर हक्क सांगितला. केवळ शिरपूर पंचायत समिती काँग्रेसकडे राहू शकली, ती कुणामुळे, याचे आत्मपरीक्षण सनेर यांनी करावे, असे सल्ले दिले जाऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत शिरपूरचे भाग्यविधाते म्हणून प्रसिध्द असलेले अमरिश पटेल, माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यामध्येच उमेदवारीसाठी अधिक चुरस आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद प्रथमच युतीकडे येण्यात महत्वपूर्ण भूमिका बजाविणारे शिवसेनेचे नेते सुभाष भामरे व बागलाणचे प्रतापदादा सोनवणे यांपैकी एकास भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सोनवणे यांना धुळे जिल्ह्य़ात कितपत प्रतिसाद मिळेल, याविषयी साशंकता असून भामरे हे जरी सेनेत असले तरी धुळे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात तसेच नाशिक जिल्ह्य़ातही असलेले त्यांचे संबंध लक्षात घेता त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली तर त्याचा फायदा होऊ शकतो, असा भाजपमध्येच मतप्रवाह आहे.

अमळनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींची २५ मार्च रोजी निवडणूक
अमळनेर / वार्ताहर

तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींची निवडणूक २५ मार्च रोजी होणार असून अंतुर्ली येथे स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण व्हावी या कारणासाठी कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. १४ पैकी ११ गावांमध्ये सार्वत्रिक तर तीन ग्रामंपचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत. २६ मार्चला या या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. कुऱ्हे, खडके, अंतुर्ली, मालपूर, लोणसीम, लोण बुद्रक, तरवाडे, दहिवद, हिंगोणी बुद्रक, निसर्डी या ११ गावांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तर पातोंडा, पिळोदा, पिंप्री या तीन ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.