Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

महिलांचा दारुगुत्त्यावर हल्ला
पुणे, १६ मार्च/प्रतिनिधी

आंबेगाव पठार येथे चालणाऱ्या अवैध दारूच्या गुत्त्यांवर परिसरातील सुमारे तीनशे ते चारशे महिलांनी आज सकाळी ‘हल्लाबोल’ केला. स्थानिक नगरसेविका वर्षां तापकीर यांच्या पुढाकाराने झालेल्या या ‘कारवाईत’ चार दारूचे गुत्ते उद्ध्वस्त करण्यात आले. हे गुत्ते चालविणाऱ्या तीनजणांविरुद्ध हवेली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
दारूच्या व्यसनापोटी संसाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या पतीने काल रात्री आंबेगाव पठार येथील एका

 

महिलेला शिवीगाळ व मारहाण केली. दररोज घरोघरी घडणाऱ्या या प्रकाराला कंटाळून अखेर महिलांनी यावर काहीतरी तोडगा काढण्याचा निश्चय केला. नगरसेविका वर्षां तापकीर यांनी पुढाकार घेऊन परिसरातील तीनशे ते चारशे महिलांना एकत्र केले व आज सकाळी या दारूच्या गुत्त्यांवर ‘हल्लाबोल’ केला. रोहित, विशाल आणि विकास कुंभार या तिघांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांनी दिली.
आंबेगाव पठार येथील ‘वॉर्ड क्रमांक १३३’मध्ये अवैध दारूच्या गुत्त्यांबाबत वारंवार तक्रार करूनही पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नव्हती. काल रात्री दारूच्या नशेत असलेल्या पतीने आपल्या पत्नीला मारहाण केल्यानंतरही पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्यात आली. मात्र गुत्त्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पोलिसांनी ‘दारूचे गुत्ते सापडले नाहीत’ असे कारण देऊन त्याकडे दुर्लक्षच केले. गुत्ते चालविणाऱ्यांच्या दहशतीमुळे आजपर्यंत त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्याचे परिसरातील नागरिक टाळत होते, तसेच पोलिसांकडूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते, अशी माहिती नगरसेवक भीमराव तापकीर यांनी दिली.
संतप्त महिलांनी एका दारूच्या गुत्त्याची पत्र्याची शेड पाडली. त्यावेळी तेथे चाळीस लीटर क्षमतेचे सुमारे दहा ‘कॅन’ होते. हे कॅन जमिनीमध्ये, तसेच चादरी व ब्लँकेट टाकून लपविण्यात आले होते. त्यातील सहा ते सात कॅन महिलांनी पेटवून दिले. दारूने भरलेल्या काही प्लॅस्टिकच्या पिशव्याही या वेळी महिलांना सापडल्या. दारू ओतून दिल्यामुळे, तसेच कॅन पेटविल्यामुळे संपूर्ण परिसरात दारूचा वास पसरला होता. यानंतर काही वेळाने हवेली पोलीस तेथे पोहोचले व त्यांनी पंचनामा केला, असे तापकीर यांनी सांगितले. हवेली पोलिसांकडे असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे परिसरातील दारूच्या गुत्त्यांवर कठोर कारवाई करण्यास वेळ लागत असल्याचे निरीक्षक पाटील यांनी सांगितले.
आंबेगाव पठार परिसरासाठी एक हवालदार व एक कॉन्स्टेबल असे अपुरे मनुष्यबळ हवेली पोलिसांकडे आहे, असे पाटील म्हणाले. मात्र महिलांनी बंद पाडलेले दारूचे गुत्ते पुन्हा सुरू झाल्यास हवेली पोलिसांसह पोलीस अधीक्षक रवींद्र कदम यांच्या कार्यालयासमोर निदर्शने व आंदोलन करण्याचा इशारा तापकीर यांनी दिला आहे.