Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘‘दादांचा फोन आहे..’’
निवडणुकीच्या प्रचाराची सभा असो, कार्यकर्त्यांचा मेळावा असो किंवा छोटी बैठक असो, सतत वाजणारे मोबाईल आणि त्यामुळे कार्यक्रमात येणारा व्यत्यय हा आता नित्याचाच झाला आहे. शिरूर तालुक्यातील एका गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची अशीच एक बैठक एका स्थानिक

 

नेत्याने नुकतीच घेतली होती. त्यात एका कार्यकर्त्यांचा मोबाईल असाच सारखा वाजत होता आणि निवडणूक तोंडावर आल्याने अगदी लहान कार्यकर्ताही दुखावला जाता कामा नये, यासाठी तो फोन घेतही होता. बैठकीत सारखा व्यत्यय येऊ लागल्याने बैठक घेणारे हे नेते त्रस्त झाले. त्याने सारखा मोबाईल येणाऱ्या त्या कार्यकर्त्यांला बजावले, आता फोन घेऊ नका. त्यानंतर त्याचा मोबाईल काही वेळ शांत राहिला, पण काही वेळाने पुन्हा तो वाजला. सर्वाचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्याने फोन कोणाचा ते वाचले आणि शांतपणाने म्हणाला, ‘‘दादांचा फोन आहे, घेऊ का नको?’’.. याच्यावर त्या त्रस्त नेत्याकडे उत्तरच नव्हते, तो काय बोलणार?. त्यामुळे ऐटीत त्या कार्यकर्त्यांने फोन घेतला आणि फोनवर तो बोलू लागला. आता दादा म्हणजे कोणते दादा, हे मात्र शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहिले!
तुम्ही तर मुख्यमंत्रीच आहात..’
‘तुम्ही तर मुख्यमंत्रीच आहात, आता तुम्हाला खासदार व्हायचे आहे का’, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले उमेदवार माजी आमदार पोपटराव गावडे यांना हा प्रश्न केला आणि बैठकीत एकच हशा पिकला. झाले असे होते की, गावडे यांनी ‘ऑक्सिजन’ चित्रपटात मुख्यमंत्र्यांची भूमिका केली होती. त्याचा संदर्भ देत पवार म्हणाले की, तुम्ही मुख्यमंत्रीच आहात. त्यांचीच री ओढत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले, ‘मी तर केवळ उपमुख्यमंत्रीच झालो आहे, तुम्ही तर मुख्यमंत्री झाला आहात.’ नेत्यांनी केलेल्या या टिप्पणीमुळे झालेल्या हशामध्ये गावडेही सहभागी झाले. मात्र त्यांनी केलेले मुख्यमंत्रिपदाचे काम त्यांच्या ‘क्वॉलिफिकेशन’मध्ये जमेची बाजू ठरणार की नाही, हा संभ्रम मात्र त्यांना पडला असणार.
यमकवीर कार्यकर्ते
निवडणूक म्हटली म्हणजे प्रचारसभांची रणधुमाळी आलीच. मग एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणे स्वाभाविक. प्रतिस्पध्र्यावर टीकेची झोड उठवितानाच आपल्या नेत्यांची भलामण करण्यासाठी कार्यकर्ते कोण शक्कल लढवितात. आता कालची नरेंद्र मोदींचीच सभा घ्या. ‘देखो कौन आया, कौन आया.. गुजरात का शेर आया’ अशा घोषणांमध्ये मोदींचे स्वागत करण्यात आले. आचारसंहिता लागू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘देश की आँधी, राहुल गांधी’ अशा घोषणांनी राहुल गांधींचे काँग्रेस भवनामध्ये पदार्पण झाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व भावी पंतप्रधान म्हणून संबोधिण्यात आलेले शरद पवार हेही या यमकवीर कार्यकर्त्यांच्या तावडीमधून सुटले नाहीत. मोदींच्या सभेमध्ये पवारांना वक्तयांनी लक्ष्य केले नि कार्यकर्त्यांना जणू स्फुरण चढले. पवार कुठून उभे आहेत.. माढामधून. मग झाले ‘माढा’ला यमक जुळविण्यात आले नि घोषणा दुमदुमली.. माढा, माढा.. पवारांना पाडा! कार्यकर्त्यांची ही घोषणा गोपीनाथ मुंडे यांनी उचलून धरली आणि आपल्या भाषणामध्ये पवारांना पाडण्यासाठीचा हा नारा देऊन मोकळेही झाले.