Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आठवले यांना तिकीट न मिळाल्यास ४८ जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार
पिंपरी, १६ मार्च / प्रतिनिधी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा फुटबॉल झाला असून त्यांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे आठवले समर्थक संतापले आहेत. शिर्डी लोकसभेसाठी आठवले यांना ‘तिकीट’ न मिळाल्यास राज्यातील ४८ लोकसभा

 

मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार िरगणात उतरवून आपले उपद्रवमूल्य दाखविण्याचा इशारा पक्षाने आज दिला आहे.
मित्रपक्षांना जागा देऊन उर्वरित मतदारसंघांचे दोन्ही काँग्रेस पक्षात वाटप करावे, अशी सूचना करीत राष्ट्रवादी काँग्रेसने रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, काँग्रेसकडून ती फेटाळण्यात आली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या शहकाटशहाच्या राजकारणात आठवले यांच्या राजकीय भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आठवले समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आपले उपद्रवमूल्य दाखवून देण्याच्या हेतूने राज्यभरातील ४८ मतदारसंघात शड्डू ठोकण्याचा इशारा दिला आहे.
पक्षाच्या नगरसेविका तसेच आरपीआय महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे यांनी आज पत्रकारांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. संपूर्ण महाराष्ट्रात रिपाई मतांवर काँग्रेस आघाडी सत्तेवर येते. आरपीआयची मते घेऊन सत्ता मिळवायची आणि नंतर पक्षाला विसरुन जायचे, ही दोन्ही काँग्रेसची नीती आहे. आठवले यांना शिर्डी मतदारसंघ सोडण्याची दोन्हीही काँग्रेसची तयारी नाही. या सर्व घडामोडीत आठवले यांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे. त्यामुळे आठवलेंना उमेदवारी नाकारल्यास राज्यातील सर्व जागा लढवून आपली ताकद दाखवून देण्याचा इशारा सोनकांबळे यांनी दिला आहे.