Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पथकाचा पाठलाग चुकविणाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
बारामती, १६ मार्च/वार्ताहर

गुडमॉर्निग पथकाचा पाठलाग चुकविण्यासाठी पळत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन

 

एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सुपे (ता. बारामती) येथे घडली.
सुनील गोविंद जाधव (वय ४८, रा. सुपे, ता. बारामती) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आकस्मित निधन म्हणून नोंद करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबतची माहिती अशी की, आज सकाळी सुपे या ठिकाणी उघडय़ावर शौचालयासाठी तेथील स्थानिक गेलेले असताना गुडमॉनिर्ंग पथकाने त्या व्यक्तींना शौचालयासाठी बसण्यास विरोध दर्शविला, दरम्यान काही व्यक्ती त्या ठिकाणी बसल्याचे आढळून आल्यामुळे गुडमॉर्निग पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला. या दरम्यान सुनील गोविंद जाधव हे पळत कसेबसे घरापर्यंत पोहोचले. परंतु गुडमॉर्निग पथकानी पाठलाग सुरूच ठेवला होता. ते पथक पाठीमागे येत आहे याची जाणीव सुनील जाधव यांना होती. जाधव हे हृदयविकाराचे रुग्ण होते. यापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता, त्यानंतर आज त्यांची दमछाक होऊन छातीवर दडपण आल्याकारणामुळे सौम्य हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळेच त्यांचे निधन झाले असावे, अशी प्रतिक्रिया वडगाव िनबाळकर येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. पी. पाटील यांनी दै. लोकसत्ताला दिली. या घटनेमुळे सुपे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. घटनास्थळी पोलीस पथक गेल्यामुळे तणावपूर्ण शांतता आहे. बारामती संपूर्ण निर्मलग्राम व्हावे यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. परंतु सुपे हा परिसर अत्यंत दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, या परिसरामध्ये ऐन उन्हाळ्यामुळे तीव्र पाणी टंचाई भेडसावते, तेथील नागरिक, ग्रामस्थ उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईला तोंड देत असतात. दुष्काळी भाग असल्यामुळे तेथील अनेक व्यक्तींचे उत्पन्नसुद्धा अत्यल्प आहे. या परिस्थितीत पाणी टंचाईच्या काळात शौचालयासाठी पुरेसे पाणी ते देऊ शकत नाहीत. परिणामी अनेक वेळेला पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागते. आज घडलेल्या या घटनेमुळे प्रथम मूलभूत सुविधा उपलब्ध करा आणि नंतर कारवाईचा विचार करा, अशी प्रतिक्रिया तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.