Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

उरळीची आग थांबविण्यासाठी कचऱ्यात प्लॅस्टिक टाकू नका
पुणेकरांना महापौरांचे आवाहन
पुणे, १६ मार्च/प्रतिनिधी

पुणेकरांनी कचरा टाकताना किमान प्लॅस्टिक वेगळे करण्याची खबरदारी रोज घेतली, तरी उरळी कचरा डेपोत वारंवार उद्भवणारे आगीचे प्रकार थांबतील. याचा पुणेकरांनी गांभीर्याने विचार करून कचऱ्यातून प्लॅस्टिक वेगळे करावे, असे आवाहन महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी केले आहे.

 

दरवर्षीप्रमाणे उन्हाची झळ वाढताच उरळी कचरा डेपोत गेल्या वीस वर्षांपासून साठलेल्या कचऱ्याच्या डोंगराला खालून आग सुरू झाली असून, ती विझविण्याचे प्रयत्न अग्निशामक दलातर्फे अव्याहतपणे सुरू आहेत. उरळी येथे जाऊन आज महापौरांनी आगीची पाहणी केली. अनंता भाडळे, बहिरू भाडळे, काका झांबरे, आबा सातव, माऊली भाडळे आदी ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
या ठिकाणी दोनशे एकर जागेवर आठ ते दहा लाख टन कचऱ्याचा डोंगर असून, उन्हाळ्यामुळे या कचऱ्याच्या डोंगरात मिथेन हा वायू तयार होण्याची प्रक्रिया वेगाने होते. कचऱ्यात मोठय़ा प्रमाणावर प्लॅस्टिक असल्यामुळे मिथेन वायूला हे आयते इंधन मिळते. त्यामुळे आग आटोक्यात आणणे अवघड होते, असे महापौरांनी सांगितले.
रोज टाकल्या जाणाऱ्या घरगुती कचऱ्यात किमान प्लॅस्टिक जाणार नाही याची काळजी घेतली, तरी आगीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्यासाठी पुणेकरांनी रोजचा कचरा टाकताना प्लॅस्टिक वेगळे करूनच कचरा टाकावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
कचरा डेपो सुधारण्याची दहा कोटींची कामे महापालिकेतर्फे सुरू असून, त्यातील अनेक कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात प्रामुख्याने स्थानिक गावांसाठी वैद्यकीय सुविधा केंद्र, आरोग्य केंद्र उभारणी, ‘लिचड’ वाहून नेण्यासाठी ड्रेनेज लाईन, शुद्ध पाण्यासाठी टाक्यांची बांधणी, पाणीपुरवठय़ासाठी जीवन प्राधिकरणाचे साहाय्य, दैनंदिन अकराशे टन क्षमतेच्या तीन कचरा प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी, कचरा डेपोभोवती पंधरा फूट उंचीची भिंत, कायमस्वरूपी अग्निशमन यंत्रणा अशी अनेक कामे व योजना उरळीसाठी सुरू केल्या असून, ही कामे प्रगतिपथावर असल्याचे महापौरांनी सांगितले.
कचरा प्रक्रिया प्रकल्पात सध्या यशस्वीरीत्या काम सुरू असून, येत्या सहा महिन्यांत हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील, तसेच शहरात कचऱ्यापासून वीज व गॅस तयार करण्याचे छोटे प्रकल्प उभारण्याचीही योजना असल्याचे त्या म्हणाल्या.