Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘परवडणारी सेवा देणे ही रुग्णसंस्थांची जबाबदारी’
पुणे, १६ मार्च / प्रतिनिधी

‘‘भारतासारख्या विकसनशील देशात नैतिकतेचे भान ठेऊन उच्चदर्जाची रुग्णसेवा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करणे ही रुग्णसंस्थांची जबाबदारी आहे’’, असे मत उद्योगपती

 

खासदार राहुलकुमार बजाज यांनी व्यक्त केले.
पुना हॉस्पिटल अ‍ॅन्ड रीसर्च सेंटरच्या रौप्यमहोत्सवी वर्षांरंभाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. रुग्णालयाचे व्यवस्थापकीय विश्वस्त राजकुमार चोरडिया यांनी स्वागत केले. देवीचंद जैन, हसमुख शहा, अभय छाजेड आदींची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती व संस्थेचे विश्वस्त रसिकलाल धारिवाल होते. कोणत्याही संस्थेने पंचवीस वर्षांची वाटचाल केली म्हणजे ती आपल्या उद्दिष्टपूर्तीकडे यशस्वी वाटचाल करत आहे, असे समजावे. पुण्यातील गुजराथी, मारवाडी समाजाने एकत्र येऊन व समर्पित भावनेने स्थानिक लोकांना उच्च दर्जाची रुग्णसेवा देणारी संस्था चालवली आहे. प्रांतवाद निर्माण करणाऱ्यांसमोर हे एक आदर्श उदाहरण ठरावे, असे खासदार राहुलकुमार बजाज यांनी सांगितले. रुग्णसेवेचा दर्जा, कुशल व समर्पित कर्मचारी वर्ग, रास्त दर, स्वास्थ, संवर्धनासाठी प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन व संशोधन ही आदर्श रुग्णालयाची पंचसूत्री असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रुग्णांना चांगल्या दर्जाची सेवा देण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान सामग्रीसाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. रुग्णालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षांत संस्थेतर्फे विविध संकल्प करण्यात येत आहे. दरमहा स्वास्थ प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन, २५ ते ५० वयोगटातील २४ रुग्णांच्या हृदय शस्त्रक्रिया प्रत्येकी २१ हजार रुपयात, न्यूरो व कान नाक आणि घसा आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन, खाटांची क्षमता ३५० वाढविणे, नर्सिग क ॉलेजची सुरूवात व स्वतंत्र नेत्रोपचार केंद्र उभारणे आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे चोरडिया यांनी यावेळी सांगितले. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष व प्रमुख संस्थापक मुकुंददास लोहिया यांनी लोहिया परिवाराच्या वतीने दोन कोटींची देणगी जाहीर केली. संचालक डॉ. श्रीमती जे. रवींद्रनाथ यांनी रुग्णालयाचा आढावा घेतला. डॉ. जगदीश हिरमेठ, डॉ. सुधीर कोठारी, डॉ. विनय थोरात व डॉ. राजन कोठारी यांनी मनोगते व्यक्त केली.