Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आगाऊ वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना अखेर एक टक्का सवलतीचा निर्णय
पुणे, १६ मार्च/ प्रतिनिधी

वीजबिल देण्याच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत त्याचा भरणा केल्यास मिळणारी एक टक्का सवलत यापुढे आगाऊ बिल भरणाऱ्या ग्राहकांनाही मिळेल, अशी माहिती यासंदर्भात तक्रार दाखल

 

केलेल्या सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांना महावितरणकडून कळविण्यात आली आहे. मात्र, ही सवलत लागू असलेल्या कालावधीपासून या ग्राहकांना त्याचा लाभ द्यावा, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.
सात दिवसांच्या आत विजेचे बिल भरणाऱ्या ग्राहकांना एक टक्का सवलत देण्याचे आदेश राज्य वीज नियामक आयोगाने २००७ मध्ये दिले आहेत. त्यानुसार येणाऱ्या बिलाप्रमाणे रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना त्याचा लाभ देण्यात येत आहे. मुळात बिल काढल्याच्या तारखेपासून सात दिवसात ते ग्राहकांच्या हातात पडतच नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. मात्र, वेळेत ज्यांच्या हातात बिले पडतात त्यांना ही सवलत मिळते. अशा परिस्थितीत आगाऊ बिल भरणाऱ्या ग्राहकांना मात्र महावितरणच्या यंत्रणेतील त्रुटीमुळे या सवलतीपासून वंचित राहावे लागत होते.
या संदर्भात वेलणकर यांनी वेळोवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी दिल्या. त्यावर नुकतेच वेलणकर यांना महावितरणकडून पत्र मिळाले आहे. आगाऊ बिल भरणाऱ्यांना यापुढे ही सवलत सुरू होईल, असे त्यात म्हटले आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून अनेकांना ही सवलत मिळालेली नाही. याचा विचार करून यापुढेच नव्हे, तर दोन वर्षांपासून आगाऊ बिल भरलेल्या ग्राहकांनाही या सवलतीचा फायदा मिळावा, अशी मागणी वेलणकर यांनी मांडली आहे.