Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

साखळीचोर, बॅग पळविणाऱ्या तरुणांना अटक
पुणे, १६ मार्च / प्रतिनिधी

बंडगार्डन व कोरेगाव परिसरात ‘बॅग लिफ्टिंग’ व साखळी चोरी करणाऱ्या तीन सुशिक्षित तरूणांना

 

पोलिसांनी अटक केली. गेल्या तीन महिन्यात चोरी झालेल्या मोबाईलच्या ठिकाणांबद्दल विविध मोबाईल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बंडगार्डन पोलिसांनी या चोरटय़ांना पकडले.
राहुल याच्याकडे असलेल्या मोटारसायकलवरून फिरून रात्रीच्या वेळी कोरेगाव पार्क व बंडगार्डन परिसरातून रिक्षा किंवा अन्य वाहनांवरून जाणाऱ्या मुलींच्या हातातील पर्स, बॅग हिसकावून चोरी करण्याची गुन्हेपद्धती त्यांनी अवलंबविली होती. त्यांच्याकडून उघडकीस आलेल्या दोन गुन्ह्य़ांतून एक ‘ब्लॅकबेरी’ मोबाईल, गुन्ह्य़ासाठी वापरण्यात येणारी मोटारसायकल व अन्य ऐवज पोलिसांनी जप्त केला. सिगारेट, दारू व ‘पार्टी’ करण्यासाठी हे चोरटे चोरी करत असत. तसेच, त्यांचे पालक हे खासगी कंपन्यांमध्ये उच्चपदांवर नोकरीस असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
‘डिप्लोमा इन हार्डवेअर अँड नेटवर्किंग’ केलेला राहुल विलास सूर्यवंशी (वय २५, रा. सिद्धार्थनगर, धानोरी), ‘डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स’ झालेला अजितकुमार जगदिश दहीनवार (वय २२) आणि बारावी उत्तीर्ण झालेला महिंद्र कुंदलराव साटला (वय २२, दोघे रा. लोहगाव) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. बंडगार्डन ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास नाडगौडा, पोलीस उपनिरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
घोरपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरी झालेला एका मोबाईलचा ठावठिकाणा बारा मार्च रोजी पोलिसांना मोबाईल कंपनीकडून समजला. तो मोबाईल राहुल वापरत होता. राहुल याला ताब्यात घेतल्यानंतर अजितकुमार व महिंद्र यांची नावे निष्पन्न झाली.