Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

संत तुकाराम, संत रामदासांवर लवकरच ग्रंथ
राज्य संस्कृती मंडळाचा उपक्रम
पुणे, १६ मार्च/ प्रतिनिधी

‘‘संत तुकाराम महाराज आणि संत रामदास यांच्या जन्मचतु:शताब्दीनिमित्त दोन ग्रंथांचे लवकरच

 

प्रकाशन करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी आज येथे दिली. १९५० साली प्रकाशित झालेली संत तुकाराम यांची गाथा ही अल्प किमतीत वाचकांना सहज उपलब्ध करण्याचा मनोदय ही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने देण्यात येणारा कलावंत गौरववृत्ती पुरस्कार शाहिरा अनसुयाबाई शिंदे तसेच साहित्यिक डॉ. स. रा. गाडगीळ यांना प्रदान करण्यात आला. डॉ. गाडगीळ यांच्या वतीने त्यांच्या चिरंजीवांनी मानपत्र स्वीकारले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. रोख पन्नास हजार रुपये, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी नवलेखक पुरस्कार तसेच दिवाळी अंकाच्या स्पर्धेच्या पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. पुरस्कारार्थी अर्जुन देशमुख, प्रभाकर तांबट आणि अशोक कोठावळे यांनी मनोगते व्यक्त केली. परीक्षक राजन खान यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक फ. मु. शिंदे यांनी शिंदे यांच्या मानपत्राचे वाचन केले.
विविध उपक्रम राबविण्यामागील राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची भूमिका मधु मंगेश कर्णिक यांनी विशद केली. ते म्हणाले, ‘‘साहित्य, संस्कृतीचे जतन करण्याचे मंडळाचे काम आहे. महाराष्ट्रातील पहिली महिला शाहिरा अनसुयाबाई शिंदे या सन्मानापासून वंचित राहिल्याने त्यांचा गौरव करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. नवलेखक योजनेद्वारे नामाकिंत लेखक आज पुढे आल्याचे दिसते. चांगले उपक्रम, कामगिरीकडे शासनाचे लक्ष असते हे यातून दिसून येते. संत तुकाराम महाराज यांना चारशे वर्ष पूर्ण होत असल्याने त्यांच्या १९५० साली प्रकाशित झालेली गाथा लवकरच अल्प किमतीत उपलब्ध केली जाणार आहे. तसेच त्यांच्यावरील ग्रंथाचे प्रकाशन केले जाणार आहे. संत रामदास यांच्या जीवन, तत्त्वज्ञान व साहित्याबद्दलचा प्रकल्प सुनील चिंचोलकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्याचेही लवकरच प्रकाशन केले जाणार आहे. या दोन्ही उपक्रमांद्वारे संतांना अभिवादन करण्याचा मंडळाची इच्छा आहे.’’
यावेळी पुरस्काराला उत्तर देताना शाहिरा अनसुयाबाई शिंदे यांनी पारंतत्र्यातील आणि स्वातंत्र्यांनंतरच्या संघर्षांची आठवण करून देत त्यावेळच्या कार्याची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘ सामान्य लोकांसह सुशिक्षितांना आपलसं करण्याची ताकद ही शाहिरीमध्ये आहे. त्यामुळे सर्वानाच या कलेची गोडी लागते. आपण जग जिंकायला निघालेली माणसे आहोत. आपल्या कार्याची दखल साहित्य मंडळाने घेतली याचा आनंद वाटला.’’ मंडळाच्या सचिव गौरी देशमुख यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.