Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आमदार लांडे यांच्याकडून पत्रकारांना घडय़ाळे;
भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार
पिंपरी, १६ मार्च / प्रतिनिधी

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार आमदार विलास लांडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारांना सोनाटा कंपनीची किमती घडय़ाळे वाटून आचारसंहितेचा भंग केला आहे,

 

त्याची चौकशी करून कडक कारवाईची मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजपाने केली आहे.
या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धिपत्रावर प्रदेश भाजपाचे कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब गव्हाणे,शहर अध्यक्ष भगवान मनसुख व सरचिटणीस नगरसेवक एकनाथ पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आमदार लांडे यांनी शनिवारी रात्री त्यांच्या चाकण येथील ऑटोलाईन या कारखान्यात मतदारसंघातील २५० ते ३०० पत्रकारांसाठी स्नेहभोजनाचा बेत ठेवला होता. या वेळी उपस्थित पत्रकारांना त्यांनी महागडी मनगटी घडय़ाळे वाटली. हा सरळ सरळ निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे. या संदर्भात भाजपाने आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल केली असून चौकशीची मागणीही केल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
या वार्तालाप कार्यक्रमात लांडे यांनी निवडणुकीच्या तयारीबद्दल माहिती दिली. बहुतेक वृत्तपत्रांतून ती छापून आली. लांडे यांना अद्याप कोणतीही अधिकृत उमेदवारी नाही अथवा त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केलेला नसला, तरी देखील पत्रकारांना प्रलोभन दाखविण्याचा हा प्रकार आचारसंहितेचा भंग आहे, अशी भाजपाची तक्रार आहे.
अभिनेता संजय दत्त व माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यांनी होळीच्या दिवशी पैसे वाटले म्हणून निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली व कारवाई सुरू केली. त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने लांडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे.
खासदार शिवाजी आढाळराव यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांमुळे त्यांना उमेदवारी मिळणार व ते निवडूनही येणार हे निश्चत असल्याचा दावाही या पत्रकात केला आहे. कामाच्या जोरावर निवडणूक लढविणे शक्य नसल्याने लांडे यांनी पैशाचा वापर सुरू केला; परंतु पत्रकार व मतदार त्यांच्या या प्रलोभनांना बळी पडणार नाहीत, असेही गव्हाणे, मनसुख व पवार यांनी म्हटले आहे.