Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘‘बांधण जनप्रतिष्ठान’ व ‘अभिजात गझल’ यांचा उपक्रम कौतुकास्पद’
पुणे, १६ मार्च/ प्रतिनिधी

गझल गायनाचे कार्यक्रम आयोजित करून रसिकांना आनंद देण्याचा ‘बांधण जनप्रतिष्ठान’ आणि ‘अभिजात गझल’ या संस्थांचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत आमदार

 

उल्हास पवार यांनी या उपक्रमाचे आज कौतुक केले.
‘बांधण जनप्रतिष्ठान’ आणि ‘अभिजात गझल’ या संस्थांच्या वतीने गझल सम्राट सुरेश भट यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त मराठी गझल गायक सुधाकर कदम यांना यंदाचा ‘सुरेश भट स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार पवार बोलत होते. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. राजदत्त, डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी, अशोक मोहोळ, सुरेश खोपडे, प्रा. भगवान ठाकूर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शाल, श्रीफळ, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराबरोबरच कदम यांना ‘गझल गंधर्व’ हाही किताब देण्यात आला.
पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या निमित्ताने मुशायरा कार्यक्रमात इलाही जमादार, रमेश रणदिवे, म. भा. चव्हाण, दीपक करंदीकर, दिलीप पांढरपट्टे, संदीप माळवी, अप्पा ठाकूर, वैभव जोशी, चित्तरंजन भट आदींनी यावेळी एकापेक्षा एक सरस अशा गझला सादर करून रसिकांची मने जिंकली. ‘बांधण जनप्रतिष्ठान’चे अध्यक्ष अप्पा ठाकूर, उपाध्यक्ष नाना लोडम, सरचिटणीस सुरेशकुमार वैराळकर, सहचिटणीस संदीप माळवी, संजय डाकवे तसेच ‘अभिजात गझल’चे सूत्रधार अनिल स्वकुळ यांनी संयोजन केले.