Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शिवाई देवीच्या मंदिरात पुन्हा चोरीचा प्रयत्न
जुन्नर, १६ मार्च/ वार्ताहर

मंदिराच्या दानपेटय़ा फोडणे, देवाचे दागिने पळविणे हे प्रकार गेल्या काही महिन्यांत जिल्ह्य़ात घडत आहेत. तीन महिन्यांपूर्वी किल्ले शिवनेरीवरील शिवाई देवीचे मंगळसुत्राची चोरीची घटना

 

घडली होती. त्याची पुनरावृत्ती ठरणारी घटना, काल मध्यरात्री पुन्हा घडली, शिवाई देवीच्या मंदिराच्या खिडकीचे गज कापून, चोरीचा प्रयत्न पुन्हा घडला. देवीचे मंगळसूत्र सोन्याचे नसल्याचे पाहून चोरटय़ांनी ते तोडून तिथेच टाकले तर, तेथील साडय़ा अस्ताव्यस्त टाकल्या. या प्रकारानंतर शिवनेरीवरील घोडशाळेजवळील वनविभागाच्या सामान ठेवण्याच्या खोल्यांचे कुलूप तोडून तेथे गोळ्या बिस्किटे विकणाऱ्याच्या गल्ल्यातील काही किरकोळ रक्कम चोरटय़ांनी पळवली.
शिवाई देवीच्या यापूर्वी झालेल्या चोरीच्या घटनेनंतर दानपेटीतील रक्कम रोजच देवस्थान ट्रस्टमध्ये जमा करण्यात येते, तर कोणत्याही मौल्यवान वस्तू ठेवल्या जात नाहीत. त्यामुळे चोरटय़ांचा, चोरीचा प्रयत्न फारसा यशस्वी होऊ शकला नाही. या घटनेप्रकरणी, मंदिराचे पूजारी सोपान दुराफे यांनी जुन्नर पोलिसांना कळविल्यानंतर जुन्नर पोलीस ठाण्याचे फौजदार विकास जाधव आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
काही दिवसांपूर्वीच लेण्याद्री येथील गिरिजात्मज मंदिराच्या दरवाजाचे कडीकोयंडे तोडून, दानपेटी फोडण्याचा प्रकार घडला होता. दरम्यान, शिवनेरीवरील चोरीप्रकरणी एका अन्य चोरीतील जुन्नर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने दोनच दिवसांपूर्वी कबुली दिली होती हा तपास सुरू असताना प्रत्यक्षात काल पुन्हा चोरीचा प्रयत्न झाल्याने या प्रकारामागे कोणीतरी खोडसाळपणा करत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. जुन्नरचे पोलीस निरीक्षक आर. एन. परदेशी यांनीही हा खोडसाळपणाचा प्रकार असल्याचा दावा केला. ते म्हणाले, की शिवाई देवीच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी कबुली देणाऱ्या आरोपीने ज्या अन्य चोरीप्रकरणात त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यातली एक अंगठी, वडज येथील कुलस्वामी देवस्थानच्या दानपेटीत ‘पश्चाताप’ झाल्याने त्याने टाकली असल्याचे सांगितले होते. ती अंगठीदेखील दानपेटीत मिळाली आहे. हा आरोपी अटक असताना पुन्हा शिवाई मंदिराची चोरी करण्याचा हा प्रयत्न म्हणजे कोणी अज्ञात व्यक्तींचा खोडसाळपणा असावा असे ते म्हणाले.
दरम्यान आज दुपारी शिवाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या दोघांची संशयास्पद हालचाल जाणवल्याने कुसूर ग्रामस्थांनी दोन व्यक्तींना पोलिसांच्या हवाली केले होते. मात्र ते चोर नसल्याचे लक्षात आल्यानंतर, चोर पकडल्याच्या शक्यतेवर पडता पडला. मात्र हे प्रकार थांबविण्यासाठी योग्य कारवाईसाठी आरोपीचा शोध लावण्याची ग्रामस्थांनी मागणी यावेळी केली.