Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘स्त्रियांना समान वागणूक देण्याची गरज’
पुणे, १६ मार्च / प्रतिनिधी

हिंसामुक्त कुटुंबाच्या निर्मितीसाठी स्त्रियांना समान वागणूक दिली पाहिजे व तशी मानसिकता समाजामध्ये निर्माण व्हावी अशी अपेक्षा माजी प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांनी व्यक्त केली. भारतीय स्त्री शक्ती जागरणतर्फे आयोजित हिंसामुक्त कुटुंब ‘अभियानाची सांगता प्राचार्य देशपांडे यांच्या व्याख्यानाने झाली. ‘स्त्रियांवरील हिंसाचार रोखण्यात पुरुषांचा सहभाग’ या विषयावर प्राचार्य

 

देशपांडे बोलत होते.
या प्रसंगी संस्थेच्या सचिव वैजयंती ढवळे उपस्थित होत्या. कुटुंब व्यवस्थेतूनच संस्कार होत असल्याने ही व्यवस्था मजबूत करणे आवश्यक असल्याचे सांगून देशपांडे म्हणाले, की सध्या दूरचित्रवाणीवरून प्रसारित होणाऱ्या विविध मालिकांमधून कुटुंबातील वाद, स्त्री-पुरुषांचे विवाहबाह्य़ संबंध, सासू व सुनेतील भांडणे या मुळे अनेक कुटुंबात वाद निर्माण होऊन नष्ट झालेले चित्रण दाखविण्यात येते. त्याचा प्रभाव समाजावर होत असतो. अशा वातावरणात कुटुंबव्यवस्था टिकविणे आवश्यक आहे. यासाठी समाजात प्रबोधन होणे आवश्यक आहे, असे देशपांडे म्हणाले.
या प्रसंगी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम आलेल्या अनघा ठोंबरे व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या मनीषा ओगले यांना देशपांडे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. तसेच पुरुष गटात शेखर बर्वे व डॉ. प्रमोद जोगदे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी बर्वे यांनी केले.