Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

किल्ले शिवनेरीवर दगडफेक करणाऱ्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
जुन्नर, १६ मार्च / वार्ताहर

शिवजयंतीदिनी १९ फेब्रुवारीला किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवर दगड मारून

 

नुकसान करणे, पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना गंभीर जखमी करणे, या आरोपावरून गुन्हे दाखल झालेल्या २७ आरोपींना अटक करून आज जुन्नर न्यायालयात हजर केले असता या सर्वाना जुन्नर न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या सर्वाची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली असल्याचे जुन्नरचे पोलीस निरीक्षक आर. एन. परदेशी यांनी सांगितले.
मराठा आरक्षण मागणीसाठी शिवजयंतीदिनी आंदोलन करणाऱ्या संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाच्या १५० ते २०० कार्यकर्त्यांवर जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीमार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर जमावाने दगडफेक केल्याची घटना त्या दिवशी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी घडली होती. या घटनेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक रवींद्र कदम, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक मोराळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह एकूण ११ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या घटनेवरून दंगलप्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे सर्व आरोपी आज जुन्नर पोलिसांपुढे हजर झाले. त्या सर्वाच्या अटकेनंतर जुन्नर न्यायालयाचे न्यायाधीश श्री मेहता यांनी आरोपींना ३० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. विजय तांबे, तर सरकारच्या वतीने अ‍ॅड. सी. एच पाटील यांनी बाजू मांडली.