Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शताब्दी तोरणा चढाईची
विविध छंदांमध्ये गिरीभ्रमणाचा छंद नवीन नाही. पण हा छंद बाळगणारे सगळेच सहसा पुन्हा पुन्ह गड चढत असतात. निसर्गाचं वेड असतं. वाटा धुंडाळायला आवडतात. चढण्याची आणि चढण्याची वाट न्याहाळण्याचीच गोडी अधिक.. मग गड तर ओळखीचा झालेलाच असतो तिथे थांबण्यात रस असतोच असे नाही. रात्री मुक्काम करण्याची गोष्ट वेगळी..
१५ मार्च २००९ रोजी शंभराव्या वेळी तोरणा चढण्याचा घाट श्रीकृष्ण पाटील यांनी घातला तो काहीसा मित्रांच्या आग्रहावरून! गड चढण्याचं रेकॉर्ड वगैरे करणं त्यांच्या मनात कधीच येत नाही,

 

कारण काळ आठवतो तो शिवरायांचा.. त्यांची किती माणसं, किती मावळे, किती भोई आण असे कितीजण कैकवेळा गड चढले असतील.. आता बऱ्याचदा मळलेल्या वाटांवरून हातात फार अवजड सामान न घेता चढण्यात मर्दुमकी ती कुठली?
वडिलांच्या शिल्पकारीतील शिक्षकाच्या नोकरीमुळे वयाच्या बाविसाव्या वर्षांपर्यंत हैदराबादला राहिलेल्या श्रीकृष्ण पाटलांना गडचढाई, दर रविवारच्या सिंहगडच्या फेऱ्या याचा गंधही नव्हता. निवृत्तीनंतर वडील भूम या उस्मानाबाद जिल्ह्य़ातल्या आपल्या गावी गेले आणि त्यानंतर ७५ मध्ये बी.कॉम. पाटील ‘भूम’ला काय करायचं, म्हणून पुण्याला आले.
७६ साली प्रथम सायकलवरून मित्राबरोबर सिंहगडाच्या पायथ्याशी आणि त्यानंतर वर चढाई करून गेले आणि ते वेडच लागल्यासारखं झालं. रिकामा वेळ भरपूर असायचा.
७७ साली तोरणा-कात्रज-सिंहगड. ७८ मध्ये छंद सुरू झाला तेव्हा प्रथम शिवाजीमहाराजांनी जिंकलेला तोरणाच आपण पायाखाली घालायचं त्यांनी ठरवलं; ४ मित्र, सायकलवरून वेल्हे आणि मग तिथून वर चढून गेले; तो दिवस १५ ऑगस्टचा.
हा छंद पुढे कितीतरी वाढला. ८१ साली यूथ होस्टेलचा दरवाजा उघडला आणि ८६ पर्यंत अनेक गडांच्या, हिमालयाच्या देखील अनेक वाऱ्या झाल्या. आयोजक, पदाधिकारी अशा विविध भूमिका असत. पाटील हा फिल्डवर्कचा माणूस, अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचा भाग त्यांच्याकडे कमी असायचा. ८२, ८३, ८४ मध्ये यूथ होस्टेलचे सेक्रेटरी असताना सिंहगड, राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड असा ट्रेक त्यावेळी ते सलग १० दिवसात घेऊन जायचे. तोरण्यासाठी पाटलांना मुक्रर करीत असत- म्हणून १० दिवस पायथ्याशी राहून रोज नव्या नव्या लोकांबरोबर गड चझायचा आणि उतरायचा. त्या तीन वर्षांत किमान ३० चढणी पूर्ण झाल्याच!
तोरणा हा पुणे जिल्ह्य़ातला सर्वात उंच काहीसा अवघड किल्ला! वर तीन-साडेतीन कि.मी.चा परिसर.. मेंगाईचं देऊळ आणि झुंझारमल बुरुज पाहून बहुतेक सगळे परततात. खरं सौंदर्य बुधला माचीच.. तिची अवघड वाट आव्हानात्मक खरी!
तशी रायगडची गोमुखी तटबंदीही सुंदर, पण तोरणा पाटलांच्या अगदी सुरुवातीपासूनच मर्जीतला. हिमालयात ट्रेकनिमित्त सलग १।। महिना दार्जिलिंगला राहणं झालं. अतिउच्च ठिकाणांचे ३१ ट्रेक झाले. तरी तोरण्यानंतर केलेला पुणे-जुन्नर-खिरेश्वर असा सायकलवरचा प्रवास आणि त्यानंतरची हरिश्चंद्रगडाची चढाई अजूनही आठवतेच.
छंद जोपासतानाच बँक ऑफ इंडियाची नोकरी लागली आणि तिथल्याही स्पोर्ट्स क्लबतर्फे २५-३० जणांचा ग्रुप घेत किती तरी छंदिष्टांना किती यात्रा घडवल्या. त्यांच्या आवडीचा तोरणा, लिंगाणा, राजगड तर त्यात होताच, पण त्यांच्या आवडीचा भोर-हिडरेशी-कुंड-शिवथरघळ असा एक रात्रीच्या मुक्कामाचा ट्रेकही होता.
८८ च्या नोव्हेंबरला श्रीकृष्ण पाटलांनी स्कायलार्क माऊंटेनियर्स ही स्वत:ची संस्था सुरू केली. याच सुमाराला राष्ट्रीय सुरक्षा दलाचे ते सदस्य झाले होते. पुढे त्यांचे हे दोन्ही छंद एकमेकाला पूरक होत गेले. विविध ठिकाणाहून आपत्तीतून लोकांची सुटका करण्यासाठी रोप क्लायंबिगच्या मोठमोठय़ा दोरखंडांचा आणि विविध गाठींचा वापर योग्य ठरू लागला आणि अगदी परवाच्याच पावसाळ्यात सिंहगडावर गेलेली लग्न ठरलेली मुलगी पडली आणि तिला जेव्हा रात्रीच्या वेळी पावसात, अंधारात शोधायची वेळ आली तेव्हा थोडय़ा प्रयत्नांनंतर पोलिसांनी श्रीकृष्ण पाटलांना हाक घातली.. हे शोधतंत्र वेगळंच असल्याचा जणू तो साक्षात्कार होता.अशा संशोधनांबद्दल पाटलांना २००४ साली जाहीर झालेलं राष्ट्रपतिपदक २००६ मध्ये मिळालं, त्यावेळी मागच्या ५ वर्षांमधली पदकं घेणारे एकूण २७ जण त्या समारंभाला उपस्थित होते.
सहजपणे हाती घेतलेल्या या मदतकार्यात काय किंवा गिर्यारोहणाच्या छंदातून काय.. फारसं काही घडेल असं त्यांना सुरुवातीच्या १५ वर्षांतही वाटलं नव्हतं. पुढच्या पाच वर्षांत मात्र सुख-शांती-समाधान-आनंद.. मदत आणि ‘आपत्तीतून सुटके’च्या कार्यातून हाती येणारी यशाची चव आणि गिर्यारोहणातून मिळणारा असीम आनंद आणि समाधान राष्ट्रीय सेवा दलात हजारो लोकांना प्रशिक्षण देत असताना ‘स्कायलार्क’तर्फे अशाच ४-५ हजारांना त्यांनी गिरीदर्शन घडवलं. १५ एकरांची त्यांची शेती बघणारा विश्वासू सहकारी आणि बँकेतली नोकरी यामुळे छंदासंदर्भात त्यांना कधीच धंदेवाईक दृष्टिकोन ठेवावा लागला नाही. आनंद, समाधान हीच त्यातली पुंजी. लोकही सतत जोडलेच जात राहिले.
दीड वर्षांपूर्वी प्रसाद पवार या मित्राबरोबर पाटील लिंगाण्याला गेले. तेव्हा तोरणा ८३ वेळा चढून झाला होता. ‘तुम्ही १०० पूर्ण कराल तेव्हा मी बरोबर असणार,’ या वाक्यापासून हिशोब सुरू झाला. महिन्यातून ३ ट्रेक आजही होतात. पण एकदा तोरणा असं धरलं, तर दीड वर्ष, १५ मार्च २००९ ला श्रीकृष्ण पाटील यांचं ५५ व्या वर्षांत पदार्पण.. त्याच दिवशी शंभरी पूर्ण करायची. ८ मार्च रविवार. सकाळी ५ वा. घरातून निघून ११ वाजता घरी परत, मंगळवार, बुधवार सुटीचे.. म्हणून मंगळवारी १० तारखेला आणि मग गुरुवारी १२ तारखेला सकाळी ट्रेक करून दुपारी २ वाजता बँकेची शिफ्ट त्यांनी गाठली..
.. अशी ही सगळीच रेकॉर्ड्स!
आता तोरणा त्यांना अधिक टफ वाटतो. आपल्या सुदृढतेची साक्ष पटवणारा वाटतो. चढताना नेहमी एक सोबती हवा, तर कमी वेळात चढता येतं. चौघे असले की दोघे मागे राहतात हा त्यांचा अनुभव!
७ व्या वर्षांपासून १२ सूर्यनमस्कार एवढय़ा नियमित व्यायामानंतर ट्रेकिंग सुरू झालं. ४० वर्षे सूर्यनमस्कार नियमानं चालू आणि कमी-जास्ती आजही पण ट्रेकिंगसारखा व्यायाम नाही, असं आज त्यांना वाटतं. श्वास, रक्ताभिसरण, घाम, चडणीचा व्यायाम सगळच. ३-४ वर्षांपूर्वी सिंहगड ५०० वेळा चढून झाला. मग मोजणं सोडलं. आता हिमालयातला ट्रेक वर्षांतून एकदा असतो. स्कायलार्कला २८ नोव्हेंबर ०८ मध्ये २० वर्षे पूर्ण झाली. आशीर्वाद देण्यासाठी कार्यक्रमाला निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, प्र. के. घाणेकर होते. बरोबर ट्रेकला आलेल्या ४००० ते ५००० लोकांना वाढदिवसाचं आमंत्रण होतं. कारण भेटी पुन्हा पुन्हा होतात. म्हणून हे घडतं. मध्यंतरी ५-६ महिने आलेला आळस या निमित्ताने झटकला गेला. फिटनेस आजपावता आला, हीच आरोग्याची गुरुकिल्ली हेही पटलं.
३ ते १६ मे रोजी जाणाऱ्या मनाली भ्रुगुलेकच्या ट्रेकसाठी आता ते सज्ज आहेत. त्याला येणारे मुंबईचे पाचजणही या १०० व्या तोरणाभेटीच्या वेळी श्रीकृष्ण पाटलांच्या साथीला आहेत. दर शनिवारी उद्या कुठे जाऊ या म्हणून तरुण मित्रांचे फोन त्यांचा उत्साह वाढवतात.
स्वाती कर्वे