Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘दारूबंदी करण्याचे सामथ्र्य महिला व युवकांमध्ये’
तळेगाव दाभाडे, १६ मार्च/वार्ताहर

दारूधंदे पोलीस व पुढारी बंद करू शकतात, पण दोघांचेही हात हप्त्यांमुळे बरबटलेले असल्याने ते काही करू शकत नाहीत. परंतु महिला व युवकांमध्ये ते सामथ्र्य आहे असे मत महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती युवक संघाचे संस्थापक हभप बंडातात्या कराडकर यांनी सुदुंबरे (ता. मावळ) येथे

 

व्यक्त केले.
सुदुंबरे गावातील ताडी व दारूधंदे बंद व्हावेत म्हणून महिलांनी गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन सुरू केलेले आहे. त्या अनुषंगाने ‘दारूबंदी’ या विषयावर हभप बंडातात्या यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्या वेळी ते बोलत होते.
महिलांनी संत मीराबाई, संत जनाबाई यांच्या ओव्या गायल्याच पाहिजेत. परंतु त्याबरोबरच ‘मेरी झाँशी नहीं दूँगी’ या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या मंत्राचाही विसर पडू देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.
देशाच्या राष्ट्रपती महिला असतानाही तळागाळातील महिलांवर अत्याचार होत आहेत. हे अपराध अक्षम्य आहेत. देशात कायदाच उरला नाही म्हणूनच सर्वत्र अन्यायाचे चित्र दिसते आहे. प्रशासनही कायद्यासारखे वागत नाही. म्हणून ‘तुम्ही कायदा हातात घेऊ नका’ असे तुम्हास बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही. दारूबंदीसारखे पवित्र काम हाती घेतल्याबद्दल या गावातील महिला व युवकांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत. दारूधंदे करणाऱ्यांपैकी एकजण गावात गुंड प्रवृत्तीने दहशत निर्माण करीत आहे. त्याने दारूधंदा त्वरित बंद करून इतर व्यवसाय करून गावाशी गुण्यागोविंदाने राहावे अन्यथा व्यसनमुक्ती संघटनेचे हजारो युवक कार्यकर्त्यांना इथे यावे लागेल, असा इशारा बंडातात्या कराडकर यांनी दिला.
महिला व युवकांना ‘घाबरू नका. लढा चालू ठेवा’ असा सल्ला ही बंडातात्यांनी दिला.
व्याख्यानास गावातील सुमारे हजार महिला, पुरुष व युवक तसेच डाऊ कंपनी विरोधी आंदोलनातील १०० कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
सरपंच रंजनाताई जंबुकर, उपसरपंच मोहन काळडोके, तसेच दारूबंदी आंदोलनातील प्रमुख ताराबाई गाडे, सुवर्णा काळडोके, शोभा गाडे, मंगला बोरकर, नीता गाडे, ललिता बोरकर, मीना बोरकर उपस्थित होत्या.
प्रास्ताविक शिवाजी चंद्रकांत गाडे यांनी, तर स्वागत हभप नामदेवमहाराज यांनी केले आणि आभार रवींद्र गाडे यांनी मानले.