Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

..आणि आमदार विलास लांडेंनी उलगडला कारकिर्दीचा जीवनपट
चाकण, १६ मार्च/वार्ताहर

भोसरी येथील हॉटेलमधील कपबश्या धुणारा वेटर ते यशस्वी उद्योजक व आमदार अशी कारवाई घडवत असताना सामाजिक बांधीलकी जोपासण्यासाठी शैक्षणिक संस्था, क्रीडासंकुल, ग्रंथालये

 

अशा असंख्य समाजोपयोगी कार्याना आजपर्यंत सर्वाधिक प्राधान्य दिले. असे सांगून हवेली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा हवेलीचे आमदार व शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीतून सर्वात आघाडीवर असलेले संभाव्य उमेदवार विलास लांडे यांनी चाकण येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांसमोर मांडला व आढळराव पाटील स्टाईल झिरो ते हीरो अशा आपल्या कारकिर्दीचा जीवनपट उलगडला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूरऐवजी माढा या सेफ मतदारसंघाची निवड केल्याने शिरूर लोकसभेच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या इच्छुकांत उमेदवारीसाठी सर्वात आघाडीवर असलेले आमदार विलास लांडे यांनी चाकणमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व पत्रकारांना आमंत्रित करून पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेसाठी पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक अजित गव्हाणे, राजमाता जिजाऊ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, ऑटोलाईन इंडस्ट्रिजचे संचालक शिवाजीराव आखाडे, सुधीर मुंगसे आदी उपस्थित होते. पुढे पत्रकार परिषदेत लांडे म्हणाले, की चिखली-कुदळवाडी परिसरात अवघ्या लाखभर रुपयांच्या भांडवलावर सुरू केलेल्या छोटय़ाशा वर्कशॉपचे ऑटोलाईन इंडस्ट्रिज या जगभरात चार हजारांहून अधिक कामगार व कोटय़वधी रुपयांची उलाढाल असलेल्या उद्योग समूहामध्ये रूपांतर केले.
हे सर्व करीत असताना कुठल्याही कामाची लाज न वाटू देता समोर आलेले प्रत्येक काम प्रामाणिकपणे केले. धार्मिक व अध्यात्मिकतेचा वारसा आपल्याला वडिलांकडून मिळाल्याचे सांगून शिरूर लोकसभेसाठी पक्षाने व जनतेने संधी दिल्यास आपण जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी पुस्ती
जोडली.
तत्पूर्वी विलास लांडे अध्यक्ष असलेल्या ऑटोलाईन इंडस्ट्रिज लिमिटेड व ऑटोलाईन डायमेन्शन्स सॉफ्टवेअर प्रा. लि. या दोन्ही कंपन्यांच्या जगभरात विस्तारलेल्या कामकाजाची माहिती ध्वनिचित्रफितीद्वारे (प्रेझेंटेशन) देण्यात आली.
उद्योग व्यवसायांच्या तुलनेत आपण प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा कुठेही कमी नाही, हे दर्शविण्यासाठीच हे प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. विश्वनाथ कोरडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले.