Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९

महिलांचा दारुगुत्त्यावर हल्ला
पुणे, १६ मार्च/प्रतिनिधी

आंबेगाव पठार येथे चालणाऱ्या अवैध दारूच्या गुत्त्यांवर परिसरातील सुमारे तीनशे ते चारशे महिलांनी आज सकाळी ‘हल्लाबोल’ केला. स्थानिक नगरसेविका वर्षां तापकीर यांच्या पुढाकाराने झालेल्या या ‘कारवाईत’ चार दारूचे गुत्ते उद्ध्वस्त करण्यात आले. हे गुत्ते चालविणाऱ्या तीनजणांविरुद्ध हवेली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

‘‘दादांचा फोन आहे..’’
निवडणुकीच्या प्रचाराची सभा असो, कार्यकर्त्यांचा मेळावा असो किंवा छोटी बैठक असो, सतत वाजणारे मोबाईल आणि त्यामुळे कार्यक्रमात येणारा व्यत्यय हा आता नित्याचाच झाला आहे. शिरूर तालुक्यातील एका गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची अशीच एक बैठक एका स्थानिक नेत्याने नुकतीच घेतली होती. त्यात एका कार्यकर्त्यांचा मोबाईल असाच सारखा वाजत होता आणि निवडणूक तोंडावर आल्याने अगदी लहान कार्यकर्ताही दुखावला जाता कामा नये, यासाठी तो फोन घेतही होता.

जिल्हाधिकारी व पुनर्वसन सचिवांना प्रत्येकी २५ हजारांचा दंड
गुंजवणी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनात बेजबाबदार वर्तन

पुणे, १६ मार्च / खास प्रतिनिधी

गुंजवणी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनातील विलंब आणि निर्वाहभत्ता न दिल्याबद्दल राज्याचे पुनर्वसन सचिव व पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला. राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे बेजबाबदार वर्तन करणे योग्य नसल्याचे ताशेरेही यासंदर्भात ओढले आहेत.

आठवले यांना तिकीट न मिळाल्यास ४८ जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार
पिंपरी, १६ मार्च / प्रतिनिधी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा फुटबॉल झाला असून त्यांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे आठवले समर्थक संतापले आहेत. शिर्डी लोकसभेसाठी आठवले यांना ‘तिकीट’ न मिळाल्यास राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार िरगणात उतरवून आपले उपद्रवमूल्य दाखविण्याचा इशारा पक्षाने आज दिला आहे.

पथकाचा पाठलाग चुकविणाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
बारामती, १६ मार्च/वार्ताहर

गुडमॉर्निग पथकाचा पाठलाग चुकविण्यासाठी पळत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सुपे (ता. बारामती) येथे घडली.
सुनील गोविंद जाधव (वय ४८, रा. सुपे, ता. बारामती) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आकस्मित निधन म्हणून नोंद करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शहरात आज सव्वातीन तासांची वीजकपात
पुणे, १६ मार्च/ प्रतिनिधी

टाटा पॉवर कंपनीकडून केवळ ४२ मेगावॉट अतिरिक्त वीज मिळणार असल्याने उद्या (मंगळवारी) पुणे व पिंपरी- चिंचवड शहरामध्ये दोन ते सव्वातीन तासांची वीजकपात होणार आहे, असे ‘महावितरण’कडून कळविण्यात आले आहे. टाटा पॉवर कंपनीकडून मागील आठवडय़ापासून कमी प्रमाणात अतिरिक्त वीज मिळत असल्याने शहरातील वीजकपातीत वाढ झाली आहे. सध्या शहरामध्ये पावणेतीन ते सव्वाचार तासांची मूळ वीजकपात आहे. टाटा पॉवरकडून रोज वेगवेगळ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त विजेनुसार मूळ वीजकपात कमी केली जाते. उद्या (मंगळवारी) शिवाजीनगर, कोथरूड, पद्मावती व बंडगार्डन या विभागांमध्ये दोन तास, पर्वती, रास्ता पेठ, नगर रस्ता व भोसरी विभागात अडीच तास, तर पिंपरी विभागात सव्वातीन तासांची वीजकपात करण्यात येणार आहे.

काच, पत्रा कामगारांमध्ये अ‍ॅनेमियाचे सर्वाधिक प्रमाण!
पुणे, १६ मार्च/प्रतिनिधी

शहरातील कागद, काच, पत्रा वेचणाऱ्या कष्टकरी कामगारांमध्ये अ‍ॅनेमियाचे प्रमाण हे ४४ टक्के असून, ते सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती कष्टकऱ्यांच्या पाहणीतून पुढे आली आहे. या ४४ टक्क्यांमधील ०.५ टक्के कष्टकऱ्यांमध्ये याचे प्रमाण हे नऊपेक्षाही कमी असल्याचे आढळून आले आहे. शहरातील कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत, तसेच इंडियन असोसिएशन ऑफ अ‍ॅक्युपेशनल हेल्थ आणि टाटा मोटर्स यांच्या वतीने ही आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. त्यात शहरातील सुमारे १७०० कष्टकऱ्यांची तपासणी करण्यात आली. अ‍ॅनेमियाचे प्रमाण अधिक आढळणाऱ्या कष्टकऱ्यांना टर्शरी रुग्णालयात रुग्णसेवा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, तसेच लोहयुक्त गोळ्या देऊन त्यांना तीन महिन्यांनी पुन्हा तपासणीस बोलाविण्यात आले आहे. या औषधोपचारानंतरही रुग्णांमधील अ‍ॅनेमियाचे प्रमाण घटले नाही तर, त्यांना अद्ययावत रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. काच पत्रा वेचणाऱ्यांमधील महिला आणि पुरुषांच्या लघवीमध्ये साखरेचे लक्षणीय प्रमाण आढळून आले.

द्राक्ष संशोधन केंद्रातील मजुरांना वेतन फरक रक्कम
पुणे, १६ मार्च/प्रतिनिधी

द्राक्ष संशोधन केंद्रातील अठ्ठेचाळीस शेतमजुरांना दीड वर्ष प्रदीर्घ संघर्ष केल्यानंतर किमान वेतन फरकाचे तीन लाख रुपये मिळाले. यावरून संघटितपणे लढल्यानंतर यश हे मिळतेच ही बाब अधोरेखित झाली आहे, असे मत राष्ट्रसेवा दलाचे प्रा. सुभाष वारे यांनी आज व्यक्त केले.
कष्टकरी कामगार पंचायतीतर्फे आयोजित अंगमेहनती कष्टकरी शेतमजूर व घरकाम करणाऱ्या महिलांच्या मेळाव्यात प्रा. वारे बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय कामगार आयुक्त एन. एच. अहमद, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक मारुती भापकर, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, दलित स्वयंसेवक संघाचे दादासाहेब सोनावणे, संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे उपस्थित होते. वारे म्हणाले की, रेशनिंग, रॉकेल, पक्की घरे, रोजगार हमी योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी असे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी भविष्यातही संघर्ष सुरूच ठेवावा लागणार आहे. बौद्धिक आणि शारीरिक कष्टांना मिळणाऱ्या मोबदल्यातील फरक कमी करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. एन. एच. अहमद म्हणाले की, सरकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ गोरगरिबांपर्यंत पोहचविता आला, त्याचे समाधान वाटते. या वेळी मारुती भापकर, बाबा कांबळे, मानव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

सांगवीत सव्वा लाखाची घरफोडी
पिंपरी, १६ मार्च / प्रतिनिधी

जगताप डेअरी िपपळे निलख येथील गोकुळधाम सोसायटीमध्ये चोरटय़ांनी प्रवेशद्वाराच्या काचा फोडून रो-हाऊसमधील एक लाख ३३ हजार रुपयांचा माल चोरून नेला. श्रीधर सदाशिवन (रा. विशालनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. सदाशिवन यांचे रो-हाऊस दहा ते चौदा तारखेदरम्यान बंद असताना चोरटय़ांनी कुंपणाच्या भिंतीवरून प्रवेशद्वाराच्या काचा फोडून घरात प्रवेश केला व एक लाख ३३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली.

पार्किंगच्या वादातून महिलेच्या घरावर दगडफेक
पिंपरी, १६ मार्च / प्रतिनिधी

पिंपरी संत तुकारामनगर येथील एका महिलेच्या घरावर रविवारी सायंकाळी पार्किंगच्या वादावरून दगडफेक करण्यात आली. तिच्या घरातील सर्व मौल्यवान वस्तूंची तोडफोड करण्यात आली.
पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना हेमंत पांचाळ (वय २५, रा. २१०/१५१९, संत तुकारामनगर, पिंपरी) असे तक्रार दिलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी गणेश नरेंद्र मांढरे याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. अर्चना रविवारी सायंकाळी तिच्या पाच वर्षांचा मुलगा सूरज याच्यासमवेत घरामध्ये टीव्ही पाहत असताना आरोपींनी त्यांच्या घरावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यांच्या घराचा दरवाजा तोडून टाकला. तसेच खिडकीच्या काचादेखील फोडून टाकल्या. घरामध्ये घुसून सर्व मौल्यवान वस्तूंची तोडफोड करण्यास सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वी पार्किंगवरून झालेल्या वादाने ही तोडफोड केल्याचे अर्चनाने पोलिसांना सांगितले. अधिक तपास सहायक निरीक्षक सुरेश चौधरी करीत आहेत.

बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला
पिंपरी, १६ मार्च / प्रतिनिधी

िहजवडी वाकड येथे शनिवारी बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आज सकाळी वाकड येथील एका विहिरीमध्ये सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. िहजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना जयदेव धुळे (वय ३५, रा. कलाटे चाळ, वाकडगाव, मु. रा. फुसत, यवतमाळ) असे विहिरीत बुडून मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी आठच्या सुमारास कल्पना बेपत्ता झाल्याची तक्रार शनिवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. आज सकाळी काळूराम बाबूराव कलाटे यांच्या शेतामध्ये असलेल्या विहिरीत एका महिलेचा मृतदेह मिळून आला. दरम्यान, पोलिसांनी जयदेवशी संपर्क साधून अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला असून त्याची खात्री करण्यास सांगितले. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने महिलेचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. जयदेवने तो मृतदेह माझ्या पत्नीचा असल्याचे पोलिसांना सांगितले. कल्पनाच्या भावांची याबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कल्पना व जयदेवचा १९९० मध्ये विवाह झाला होता. त्यांना दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यामध्ये कधीही भांडण झाले नसल्याचे जयदेवच्या मेव्हण्याने पोलिसांना सांगितले. हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपाताचा याचा शोध हिंजवडी पोलीस घेत आहेत. अधिक तपास सहायक पोलीस फौजदार हरिश्चंद्र कदम करीत आहेत.

चिंचवडला तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
पिंपरी, १६ मार्च / प्रतिनिधी

चिंचवड स्टेशन येथील एका तरुणाने रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबू मुरलीधर जगदाळे (वय २६, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसात तक्रार दिल्यावरून तरुणांवर प्राणघातक हल्ला
पिंपरी, १६ मार्च / प्रतिनिधी

भोसरी येथील धावडेवस्तीच्या अंकुश लांडगे चाळीसमोर चौघा तरुणांनी पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून दोघा तरुणांवर प्राणघातक हल्ला चढविला. संतोष ज्ञानेश्वर पांडे (वय २१, रा. गणपत लांडे चाळ, लांडगेवस्ती, भोसरी) व नितीन मोहन वाघमारे (वय २३, रा. ओंकार इंडस्ट्रीज, स. नं. १, एमआयडीसी, भोसरी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी याप्रकरणी संजय काळुराम लोंढे (वय २३, रा. धावडेवस्ती, भोसरी) व संजय उत्तमराव आवळे (वय ३१, रा. शिवगणे, धावडेवस्ती, भोसरी) या दोघांना अटक केली. त्यांचे संजय लोंढे व अतुल मोहरे हे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याच्या रागाने आरोपींनी रविवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास पांडे व वाघमारे यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. अधिक तपास फौजदार तानाजी शिंदे करीत आहेत.

शिशुविहार प्राथमिक विद्यालयात ‘गाथा ज्ञानाची’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण
पुणे, १६ मार्च/प्रतिनिधी

लोकसत्ता आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आयोजित गाथा ज्ञानाची या कात्रण संकल्प उपक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ शिशुविहार प्राथमिक विद्यालय, गणेशखिंड येथे संपन्न झाला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या मंदा बोराणे तसेच वरिष्ठ शिक्षिका स्वाती यारदी, सुजाता ढेरे, उपशिक्षिका उषा ताम्हाणे, मृदुला ढवळे आदींची उपस्थिती होती. समारंभ चालू होण्यापूर्वी बोरणे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
विद्यालयातील एकूण ८० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यालयातील मोहिनी गांगार्डे व प्रणय मुखेकर या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ रसिक साहित्य ग्रंथभांडार यांचे ५०० रुपयांचे कुपन देण्यात आले. उषा ताम्हाणे यांना विशेष सहकार्याबद्दल सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

वृद्ध शेतक ऱ्याला मारहाण प्रकरणी दोघा जणांना अटक
नारायणगाव, १६ मार्च/वार्ताहर

पोलीस ठाण्यात तक्रार दिली या कारणावरून वृद्ध शेतकऱ्याला गंभीर मारहाण केल्याप्रकरणी एका परप्रांतीयासह दोनजणांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली, अशी माहिती ठाणे अंमलदार बी. टी. वाईकर यांनी दिली. सीताराम कोंडाजी वाळुंज (वय ५६, रा. गुंजाळवाडी), महेशकुमार श्यामलाल यादव (वय २५, रा. उत्तर प्रदेश) या दोघांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध पांडुरंग खंडूजी वाळुंज (वय ७४, रा. गुंजाळवाडी, ता.जुन्नर) यांनी तक्रार दिली आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पांडुरंग वाळुंज व सीताराम वाळुंज यांच्यात जमिनीच्या हद्दीवरून वाद होता. पांडुरंग यांनी सीताराम याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस ठाण्यात तक्रार का दिली या कारणावरून सीताराम व महेशकुमार यांनी पांडुरंग यांना काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पांडुरंग यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला व डाव्या पायाच्या पोटरीवर फ्रॅक्चर झाले. गंभीर मारहाणप्रकरणी सीताराम व महेशकुमार यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना जुन्नर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.