Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
राज्य

गारपीट व पावसामुळे कोटय़वधीचे नुकसान
नाशिक, १६ मार्च / प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील चार तालुक्यांमध्ये रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे काढणीवर आलेल्या द्राक्ष पिकांचे कोटय़वधी रूपयांचे नुकसान झाले असून गहू, कांदा व भाजीपाला पिकांनाही त्याचा तडाखा सहन करावा लागला. सलग दोन तास चाललेल्या या मुसळधार पावसाने द्राक्षवेलींबरोबर इतर पिके भुईसपाट केली. वादळी वाऱ्याने अनेक द्राक्षबागा मुळापासून उखडून फेकल्या.

संत तुकाराम, रामदास यांच्यावर संस्कृती मंडळ प्रसिद्ध करणार दोन ग्रंथ
पुणे, १६ मार्च/ प्रतिनिधी

‘‘संत तुकाराम महाराज आणि संत रामदास यांच्या जन्मचतु:शताब्दीनिमित्त दोन ग्रंथांचे लवकरच प्रकाशन करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी रविवारी येथे दिली. १९५० साली प्रकाशित झालेली संत तुकाराम यांची गाथा ही अल्प किमतीत वाचकांना सहज उपलब्ध करण्याचा मनोदय ही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

जामीन फेटाळला जाताच दोन आरोपींचे कोर्टातून पलायन
सांगली, १६ मार्च / प्रतिनिधी

एका गुन्हय़ातील फरारी आरोपींना अटक करण्यासाठी जिल्हा न्यायालयाच्या आवारात शहर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला असतानाही अटकपूर्व जामीन फेटाळताच त्या दोन संशयित आरोपींनी पोलिसांना चकवा देत पलायन केल्याची घटना सोमवारी दुपारी सांगलीत घडल्याने पोलीस दलात एकच खळबळ माजली. मात्र पोलिसांनी अशी कोणतीही घटना घडली नसून ते दोन आरोपी न्यायालयात आलेच नव्हते, असा दावा केला आहे.

वादळी पावसाचा संत्री, गहू व हरभऱ्याला फटका
पूर्वीची मदत मिळण्याआधीच पुन्हा नुकसान
नागपूर, १६ मार्च / प्रतिनिधी
गेल्या वर्षीच्या नुकसानाची मदत हातात पडण्यापूर्वीच संत्री उत्पादक शेतकऱ्यांना चार दिवसांपासून विदर्भात काही ठिकाणी झालेल्या गारपीट, वादळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे परत फटका बसला आहे. याशिवाय गहू आणि हरभऱ्याचेही नुकसान होणार आहे. गेल्या वर्षी अपुरा पाऊस आणि मृग बहार हातातून गेल्याने विदर्भातील शेतकऱ्यांचे १०० कोटी रुपयांहून जास्त नुकसान झाले. शासनाने सुमारे ५६ कोटी रुपयांची मदत केली.

पक्षनेतृत्वाशी दुरावा जिल्हय़ातील ‘टोळक्या’मुळेच - मंडलिक
कोल्हापूर, १६ मार्च / विशेष प्रतिनिधी

लोकशाहीच्या चौकटीत राहून तर्कशुद्ध विचाराने पक्षनेतृत्वाला विचारलेल्या प्रश्नावर मानसिक संतुलन बिघडल्याचा शिक्का मारण्यापेक्षा पक्षनेतृत्व आणि आपल्यात दुरावा निर्माण होण्यासाठी कार्यरत असलेल्या याच पक्षातील एका ‘टोळक्या’ने जिल्हय़ातील पक्षाच्या बिघडलेल्या संतुलनावर लक्ष देणे आवश्यक होते. असे लक्ष वेळीच पुरविले असते तर कोल्हापूरसारख्या महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा घोळ निर्माणच झाला नसता, असे मत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी येथे व्यक्त केले.

चंद्रकांत चन्ने यांना प्रकाश देशपांडे पुरस्कार
नागपूर, १६ मार्च / प्रतिनिधी

दिवंगत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मानव मंदिरतर्फे देण्यात येणाऱ्या कुशल संघटक पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ चित्रकार आणि बाल चित्रकारांच्या बसोली चळवळीची सूत्रे गेली साडेतीन दशके सांभाळणारे चंद्रकांत चन्न्ो यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारात रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्राचा समावेश आहे.बडोद्याच्या सयाजीराव विद्यापीठातून आणि कोलकाताच्या शांतिनिकेतनमधून चित्रकला व ग्राफिक स्टडीजची पदव्युत्तर पदवी संपादन करणारे चन्ने यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवरही चित्रकलेच्या क्षेत्रात स्वत:चे नाव नोंदवले आहे. जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील प्रस्थापित नोकरी सोडून चन्ने नागपूरला परतले आणि गेली साडेतीन दशके विदर्भातील बालकलावंतांची चळवळ सुदृढ करण्यासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. नागपूरच्या पं. बच्छराज व्यास विद्यालयातून निवृत्त झाल्यावर सध्या ते सेंट्रल इंडिया स्कूल ऑफ फाईन आर्टस् या संस्थेचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. प्रकाश देशपांडे यांच्या पाचव्या स्मृतीदिनी, येत्या २६ मार्चला सायंकाळी साडेपाच वाजता शंकरनगर चौकातील राष्ट्रभाषा सभा सभागृहात नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

तीन महिने उलटूनही अलुरकर हत्येच्या तपासात यश नाही
पुणे, १६ मार्च / प्रतिनिधी

कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध अलुरकर म्युझिक हाऊसचे मालक आणि संगीताच्या दुर्मीळ ध्वनिमुद्रिकांचे संग्राहक सुरेश श्रीधर अलुरकर (वय ५९) यांचा खून होऊन तीन महिने उलटल्यानंतरही त्यांच्या मारेकऱ्यांविषयी पोलिसांकडे कोणतेच धागेदोरे नसल्याचे, गुन्हे अन्वेषण शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी सांगितले. चोरीच्या उद्देशाने आलेल्या व्यक्तीनेच त्यांचा खून केला असावा, या दृष्टीने आता पोलीस तपास करीत आहेत. दोन्ही हात-पाय इलेक्ट्रिक वायरने बांधलेला अलुरकर यांचा मृतदेह चौदा डिसेंबर रोजी रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. मालमत्तेच्या कारणावरून त्यांचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज होता, मात्र सर्व पैलूंनी तपास केल्यानंतर ही शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले. अलुरकर कुटुंबीयांसह त्यांच्या घरात व दुकानात काम करणारे सर्व कर्मचारी व संबंधितांची चौकशी आतापर्यंत करण्यात आली आहे. ‘फॉरेन्सिक’ पुरावे गोळा करुन अलुरकर यांच्या घराची तपासणी करण्यात आली होती. त्या वेळी घरातील तिजोरीला रक्ताने माखलेल्या हाताचे काही ठसे पोलिसांना मिळाले होते. मालमत्तेच्या कारणावरून खून झाला नसावा हे स्पष्ट झाल्यानंतर हा तपास ‘जैसे थे’ होता. आता चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरटय़ाने खून केला असावा, या दृष्टीने तपास सुरू आहे.

भावनेपेक्षा कर्तृत्व मोठे - सिंधुताई सपकाळ
लोणावळा, १६ मार्च /वार्ताहर

देशाचे ऋण फेडण्याकरिता महिलांनी भावनिक बनण्याऐवजी सोशिक बनायला शिका. भावनेपेक्षा कर्तृत्व केव्हाही मोठे आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त लोणावळा शहर पोलीस स्टेशन व महिला सुरक्षा समितीच्या वतीने आयोजित ‘आईच्या काळजातून’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत सपकाळ यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पद्मिनी कराड यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल ‘चंद्रलोक’ येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ उद्योजिका रेणुका कोटक, सामाजिक कार्यकर्त्यां शैलजा फासे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत माने, पो. नि. सुदाम दरेकर, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका ब्रह्मकुमारी वर्षां बहन आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना सपकाळ यांनी आपली कर्तव्य, बांधिलकी, संस्कृती, परंपरा महान असल्याचे सांगत कायद्याचा आधार घेत त्यांचा गैरवापर न करता महिलांनी मनावर सुसंस्कार घडवत अंतरिम विकास साधावा, असा सल्ला महिलांना दिला. आई घराचे मांगल्य, तर बाप घराचे अस्तित्व असल्याने या दोघांनीही बांधिलकी जपावी, असे सांगत महिलांना नम्र व्हायला शिका, असे आवाहन सपकाळ यांनी या वेळी केले.

ढगाळ हवेमुळे पाच हजार टन बेदाणा काळा पडण्याची भीती
सांगली, १६ मार्च / प्रतिनिधी

सांगली जिल्हय़ात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून निर्माण झालेले ढगाळ हवामान, रिमझिम पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हबकला असून, सुमारे पाच हजार टन बेदाणा काळा पडण्याची भीतीही व्यक्त होऊ लागली आहे. जिल्हय़ात गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात मोठय़ा प्रमाणात बदल झाला आहे. दिवसभर कडक ऊन अन् सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरणामुळे बेदाणा उत्पादनावर परिणाम होत आहे. जिल्हय़ाच्या आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, खानापूर, मिरज या तालुक्यांत काही ठिकाणी रिमझिम, तर काही ठिकाणी बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली आहे. तीन वर्षांपूर्वी पडलेला दुष्काळ, त्यानंतर झालेली अतिवृष्टी आणि यंदा दमट हवामानामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडणार आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज पूर्वभागात प्रामुख्याने द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. याच भागात बेदाणा उत्पादनाचे शेडही मोठय़ा प्रमाणात आहेत. सध्या द्राक्षांचा हंगाम संपत आला असून, बेदाणानिर्मितीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. अशातच दमट हवामान, पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सुमारे पाच हजार टन बेदाणा काळा पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. हा काळा पडलेला बेदाणा पुन्हा विक्रीलायक करण्यासाठी शेतकऱ्याला किलोस तीन रुपये जादा मोजावे लागणार आहेत. त्यामुळे हा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे.