Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
क्रीडा

कसोटीसाठी संघात स्थान मिळवण्याची बालाजी व फ्रँकलिनला प्रतीक्षा
हॅमिल्टन, १६ मार्च / वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय क्रि केट विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास सध्या गगनाला भिडलेला आहे. न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका ३-१ ने जिंकल्यानंतर धोनी ब्रिगेड सध्या तरी फॉर्मात आहे. तसा शेवटच्या सामन्यात व ट्ेवन्टी - २० सामन्यांमध्ये भारताची दमछाक करणाऱ्या किवींना कमी लेखणे योग्य नाहीच. सध्या उभय संघांना प्रतीक्षा आहे कसोटी सामन्यांची. कसोटी सामन्यांमध्ये ज्याप्रमाणे जास्त वेळ तग धरणारे फलंदाज खेळपट्टीवर असावे लागतात त्याचप्रमाणे लय, वेग सांभाळून गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांचीही आवश्यकता असते.

भारताच्या स्वागतासाठी उसळणाऱ्या खेळपट्टय़ा
हॅमिल्टन, १६ मार्च / पीटीआय

भरपूर गवत असलेल्या आणि त्यावर चेंडू हमखास उसळणाऱ्या खेळपट्टय़ा, न्यूझीलंडविरुद्ध बुधवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याकरिता भारतीय संघाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. त्यामुळे चेंडू आणि बॅट यांच्यात रंगणारे युद्ध काही निराळेच ठरणार आहे. ऑकलंडच्या इडन पार्कवर झालेल्या शेवटच्या लढतीत गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी देऊन न्यूझीलंडने भारतीय फलंदाजांची जणू परीक्षाच घेतली होती.

मे महिन्यात आयपीएल खेळण्यास इंग्लिश खेळाडूंची असमर्थता
सरकारला हवा कार्यक्रमात पुन्हा बदल
मुंबई, १६ मार्च / क्री. प्र.
‘इंडियन क्रिकेट लीग’च्या पाठी लागलेल्या समस्या कमी होण्याऐवजी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. केंद्र सरकारने निवडणूकांदरम्यान क्रिकेट सामन्यांना सुरक्षा देण्यासाठी राज्यांना जादा कुमक देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि दिल्ली यांना निवडणुकांदरम्यान क्रिकेट सामन्यांना सुरक्षा पुरविण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. याचाच अर्थ आयपीएल स्पर्धा अन्यत्र हलवावी लागेल किंवा मे महिन्यात खेळवावी लागेल. आयपीएल स्पर्धा मे महिन्यात खेळविल्यास समस्यांचा दुसरा अध्याय सुरू होईल. ऑस्ट्रेलियाच्या साऱ्या प्रमुख खेळाडूंनी या स्पर्धेकडे पाठ फिरविली आहे.

देवधर करंडक क्रिकेट : पश्चिम विभाग अंतिम फेरीत
झिम्बाब्वे अध्यक्षीय इलेव्हन संघावर सहा विकेट्सने विजय
चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक ' इक्बाल अब्दुल्लाचे तीन बळी

कटक, १६ मार्च/ पीटीआय

देवधर करंडकाच्या उपान्त्य फेरीतील सामन्यात पश्चिम विभागाने झिम्बाब्वे अध्यक्षीय इलेव्हन संघावर सहा विकेट्सने विजय संपादन करीत अंतिम फेरीत सहज प्रवेश केला आहे. पश्चिम विभागाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला तो फिरकीपटू इक्बाल अब्दुल्ला आणि चेतेश्वर पुजाराने. अब्दुल्लाने तीन विकेट्स घेत पश्चिम विभागाच्या विजयाचा पाया रचला तर पुजाराने अर्धशतक झळकावित त्यावर कळस चढविला. अंतिम फेरीत पश्चिम विभागाचा सामना पूर्व विभागाविरूद्ध होणार आहे.

कलमाडी म्हणतात
आयपीएल पुढे ढकला!
नवी दिल्ली, १६ मार्च / पीटीआय

लोकसभेच्या निवडणुकांनंतरच इंडियन प्रीमियर लीगच्या स्पर्धेचे आयोजन करावे अन्यथा या स्पर्धेदरम्यान काही बरेवाईट घडले तर २०१०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान सुरक्षाव्यवस्थेची मोठी समस्या निर्माण होईल, असे मत भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला आणि आता एप्रिल-मे कालावधीत होणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या वर्षीच्या आयोजनावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.

ट्वेन्टी-२०त इंग्लंडवर विंडीज भारी
पोर्ट ऑफ स्पेन , १६ मार्च/ वृत्तसंस्था

विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत झालेल्या पराभवातून सावरण्यासाठी धडपडत असलेल्या इंग्लंडला पुन्हा एक धक्का बसला असून रविवारी झालेल्या ट्वेन्टी-२० लढतीत यजमान संघाकडून पाहुण्या संघाला पराभव स्वीकारावा लागला. विंडीजने पाहुण्या इंग्लंडचा सहा विकेट आणि दोन षटकांचा खेळ शिल्लक राखून पराभव केला. अर्धशतकी खेळी करत विंडीजच्या विजयात उल्लेखनीय योगदान देणारा रामनरेश सरवान सामानावीर ठरला.

महिला विश्वचषक क्रिकेट : पाकिस्तानला हरवित ऑस्ट्रेलियाचे आव्हान कायम
सिडनी, १६ मार्च/पीटीआय

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला १०७ धावांनी हरवित महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याच्या आशा कायम राखल्या. भारताविरुध्द अनपेक्षित पराभव स्वीकारणाऱ्या ऑस्ट्रेलियाने आज प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद २२९ धावा केल्या, त्यावेळी त्यांच्याकडून श्ॉली नित्शुके (५६), लीह पॉल्टॉन (४७) व लॉरेन एब्सरी (५१) यांनी शैलीदार फलंदाजी केली. नित्शुके व पॉल्टॉन यांनी सलामीसाठी १०० धावांची भागीदारी केली.

महाराष्ट्र श्री स्पर्धेतही प्रशांत साळुंखे सर्वोत्तम
पुणे, १६ मार्च / क्री. प्र.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारीतील भोसरी येथे झालेल्या महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या प्रशांत साळुंखेने आपल्या जबरदस्त शरीरसौष्ठवाने पुन्हा एकदा बाजी मारली आणि महाराष्ट्र श्री किताबासह १ लाख ५१ हजार रुपयांचे, राज्य स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वोच्च इनामही पटकावले. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि महेश लांडगे क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत १९ जिल्ह्य़ांतील २०३ स्पर्धकांचा सहभाग लाभला होता आणि भोसरी येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या स्टेडियमवर १० हजार क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेचा आनंद लुटला.

आयसीसी क्रमवारीत सेहवागचा बोलबाला
दुबई, १६ मार्च/ पीटीआय

एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसे काढणाऱ्या स्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवागचा बोलबाला नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीतही पहायला मिळाला आहे. सेहवागने सहा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच ‘टॉप टेन’ मध्ये प्रवेश केला असून याच मालिकेत दिड शतक झळकाविणाऱ्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘टॉप २०’ मध्ये प्रवेश केला आहे. तर डावखुरा फलंदाज युवराज सिंगने कारकिर्दीत पहिल्यांदाच अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिसरे स्थान पटकाविले आहे.

चॅम्पियन्स करंडक दक्षिण आफ्रिकेत
दुबई, १६ मार्च / पीटीआय

सुरक्षेच्या कारणांमुळे पाकिस्तानकडून चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे हक्क काढून घेतल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळविण्याचा औपचारिक निर्णय घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समितीने केलेली शिफारस आयसीसीच्या कार्यकारिणीने मंजूर केली असून ही स्पर्धा जोहान्सबर्ग (वॉन्डर्स) व सेन्चुरियन येथे खेळविण्यास प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. २४ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. आयसीसीचे अध्यक्ष डेव्हिड मॉर्गन यांनी हा विचारपूर्वक घेण्यात आलेला निर्णय असल्याचे म्हटले आहे. वॉन्डर्स व सेन्चुरियन ही दोन जागतिक दर्जाची स्टेडियम्स या स्पर्धेसाठी उपलब्ध होऊ शकणार आहेत, शिवाय, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील हवामानही आदर्शवत असते.चॅम्पियन्स जोड कुल शब्द श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डांनी ही स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दाखविल्याबद्दल मॉर्गन यांनी या बोर्डाचे आभार मानले. सप्टेंबर-ऑक्टोबरमधील श्रीलंकेतील वातावरण पाहता तेथे स्पर्धा घेणे उचित ठरले नसते हे ओळखून दक्षिण आफ्रिकेची शिफारस करण्यात आली आणि शेवटी तिला मंजुरीही मिळाली. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरून लॉरगॅट यांनी संयुक्त अरब अमिरातीचे आभार मानून त्यांनी ही स्पर्धा आयोजित करण्याची जी इच्छा व्यक्त केली होती.

आशियाई मुष्टियुध्द स्पर्धेसाठी अखिलकुमार आशावादी
नवी दिल्ली, १६ मार्च/पीटीआय
आगामी आशियाई मुष्टियुध्द स्पर्धेतील फीदर वेट गटात पदक मिळविण्याबाबत ऑलिम्पिकवीर अखिलकुमार आशावादी आहे. या गटात तो प्रथमच उतरणार आहे. बीजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅन्टम वेट गटात अखिलकुमार सहभागी झाला होता. त्यावेळी त्याचे पदक थोडक्यात हुकले होते. डर्बनमधील फिजिओ हीथ मॅथ्युज यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. मित्तल ट्रस्टने पुरस्कृत केलेल्या दोन आठवडय़ांच्या या शिबिरात अखिलकुमार सहभागी झाला होता. हे शिबिर शारीरिक क्षमता व तंदुरुस्ती वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त होते असे सांगून अखिलकुमार म्हणाला, आशियाई मुष्टियुध्द स्पर्धेतील फीदर वेट गटात मुष्टियुध्द स्पर्धेतील फीदर वेट गटात मी प्रथमच सहभागी होणार आहे, त्यामुळे सुरुवातीस अव्वल दर्जाचे यश मिळविण्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत व त्यासाठी मी कसून सराव करीत आहे. वरच्या वजनी गटात स्पर्धा खूप असते तथापि आशियाई मुष्टियुध्द स्पर्धेतील फीदर वेट गटात मी किमान ब्रॉन्झपदक मिळवीन. अखिलकुमारने गतवर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील बॅन्टमवेट गटात ब्रॉन्झपदकाची कमाई केली होती. हरियानाच्या या २७ वर्षीय मुिष्टयोध्दाकडून आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही अव्वल दर्जाच्या कामगिरीची अपेक्षा आहे.

समरवीरा, मेंडिस अजूनही दवाखान्यातच
कोलंबो, १६ मार्च / पीटीआय
पाकिस्तान दौऱ्यात श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील जखमींपैकी थिलन समरवीरा व अजंता मेंडिस अजूनही रुग्णालयातच उपचार घेत असल्याचे संघाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. लाहोरमध्ये झालेल्या या हल्ल्यात श्रीलंकेचे तब्बल सात खेळाडू जखमी झाले होते. त्यापैकी समरवीराच्या मांडीत गोळी घुसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. तर मेंडिसच्या डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत झाल्याने त्याचीही परिस्थिती चिंताजनक होती. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख गीथांजन मेंडिस यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘ थरंगा परानविताना याच्याही छातीजवळ गोळी लागली होती.

नदालची आगेकूच
इंडियाना वेल्स, १६ मार्च/पीटीआय

विम्बल्डन विजेत्या रॅफेल नदालने इंडियाना वेल्स चषक टेनिस स्पर्धेत तिसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. त्याने मायकेल बेरॉर याच्यावर ६-२, ६-१ असा दणदणीत विजय मिळविला.
नदालने २००७ मध्ये या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. नदालने आजचा सामना अवघ्या ६७ मिनिटांत जिंकला. त्याने फोरहॅन्डच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ केला. गतविजेत्या नोव्हाक जोकावीचनेही आज तिसऱ्या फेरीकडे आगेकूच केली. त्याने मार्टिन अ‍ॅंग्युलो याचा ७-५, ६-४ असा पराभव केला. नोव्हाकची आता टॉमी हासबरोबर लढत होणार आहे. दिमित्री तुर्सुनोव्हा यानेही तिसरी फेरी गाठली, मात्र त्यासाठी त्याला चिवट संघर्ष करावा लागला. त्याने उत्कंठापूर्ण लढतीत मायकेल रसेल याच्यावर ७-६(७-५), ४-६, ६-३ असा निसटता विजय नोंदविला.