Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच सर्व पक्षांनी ठाण्यात ठिकठिकाणी लावलेले बॅनर्स पालिका अधिकाऱ्यांनी तडकाफडकी काढून ते अडगळीत टाकून दिले.

टीएमटीच्या सक्षमीकरणासाठी निलंबित अधिकाऱ्यांना आवतण
संजय बापट

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत कोठेही वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे परिवहन सेवांमध्ये एक प्रकारची स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत उतरण्यासाठी ठाणे परिवहन सेवा (टीएमटी) सक्षम केली जाणार असून, त्यासाठी चक्क परिवहनमधीलच निलंबित अधिकाऱ्यांना आवतण देण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र ज्या अधिकाऱ्यांनी परिवहनला रसातळाला नेले त्यांना पुन्हा घेण्यास कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.

भिवंडी महापौरांनी केली पाणी खर्चात २.७५ कोटींची बचत!
सोपान बोंगाणे

टेमघर येथील पाणीपुरवठा प्राधिकरणामार्फत (स्टेम) ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर व इतर ३४ गावांना होणाऱ्या पाणीपुरवठय़ाच्या दरांची शासनाने पुनर्रचना केली आहे. त्यात भिवंडी महापालिकेच्या पाणीपुरवठय़ाच्या सध्याच्या दरात प्रत्येक दशलक्ष लिटर्समागे एक हजार रुपयांची कपात करण्यात आल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठय़ावर होणाऱ्या वार्षिक खर्चात तब्बल पावणेतीन कोटी रुपयांची आर्थिक बचत झाली आहे.

राजकारण्यांपेक्षा देशाला सामाजिक कार्यकर्त्यांची अधिक गरज - मनोहर जोशी
ठाणे/प्रतिनिधी

दुसऱ्याच्या व्यथा पाहून ज्याच्या डोळ्यात पाणी येते असाच माणूस खऱ्या अर्थाने संघटक होऊ शकतो. दुर्बल आदिवासींच्या हक्कासाठी ऐन तारुण्यात विवेक पंडित यांनी स्वत:ला संघटनेच्या कामात झोकून दिले, म्हणूनच ते यशस्वी संघटक होऊ शकले. राजकारण्यांपेक्षा अशा सामाजिक कार्यकर्त्यांचीच देशाला खरी गरज आहे, असे प्रतिपादन लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी ‘माणूस म्हणून जगण्यासाठी’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी केले.

शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते बंडाच्या पवित्र्यात!
कल्याण/प्रतिनिधी -
चिमूरच्या बदल्यात कल्याण आणि कल्याणच्या बदल्यात काहीच मिळणार नसेल तर आम्ही पण आमचा रंग ऐन निवडणुकीत दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इरादा कल्याण डोंबिवली, ग्रामीण भागातील भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जाहिर केला आहे.
कल्याण लोकसभेसाठी भाजपला उमेदवारी नाकारून शिवसेनेने ठाणे जिल्ह्य़ातून भाजपचे अस्तित्व नष्ट करण्याचे षडयंत्र तयार केले आहे. या षडयंत्राला भाजपचे नेते बळी पडतील पण कार्यकर्ते अजिबात बळी पडणार नाहीत.

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत अक्षय पाटील यास सुवर्णपदक
भिवंडी/वार्ताहर

क्रिकेट खेळाच्या नावलौकिकामुळे इतर क्रीडा क्षेत्रातील खेळांकडे, स्पर्धेकडे शहर, खेडय़ातील तरुण दुर्लक्ष करीत असताना खेळाचेसुद्धा महत्त्व कमी होत असताना, भिवंडी तलुक्यातील एका खेडय़ातील तरुणाने चक्क आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविल्याने सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे. मुंबई येथे नुकतीच १४ वी आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतासह श्रीलंका, मलेशिया, नेपाळसहित सात देशांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत भिवंडी तालुक्यातील दाभाड गावातील गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला १३ वर्षीय अक्षय सदाशिव पाटील याने भाग घेऊन कराटेमध्ये भरीव प्रात्यक्षिके सादर करून सुवर्णपदक पटकाविल्याने दाभाड परिसरातून व भिवंडी तालुक्यातून या गरीब शेतकऱ्याच्या मुलावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. अक्षय पाटील याने आतापर्यंत कराटे स्पर्धेत तीन गोल्ड आणि तीन कांस्यपदके मिळविली आहे.

भिवंडीत दागिने लुटमारीच्या घटना वाढल्या
भिवंडी/वार्ताहर:
शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठाकूरपाडा आणि भादवड येथील दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे अज्ञात चोरटय़ांनी पळवून नेल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सरवली- ठाकूरपाडा येथे राहणारी महिला शीला दिलीप ठाकरे (४५) ही हायवे रोडजवळील वाटिका हॉटेल समोरून पायी जात असताना एका मोटारसायकलवरून दोन अनोळखी इसम समोर येऊन त्यांनी शीला हिच्या गळ्यातील सात तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसका मारून पळवून नेले, तर भादवड आदिवासी पाडय़ात राहणारी निर्मला सुरेश कोठारी शांतीनगर पाइपलाइनजवळून जात असताना एक ग्रॅमचे मंगळसूत्र आणि सहा ग्रॅमची सोन्याची माळ एका अज्ञात चोरटय़ाने गळ्यास हिसका मारून पळवून नेली. या घटनांचा गुन्हा शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

कल्याण - डोंबिवली पालिकेला जागतिक मंदीचा जकातीच्या माध्यमातून फटका
डोंबिवली / प्रतिनिधी

राज्यातील महापालिकांना जागतिक मंदीचे जकातीच्या माध्यमातून चटके बसण्यास सुरूवात झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेला जकातीच्या माध्यमातून सुमारे दोन कोटीचा जकातीचा फटका बसणार आहे. या बुडीत महसुलाचा परिणाम काही प्रमाणात विकास कामांच्या उभारणीवर होणार आहे. मंदीच्या लाटेमुळे मुंबई पालिकेला जकातीमधून ४०० कोटीची घट होणार आहे, ठाणे पालिका १९ कोटी, पुणे १३५ कोटी, पिंपरी-चिंचवड ३१ कोटी, नाशिक ३५ कोटी, कोल्हापूर १ कोटीचा फटका बसणार आहे. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेला सुमारे दोन कोटीचा फटका जकातीच्या माध्यमातून बसणार आहे. कल्याण पालिकेला एनआरसी कंपनी कडून आठ कोटी, एस्कॉर्टच्या माध्यमातून सुमारे दीड कोटीचा महूसल जकातीच्या माध्यमातून दरवर्षी मिळत होता. ‘एनआरसी’ कंपनीतील अनेक विभाग बंद पडल्यामुळे पालिकेला या कंपनीकडून फक्त ७५ लाखाचा महसूल मिळाला आहे, तर मुंब्रा वळण रस्ता चोविस तास सुरू राहत असल्याने शिळफाटा येणारी वाहने त्या मार्गाने जात असल्याने एस्कॉर्टच्या महसुलात घट झाली आहे.

नवविवाहितेच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक
शहापूर/वार्ताहर :
जीप घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये न आणल्याने सासरच्या मंडळींनी नवविवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना डोळखांब परिसरातील बोंद्रेचा पाडा गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. हिंगळूद येथील हरी घरत यांच्या मुलीचा एक वर्षांपूर्वी बोंद्रेचा पाडा येथील दिनेश गणपत बोंद्रे यांच्याशी विवाह झाला होता. गेले वर्षभर दिनेश व त्याचे आई-वडील, भाऊ आणि जाऊबाई यांनी जीप घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आणण्याचा तगादा बेबी ऊर्फ दीपिकाकडे तगादा लावला होता. माहेरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिने पैसे न आणल्याने तिचा मानसिक व शारीरिक छळ सासरच्यांनी चालविला होता. १२ मार्च रोजी भरदिवसा सासरच्या मंडळींनी दीपिकाला बेदम मारहाण करून तिची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली. दीपिकाच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा व तोंडातून आलेले रक्त पाहून मुलीच्या वडिलांनी किन्हवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दीपिकाचा पती दिनेश बोंद्रे, दीर रमेश व रघुनाथ या तिघांना अटक केली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास कोळी करीत आहेत.