Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
व्यक्तिवेध

महाराष्ट्राच्या ग्रामीण क्षेत्रातल्या सुमारे २७ हजारहून अधिक स्त्रियांना स्वयंसिद्धा बनविणाऱ्या कांचन परुळेकर यांना या वर्षीचा सारडा समान संधी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कांचनताईंनी स्थापन केलेली ‘स्वयंसिद्धा’ ही स्वयंसेवी संस्था महिला सक्षमीकरणाचे उपक्रम राबविणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांची प्रेरणास्थान झाली आहे आणि ‘स्वयंसिद्धा’ हे जणू कांचनताईंचे सार्थ विशेषण ठरले आहे. २३ एप्रिल १९५२ रोजी गरीब पण संस्कारांनी श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या कांचन परुळेकर यांची बुद्धिमत्ता आणि समाजाविषयीची कळकळ त्यांच्या १३व्या वर्षीच कोल्हापूरचे आमदार डॉ. व्ही. टी. पाटील यांनी हेरली. त्यांच्या शिक्षणाची सारी जबाबदारी त्यांनी घेतली. इंग्रजी साहित्यात एम. ए., शिक्षणविषयक पदविका घेऊन प्रथम १९६८ ते १९७८ शाळेत अध्यापन आणि एन. सी. सी. ऑफिसर म्हणून काम केल्यावर कांचन परुळेकर यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली. १९८६ मध्ये त्यांना बँक मॅनेजर म्हणून बढती

 

मिळाली. परंतु समाजाविषयीचा विचार त्यांना स्वस्थ बसू देणारा नव्हता. त्यातूनच त्यांनी ‘स्वयंसिद्धा’ या संस्थेची स्थापना केली. त्यासाठीही डॉ. व्ही. टी. पाटील यांचे साहाय्य मिळाले आणि १९९२ मध्ये डॉ. पाटील यांच्या घरातूनच आणि त्यांनी देऊ केलेल्या ५० हजार रुपयांच्या अर्थसाहाय्याने कांचनताईंनी ‘स्वयंसिद्धा’ चे काम सुरू केले. कोल्हापूर आणि राधानगरी या शहरी विभागांबरोबरच मल्लेवाडी, सारोळी, बुजवणे, शिरसे, सातवे, माजगाव आदी ग्रामीण विभागातल्या महिलांना त्यांनी सामुदायिक शेती, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन या व्यवसायांबरोबरच विविध गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन आणि बाजारपेठेत त्यांची विक्री करण्याचे तंत्र यांचे प्रशिक्षण या संस्थेतर्फे द्यायला सुरुवात केली. यशोगामी हा स्वयंसिद्धाचा प्रशिक्षण विकास उपक्रम. या उपक्रमाद्वारे १९८७ पासून हजारो महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कृषीसेवक योजनेअंतर्गत १००० महिलांना अर्थार्जनाची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बचतगटाच्या १३ हजार महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी २५० प्रशिक्षिकांना तयार करण्यात आले. त्याद्वारे शिवणकाम, भरतकाम, स्क्रीन प्रिंटिंग, विणकाम, दागिने बनवणे, जॅम, जेली, लोणची, साबण, मेणबत्त्या, पर्स बनवणे इत्यादींचे शिक्षण दिले जाते. ‘बुधवार बाजार’ या प्रकल्पाच्या रूपाने महिलांना उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. स्वत: कांचन परुळेकरांनी मार्केटिंगच्या तंत्राचा अभ्यास करूनच बाजारपेठेत मागणी असणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनासाठी महिलांना उद्युक्त केले आहे. गडहिंग्लजसारख्या भागात ७२ देवदासींना फॅशन डिझायनिंग, पर्स बनवणे, दागिने बनवणे यांसारख्या कलांचे प्रशिक्षण दिले आणि त्यातून त्यांना अर्थार्जनाचा मानाचा मार्ग दाखवून, त्यांची त्यांच्या पारंपरिक व्यवसायातून केलेली मुक्तता हा कांचन परुळेकरांच्या सामाजिक कार्यातला एक अत्यंत महत्त्वाचा पैलू. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्था, दिवाळी धमाका, दिल्ली हाटसारखे उपक्रमही त्यांच्या मार्गदर्शनात स्वयंसिद्धाने चालवले आहेत. त्यातून महिला स्वावलंबी होऊन कुटुंब चालवू लागल्या, त्याचप्रमाणे अनेक शाळकरी मुलीही अर्थार्जन करून पुढील शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करू लागल्या आहेत. ‘कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत ३००० विद्यार्थिनींनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. या संदर्भात केटरिंगच्या व्यवसायातून आपल्या एम. बी. ए.च्या शिक्षणाची तरतूद करणाऱ्या गौरी कर्पे पाटीलचे उदाहरण देता येईल. मार्गदीप हाही असाच विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणारा उपक्रम. गावागावात आजारपणात मदत करण्यासाठी स्वयंसिद्धाद्वारे ‘आरोग्यं धनसंपदा’ हा प्रकल्प राबवला जातो. आरोग्य शिबिरं घेतली जातात. खऱ्या अर्थाने स्वावलंबनाचा आविष्कार असे कांचन परुळेकरांच्या या संपूर्ण कार्याचे आणि प्रेरणेचे वर्णन करता येईल. एव्हाना या संस्थेचा व्याप महिलांच्या या सक्षमीकरणापलीकडे वाढत एकूण समाजाच्या विविधांगी विकासाच्या दिशेने होऊ लागला आहे. स्वत:चा उद्धार स्वत:च्या हस्ते या तत्त्वाचे आचरण करूनच व्यक्ती आणि समाज खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकतो याचा वस्तुपाठच आपल्या अथक प्रयत्नांतून घालून देणाऱ्या कांचन परुळेकरांचा हा गौरव म्हणूनच अर्थपूर्ण आहे. सारडा पुरस्काराच्या सात लाख ५१ हजार रुपयांचा हातभार त्यांच्या कार्याला लागेल ही आणखी एक चांगली गोष्ट.