Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९

निवडणूक जाहीर झाली तरी नागपुरातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात अद्याप शुकशुकाट आहे. पहिले छायाचित्र काँग्रेसच्या, दुसरे भाजपच्या तर तिसरे शिवसेनेच्या कार्यालयाचे.

खाद्य तेलात भेसळ; चंद्रपुरात गुन्हा
चंद्रपूर, १६ मार्च / प्रतिनिधी

ग्राहकांना देण्यात येणाऱ्या खाद्य तेलामध्ये मोठय़ा प्रमाणावर भेसळ केली जात असल्याचा प्रकार आज येथे उघडकीस आला. या प्रकरणात दोषी असलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी सरकारनगरमधील शेकडो नागरिकांनी आज रामनगर पोलीस ठाण्यात धरणे दिले. प्राथमिक चौकशीनंतर अन्न व औषध प्रशासनाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सरकारनगर परिसरात विलास गोरशेट्टीवार यांचे गजानन ट्रेडर्स या नावाने किराणा दुकान आहे. या दुकानातून स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अशोक मुसळे यांनी २ फेब्रुवारीला ‘स्वाद’ या कंपनीचा खाद्य तेलाचा डबा खरेदी केला. हा डबा घरी नेल्यानंतर उघडून बघितले असता तेलाच्या वर पाणी तरंगताना दिसत होते.

पैशासाठी मातेचा खून
आकोट , १६ मार्च / वार्ताहर

पैशासाठी मुलाने मातेचा खून केल्याची घटना आकोट शहरात रविवारी उघडकीस आली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला त्याच्या पत्नी आणि मित्रासह पोलिसांनी खामगाव येथून अटक केली. आकोट शहरातील कबुतरी मैदान परिसरात असलेल्या रामलीला अपार्टमेंटमध्ये रविवारी दुपारी ही थरारक घटना घडली. पतीच्या निधनानंतर मुलगा प्रतीक आणि सून शिल्पा हिच्यासोबत हर्षां संघाणी (४६) राहत होत्या.

‘जायंट किलर’
स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीने संपूर्ण विदर्भात दबदबा निर्माण करणारे तत्कालीन खासदार जांबुवंतराव धोटे एकीकडे आणि राज्यसभेचे उपसभापती बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे दुसरीकडे अशी ही १९७७ ची निवडणूक. दोन बलाढय़ प्रतिस्पध्र्यासमोर किमान ‘डिपॉझिट’ वाचावे आणि पक्षाची नामुष्की टळावी म्हणून काँग्रेसने नागपुरातून दिलेली उमेदवारी अखेर ‘जायंट किलर’ ठरवून गेली. स्वतंत्र विदर्भाची चळवळ शिगेला पोहोचलेली असताना आणि देशभरात विरोधी लाट असताना काँग्रेसच्या गोटात नागपूरच्या जागेसाठी कोणता उमेदवार द्यावा, हा प्रश्न पक्षनेत्यांसमोर उभा ठाकला.

उमेदवार जाहीर करण्यात शिवसेनेची बाजी!
बुलढाणा, १६ मार्च / प्रतिनिधी

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने प्रतापराव जाधव यांची उमेदवारी घोषित करून लढाईच्या सलामीलाच बाजी मारली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसच्या जागा वाटपाचा घोळ सुरू आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार हक्क सांगत आहे. काँग्रेसदेखील या जागेसाठी अडून बसली आहे. शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे एक प्रबळ उमेदवार समजले जातात. दोन महिन्यांपूर्वीपासूनच त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे.

मताधिक्य: कुणाचे वाढणार, कुणाचे घटणार?
संजय धोत्रे: विदर्भात टॉपवर

पीयूष पाटील, नागपूर, १६ मार्च

चौदाव्या लोकसभेसाठी २००४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये विदर्भात बहुतांश जागांवर एकतर्फी किवा मोठय़ा मताधिक्याने विजयी झालेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. मात्र पंधराव्या लोकसभेसाठी मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर अनेक उमेदवारांच्या मताधिक्यात फरक पडण्याची शक्यता आहे.

निवडणुकीपुरते नातेवाईक
निवडणूक जाहीर झाली की संभाव्य उमेदवाराकडे कार्यकर्त्यांची गर्दी वाढते. यात सल्ला देणाऱ्यांची संख्या अधिक असते. राजकीय युध्दाची वेळ आल्याने नेते सुध्दा शांतपणे सर्वाचे ऐकून घेतात. सध्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांना एका नव्या पेचाला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडे येणारा प्रत्येक कार्यकर्ता वणी व आर्णीत आपले नातेवाईक किती जास्त आहेत हेच मोठय़ा गर्वाने सांगू लागले आहे. वणी व आर्णीचा भाग या लोकसभा मतदार संघात नव्याने जोडला गेला आहे. त्यामुळे उमेदवारांना या भागात प्रचार यंत्रणा उभारणे जरा जिकरीचे आहे. नेमके तेच लक्षात घेऊन आता कार्यकर्त्यांच्या या भागातील नातेवाईकांची यादी लांबत चालली आहे. त्यांचे हे कथित नातेवाईक मतदानात नेमके किती मदतीला येतात, हे लवकरच कळणार आहे. पण सध्यातरी नेत्यांना या नातेवाईकांच्या वाढत्या यादीवर विश्वास ठेवणे भाग आहे.

पित्याने केली कन्येची हत्या
चिखली, १६ मार्च / वार्ताहर

पुत्ररत्नाच्या प्राप्तीसाठी वेडय़ा झालेल्या नराधमाने दारूच्या नशेत स्वत:च्या केवळ दोन वर्षीय चिमुकलीला भिंतीवर आपटून ठार मारल्याची घटना देवदरी येथे घडली. गेल्याच आठवडय़ात पत्नी व मेव्हण्यावरील राग काढत चार वर्षीय कन्येची हत्या एका दारूडय़ाने केली होती. रविवारी अमडापूर पोलीस ठाण्यांतर्गत देवदरी येथे झालेल्या या दुसऱ्या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. राजेंद्र फाटे (३१) याला त्याची पत्नी रेखापासून दोन मुली झाल्या. मुलगा नसल्याने तो अस्वस्थ राहत होता. रविवारी राजेंद्रने पत्नीसोबत यावरूनच वाद घातला व ‘वर्षां’ या चिमुकलीवर राग काढला. निर्दयपणे भिंतीवर आपटून त्याने चिमुकलीचा प्राण घेतला. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

दादमहल वॉर्डात हातपंपांचे लोकार्पण
चंद्रपूर, १६ मार्च / प्रतिनिधी

दादमहल वॉर्डातील पाणी टंचाई लक्षात घेता अहीर कुटुंबीयांनी कालीदास अहीर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या दोन हातपंपांचे लोकार्पण हितेंद्र अहीर यांच्या हस्ते पार पडले. दादमहल वॉर्डातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सदर टंचाई लक्षात घेऊन पालिकेने या वॉर्डात हातपंपाची व्यवस्था करावी, अशी मागणी वॉर्डातील लोकांकडून वारंवार केली जात होती. मात्र, पालिकेने या मागणीकडे सतत दुर्लक्ष केल्याने लोकांची ही मागणी पालिकेच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकली नाही. ही बाब लक्षात घेऊन अहीर कुटुंबीयांनी दादमहल वॉर्डातील शितलामाता मंदिराजवळ व काजीपुरा येथील नवीन मशिदीजवळ हातपंपाची व्यवस्था करून लोकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. काजीपुऱ्यात फातीया पठाणने हातपंपाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे शेख इनायत, नंदू नागरकर, शिवसेनेचे अनिल वनकर, सुनील खांडरे, किशोर पोतनवार, जाकीर हुसेन शेख, जुबेदाबी काजी, अनुप चिवंडे, विजय पराते, अजय कोंडलेवार, प्रशांत चिंतावार, विलास सोमलवार, तेजा सिंग, अरुण आइटलावार, प्रदीप पोतनवार, अशोक खडके, बिट्टरवार, चंद्रकांत होकम, मधुकर गुजरकर, दिलीप गड्डमवार, शाकीर काजी, जावेद काजी, राजा काजी, बंडू श्रीकोंडवार, विलास पवार आदी उपस्थित होते.

जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयास ‘अ’ श्रेणी
यवतमाळ, १६ मार्च / वार्ताहर

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयास आणि महाविद्यालयासाठी संलग्न सर्व शाखांना भारत सरकारच्या राष्ट्रीय अधिस्विकृती मंडळाने (एनबीए) अ श्रेणीची अधिस्विकृती दिली आहे. संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एनबीएचे डॉ. संदीप संचेती व त्यांच्या चमूने महाविद्यालयाच्या सर्व शाखांचे तीन दिवसपर्यंत निरीक्षण केले होते व मूल्यांकन करून अ श्रेणी अधिस्विकृती दिली. यवतमाळ नजीक लोहारा एमआयडीसी परिसरानजीक महाविद्यालयाची सर्व सोयींनी युक्त आकर्षक इमारत ग्रंथालय, संगणीकृत कार्यप्रणाली व प्रयोगशाळा यांचा समितीने गौरवाने आपल्या अहवालात उल्लेख केल्याचे संस्थेच्या सचिवांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉ. सुरेंद्र कळसपूरकर, प्रा. डॉ. तुगनायक, प्रा. आमले, प्रा. जावंधीया, डॉ. कोल्हटकर, प्रा. दंदेवार आदी हजर होते.

खजरी, कटंगीच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थी निलंबित
गोंदिया, १६ मार्च / वार्ताहर

नागपूर शिक्षण मंडळाचे सदस्याच्या संस्थेला खजरी येथील आदिवासी विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केन्द्रावर भरारी पथकाने भेट दिली असता केन्द्रातील २१ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्याने या विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले. दुसऱ्या दिवशीही पथकाने ४ विद्यार्थ्यांना केन्द्रावरच निलंबित केले. कटंगीच्या विमलताई कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केन्द्रावर शिक्षणाधिकारी ममता झा यांनी छापा टाकून ८ विद्यार्थ्यांना निलंबित केले. याबाबत पोलीस अधीक्षक यांना केन्द्राध्यक्षानी सूचना देताच परीक्षा केन्द्रावर गुन्हा दाखल केला.

पत्रकार संघाच्या पुरस्कारासाठी आवाहन
बल्लारपूर, १६ मार्च / वार्ताहर

महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रभूषण बाबा आमटे पुरस्कारासाठीही नामांकन पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २००९ मे मध्ये संघाच्या सहाव्या राज्य अधिवेशनात सन्मान चिन्ह, मानपत्र, पुष्पकरंडक व श्रीफळ देऊन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी प्रस्ताव ३० मार्च २००९ पर्यंत स्वीकारले जाणार असून पुरस्कारांची घोषणा ३० एप्रिल २००९ ला करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी मासिक ‘महावार्ता’च्या संपादक शालन कोळेकर, मु.पो. सैतवडे, ता.जि. रत्नागिरी (मो. ९४२१२३२०१५) या पत्त्यावर प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वीज बिल नियमित मिळत नसल्याची ग्राहकांची तक्रार
यवतमाळ, १६ मार्च / वार्ताहर

जिल्ह्य़ात सर्वत्र कंत्राटी पद्धतीने वीज मिटर रिडींग व बिल वाटपाचे काम वीज कंपनीने दिले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभराहून जास्त काळापासून विद्युत ग्राहकांना वीज बिल नियमित येत नसल्याची तक्रार आहे. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व त्यांची चमू थकित वीज बिलांसाठी विद्युत ग्राहकांकडे जाऊन वीज पुरवठा खंडित करीत आहेत. बिलच मिळाले नाही तर त्याचा भरणा आम्ही कसा करणार, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. ग्राहकांना वेळेवर वीज देयक न देणाऱ्या कंत्राटदारावर कंपनीने कारवाई करावी, अन्यथा सर्व वीज ग्राहकांच्यावतीने वीज ग्राहक संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष बापू दर्यापूरकर यांनी दिला आहे. नगरपालिकेचे उपाध्यक्ष राजू जेकब, दत्ता कुलकर्णी, उज्ज्वला भाविक, सचिव कमल मिश्रा, सुधाकर जगताप, सुहास सावरकर, अविनाश धनेवार, डॉ. नारायण मेहरे, आदींच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंत्यांना याबाबत नुकतेच निवेदन सादर केले.

साकोलीत अपघातात एक ठार
साकोली, १६ मार्च / वार्ताहर

वाहनाच्या धडकेने जबर जखमी झालेल्या श्रावण दुना मेश्राम (४५) यांचा उपचारादरम्यान साकोली रुग्णालयात मृत्यू झाला. सावरटोला येथील श्रावण दुना मेश्राम (४५) हे बोंडे या गावी लग्न लावून सायकलने गावी परतत असताना साखरा नर्सरीजवळ वाहनाने धडक दिल्याने ते जबर जखमी झाले. त्यांना पोलिसांनी साकोली रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहन घेऊन पसार झाल्याने त्याचा शोध लागू शकला नाही.

आगीत किराणा दुकानासह ७ घरे जळाली; लाखोचे नुकसान
खामगाव, १६ मार्च / वार्ताहर

अचानक लागलेल्या आगीत ७ घरे जळून जवळपास दीड लक्ष रुपयांचे नुकसान असल्याची घटना सतीफैल भागात रात्री २ वाजताच्या सुमारास घडली. सतीफैलात सरितादेवी बद्रीप्रसाद ठाकूर यांच्या वाडय़ात भाडेकरी राहतात. रात्री भारनियमन असल्याने या घरांमध्ये मेणबत्त्या व दिवे लावण्यात आले होते. दिव्याने पेट घेतल्याने घरात अचानक आग लागली. आगीने उग्ररूप धारण केल्याने ठाकूर यांच्या किराणा दुकानासह ७ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशमन दल तसेच स्थानिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत विजय ताडे, पुंजाजी बोदडे, निर्मला नाटेकर,सचिन उंबरकार, रामदास लाड, हनुमानसिंग ठाकूर, बाळू विटे यांची घरे जळाली आहेत. या घटनेची माहिती मिळताच अशोक सोनोने, प्रवीण कदम, अमोल अंधारे, सै. गणी, राम अहीर, दर्शनसिंह ठाकूर, महेंद्र पाठक, गोलू ठाकूर, सुभाष ठोंबरे, सतीश चौधरी, शेख मुजीब, सलीम चौधरी, पिंटू फंड, गजानन क्षीरसागर, यांनी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांनी आगीचा पंचनामा केला आहे.

गांधी विचार परीक्षेचे आज बक्षीस वितरण
वाशीम, १६ मार्च / वार्ताहर

नशाबंदी मंडळ, गांधी अध्ययन केंद्र आणि सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्यावतीने मंगळवार १७ मार्च रोजी नशाबंदी आणि गांधी विचार परीक्षेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र सवरेदय मंडळाचे अध्यक्ष शंकरराव बगाडे करणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य बालकल्याण समितीच्या अध्यक्ष शकुंतला कासट, सचिव लक्ष्मणराव वागचवरे, आचार्य हरिभाऊ विरुळकर, अ‍ॅड. विनोद खंडेलवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील एस.एम.सी. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर राहणार आहेत.

अकोल्यात शिवजयंती उत्साहात साजरी
अकोला , १६ मार्च / प्रतिनिधी

अकोला शहरात विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवून शिवजयंती साजरी करण्यात आली. अखिल भारतीय हिंदू सेनेच्यावतीने शहरातून मिरवणूक काढण्यात आली. हिंदू युथ जिमको येथे जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला अ‍ॅड. संग्राम गाडगीळ, मनपा स्थायी समिती सभापती सुरेंद्र शर्मा, नगरसेवक दिलीप देशमुख, सेवलकर उपस्थित होते. संतोष डोकणे, नरेंद्रसिंह बैस, मनीष हुडेकर, दिलीप सोनोने, कजबेकर, अशोक पळस्कर, संतोष वाघमारे, रमेश देशपांडे, शिगेवार, राजू झारोकार, संजय झारोकार, गुजर, सुभाष जडीये, सचिन नावकार, सचिन गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते. उमरी परिसरात विद्यार्थी सेनेच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपसरपंच पुंडकर, मनोज निलखन आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन
भंडारा, १६ मार्च / वार्ताहर

पवनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री विलास शृंगारपवार, जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सच्चिदानंद फुलेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दामाजी खंडाईत, नगराध्यक्ष मुकेश बावनकर, उपाध्यक्ष दिनेश गजभिये, पंढरी सावरबांधे, यादव भोगे, दादा गिऱ्हेपुंजे, डॉ. सुनील जीवनतारे, राजू हेडाऊ आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रफुल्ल पटेल यांनी जनसामान्यांचे प्रश्न, बेरोजगारांना रोजगार, न्याय मिळवून देण्याचे कार्य जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून केले जाईल, असे सांगितले. यावेळी प्रफुल्ल पटेल यांना कार्यकर्त्यांनी समस्यांचे निवेदन दिले. यावेळी रवी कोटांगले, मनोज शेंडे, मनोहर मेश्राम व अरुण तेलंगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे संचालन अनिल धकाते यांनी केले.