Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

खाद्य तेलात भेसळ; चंद्रपुरात गुन्हा
चंद्रपूर, १६ मार्च / प्रतिनिधी

ग्राहकांना देण्यात येणाऱ्या खाद्य तेलामध्ये मोठय़ा प्रमाणावर भेसळ केली जात असल्याचा प्रकार आज येथे उघडकीस आला. या प्रकरणात दोषी असलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी सरकारनगरमधील शेकडो नागरिकांनी आज रामनगर पोलीस ठाण्यात धरणे दिले. प्राथमिक

 

चौकशीनंतर अन्न व औषध प्रशासनाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सरकारनगर परिसरात विलास गोरशेट्टीवार यांचे गजानन ट्रेडर्स या नावाने किराणा दुकान आहे. या दुकानातून स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अशोक मुसळे यांनी २ फेब्रुवारीला ‘स्वाद’ या कंपनीचा खाद्य तेलाचा डबा खरेदी केला. हा डबा घरी नेल्यानंतर उघडून बघितले असता तेलाच्या वर पाणी तरंगताना दिसत होते. सुरुवातीला एक दोन दिवस तेलाचा वापर केल्यानंतर यात पाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे मुसळे यांच्या निदर्शनास आले. मुसळे यांनी ही बाब दुकानाचे संचालक विलास गोरशेट्टीवार यांच्या लक्षात आणून दिली. गोरशेट्टीवार यांनीही आजवर शेकडो लोकांकडून अशा तक्रारी प्राप्त झाल्या असून तुम्ही डबा परत करा, तुम्हाला पैसे किंवा नवीन तेलाचा डबा देतो असे सांगितले. मात्र, मुसळे यांनी तेलाचा डबा दुकानदाराकडे परत न करता थेट शेकडो नागरिकांना सोबत घेऊन रामनगर पोलीस ठाणे गाठले आणि भेसळयुक्त तेलाची शहरात सर्रास विक्री होत असल्याची तक्रार दाखल केली.
या तक्रारीची दखल ठाणेदार विनोद इंगोले यांनी घेतली आणि गोरशेट्टीवार व अन्न औषध प्रशासनाचे दोन निरीक्षक यांना बोलावून घेतले. यावेळी अन्न व औषध निरीक्षकांनी तेलाच्या डब्याची तपासणी केली असता यात साठ टक्के खाद्यतेल आणि चाळीस टक्के पाणी निघाले. भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याचे सिद्ध होताच अन्न व औषध पुरवठा निरीक्षकांनी गोरशेट्टीवार यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू केली. गोरशेट्टीवार यांनी गोल बाजारातील छाबनानी यांच्याकडून आपण तेलाची ठोक भावात खरेदी करीत असल्याचे सांगितले. पुरवठा निरीक्षकांनी छाबनानी यांच्या गोल बाजारातील दुकानावर धाड टाकण्याचे निर्देश दिले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत छाबनानी यांच्या गोदामावर छापा टाकण्यात आला नव्हता. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने गोरशेट्टीवार यांच्या विरुद्ध खाद्यतेलात भेसळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील इतरही ठोक विक्रेत्यांकडूनही भेसळयुक्त तेलाची सर्रास विक्री होत असल्याची आणि यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत असल्याच्या तक्रारी यापूर्वी समोर आल्या आहेत. मात्र, अशा ठोक विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. शहरातील गंज वॉर्डात खाद्यतेलाचे पॅकिंग उघडपणे केले जाते. हा संपूर्ण गैरव्यवहार या एकाच गोदामातून होतो, अशी चर्चा आहे. तत्कालीन तहसीलदार ए.के. आझाद यांनी काही महिन्यांपूर्वी या गोदामावर छापा टाकला होता. मात्र, नंतर हे प्रकरण दडपण्यात आल्याची चर्चा आहे. आता मुसळे यांनीच खाद्यतेलाच्या भेसळीचे प्रकरण उघडकीस आणले आहे. विशेष म्हणजे, या तेलात चरबीचे प्रमाणसुद्धा आढळून आल्याचा आरोप मुसळे यांनी केला आहे.
भेसळयुक्त तेलाची विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्यातरी अन्न व औषध प्रशासन विभाग या प्रकरणात कोणती कारवाई करते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.