Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पैशासाठी मातेचा खून
आकोट , १६ मार्च / वार्ताहर

पैशासाठी मुलाने मातेचा खून केल्याची घटना आकोट शहरात रविवारी उघडकीस आली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला त्याच्या पत्नी आणि मित्रासह पोलिसांनी खामगाव येथून

 

अटक केली.
आकोट शहरातील कबुतरी मैदान परिसरात असलेल्या रामलीला अपार्टमेंटमध्ये रविवारी दुपारी ही थरारक घटना घडली. पतीच्या निधनानंतर मुलगा प्रतीक आणि सून शिल्पा हिच्यासोबत हर्षां संघाणी (४६) राहत होत्या. पतीच्या निधनानंतर हर्षां संघानी यांच्या नावे बँकेत असलेल्या सात ते आठ लाख रुपयांवर मुलाचा आणि सुनेचा डोळा होता. या पैशासाठी मुलाने त्यांच्याकडे तगादा लावला होता. अखेर कंटाळून एक लाख रुपये देण्याचे पण, त्यानंतर दोघांनीही घर सोडून जाण्याची अट हर्षां यांनी घातली होती. यावरूनच रविवारी दुपारी त्यांचे कडाक्याचे भांडण झाले.
संतापाच्या भरातच त्याने जन्मदात्या आईला मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. मृतदेह गॅलरीतून खाली फेकून देऊन प्रतीकने पत्नीसह पळ काढला. पल्सर मोटरसायकलने ते खामगावच्या दिशेने गेले. आकोट पोलिसांनी प्रतीकच्या मित्राच्या मदतीने त्यांचा छडा लावला. पैसे संपल्यामुळे प्रतीक भ्रमणध्वनीवरून आकोटच्या मित्राशी संपर्क साधत होता. पोलिसांना तातडीने खामगाव गाठून प्रतीक, त्याचा मित्र हार्दिक आणि पत्नी शिल्पा यांना अटक केली. प्रतीकने आईच्या खुनाची कबुली दिली आहे. अन्य दोघांनी त्याला या कृ त्यात साथ दिली आहे. प्रतीकचा शिल्पाशी प्रेमविवाह झाला होता. यावरूनही त्याचे आईशी नेहमी खटके उडत होते. उपविभागीय अधिकारी हिरासिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अशोक इंगळे, उपनिरीक्षक पवार, बळकट आदींनी या प्रकरणात कारवाई केली. अ‍ॅड प्रवीण कडाळे यांनी प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले.