Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘जायंट किलर’
स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीने संपूर्ण विदर्भात दबदबा निर्माण करणारे तत्कालीन खासदार जांबुवंतराव धोटे एकीकडे आणि राज्यसभेचे उपसभापती बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे दुसरीकडे अशी ही १९७७ ची निवडणूक. दोन बलाढय़ प्रतिस्पध्र्यासमोर किमान ‘डिपॉझिट’ वाचावे आणि पक्षाची नामुष्की टळावी म्हणून काँग्रेसने नागपुरातून दिलेली उमेदवारी अखेर ‘जायंट किलर’

 

ठरवून गेली.
स्वतंत्र विदर्भाची चळवळ शिगेला पोहोचलेली असताना आणि देशभरात विरोधी लाट असताना काँग्रेसच्या गोटात नागपूरच्या जागेसाठी कोणता उमेदवार द्यावा, हा प्रश्न पक्षनेत्यांसमोर उभा ठाकला. तरीही अनेक दिग्गजांनी उमेदवारीसाठी दावा केला. सुशीला बलराज, मदनगोपाल अग्रवाल, रिखबचंद शर्मा आणि हरिभाऊ नाईक यांची नावे आघाडीवर असताना तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नरेंद्र तिडके यांनी माझेही नाव समोर केले आणि मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्यास दुजोरा दिला.
वक्तृत्व स्पर्धा गाजवल्याने विद्यार्थी नेता म्हणून तरुणांमध्ये ओळख होतीच. पण, लोकसभेसाठी जनरल मंचरशा आवारी यांचा पुत्र आणि एक नगरसेवक इतकाच माझा परिचय. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात जांबुवंतराव धोटे यांना ‘टक्कर’ देण्यासाठी तरुण आणि नवीन चेहरा असावा, असे पक्षाने ठरवले. दस्तुरखुद्द इंदिरा गांधी यांनी माझ्या उमेदवारीबद्दल शंका उपस्थित केली. दिल्लीत इतरांप्रमाणेच माझ्या नावाचाही विचार झाला. पण, केवळ डिपॉझिट वाचवणे इतकाच उद्देश असल्याने अखेर माझ्या नावावर शिक्कामोर्तब झाले. माझी उमेदवारी पक्की झाल्याचा मुंबईहून निरोप येताच सुखद धक्का बसला, तितकेच आश्चर्यही वाटले.
फॉरवर्ड ब्लॉक आणि महाविदर्भ संघर्ष समितीचे जांबुवंतराव धोटे आणि खोरिपचे बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे मैदानात उतरले. बॅरि. खोब्रागडे यांना जनता पक्षाने समर्थन दिले. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. उत्तर नागपूर हा खोरिपचा बालेकिल्ला. पूर्व आणि मध्य नागपूर विधासभा मतदारसंघातील हलबा समाजाचे धोटे यांना पूर्ण समर्थन. पूर्व आणि मध्य नागपुरात काँग्रेसच्या प्रचार सभांना वाव नाही. यापूर्वीच्या अनेक सभा उधळून लावण्यात आलेल्या. या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील अनेक भाग असे होते की, ज्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रवेश नव्हता. अशा विषम स्थितीत आम्हीही जोमात प्रचार सुरू केला. विरोधकांकडून ‘वारे शेर आ गया शेर’, ‘वारे इंदिरा तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल’ या घोषणा नागरिकांनी डोक्यावर घेतल्या. अशा स्थितीत आम्ही ‘गाय वासरू, नका विसरू’, ‘गेव्ह आवारी सबपे भारी’ या घोषणा लोकप्रिय करण्यात यश मिळवले.
या निवडणुकीत पक्षाच्या बहुतेक सर्वच नेत्यांनी प्रचारासाठी परिश्रम घेतले. गोळीबार चौकात सभा घेण्याचे ठरले. आम्ही हिंमत करून ही सभा यशस्वी केली. यामुळे दोन दिवसातच गांधीबाग परिसरात सभा घेतली. यात प्रतिस्पध्र्याच्या समर्थकांनी दगडफेक करून गोंधळ घातला व ही सभा उधळून लावली. अर्धे व्यासपीठ उखडून फेकले. यात माजी आमदार यादवराव देवगडे यांच्या डोक्याला मार लागला. पण, मी माईकचा ताबा सोडला नाही. यामुळे प्रतिस्पध्र्याच्या दडपशाहीला आम्ही भीक घातली नाही, असा संदेश मतदारांपर्यंत गेला.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कामठीत जांबुवंतराव धोटे यांच्या यात्रेसमोर आमची यात्रा आली. कोणीही माघार घेण्यास तयार नसल्यामुळे तणावाची स्थिती उद्भवली. उभय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाह्य़ा सरसावल्या. त्याचवेळी मी स्वतहून थेट धोटे यांच्या जीपकडे गेलो आणि चरणस्पर्श करून त्यांना आशीर्वाद मागितले. त्यांनी लगेच मला उचलत आलिंगन दिले. यामुळे मतदारांमध्ये सूचक संदेश गेला.
मतदान सुरळीत पार पडले. किती मते मिळतात याकडे लक्ष लागले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मतमोजणी झाली. उत्सुकता शिगेला पोहोचत गेली. प्रत्येक फेरीत भरघोस मते मिळत गेल्यामुळे आनंद द्विगुणित होत गेला. अखेर निकाल लागला आणि मी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. विजयी मिरवणूक महाराजबागेजवळ आली असतानाच इंदिरा गांधी आणि संजय गांधी पराभूत झाल्याचा संदेश आला. यामुळे विजयोत्सव तेथेच थांबण्यात आला. निवडून आल्यानंतर दिल्लीत इंदिरा गांधी यांची भेट झाली असता, जायंट किलर ठरल्याबद्दल त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.
नितीन तोटेवार