Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

उमेदवार जाहीर करण्यात शिवसेनेची बाजी!
बुलढाणा, १६ मार्च / प्रतिनिधी

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने प्रतापराव जाधव यांची उमेदवारी घोषित करून

 

लढाईच्या सलामीलाच बाजी मारली आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसच्या जागा वाटपाचा घोळ सुरू आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार हक्क सांगत आहे. काँग्रेसदेखील या जागेसाठी अडून बसली आहे. शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे एक प्रबळ उमेदवार समजले जातात. दोन महिन्यांपूर्वीपासूनच त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधील लोकप्रिय किंवा जनाधार असलेला नेताच प्रतापरावांना तुल्यबळ लढत देऊ शकतो. राजकीय निरीक्षकांच्या मते अशी तुल्यबळ लढत देण्याची क्षमता राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे किंवा काँग्रेसचे धृपतराव सावळे यांच्यातच आहे. यांच्याऐवजी या पक्षांनी दुसरा कुठलाही उमेदवार दिल्यास बुलढाण्याची लढत एकतर्फी होण्याची शक्यता आहे. या दोघांऐवजी तिसरा उमेदवार असल्यास लढतीत चुरसच राहणार नाही, असे राजकीय जाणकार मानतात.
सन १९८९, १९९६, १९९९ व २००४ या चार लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा मुकुल वासनिक यांच्यासारखा बलाढय़ उमेदवार असतानाही त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला. सन १९८९ मध्ये सुखदेव नंदाजी काळे सारख्या अगदी सामान्य माणसाने त्यांचा पराभव केला. नंतरच्या काळात नवख्या आणि बाहेरच्या शिवसेना उमेदवार अडसूळ यांनी वासनिकांना धूळ चारली. बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेने आपली पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. गाव पातळीपर्यंत पक्षाचे संघटनात्मक काम आहे. मतदारसंघ खुला झाल्यानंतर पक्षाने जाधव यांना पुढे केले. ते गेल्या पंधरा वर्षांपासून मेहकरचे आमदार आहेत. शिवसेनेने यावेळी एक ‘मास लीडर’ उमेदवार म्हणून त्यांना प्रोजेक्ट केले आहे. धनशक्ती, पक्षीय संघटन व लोकांची सहानुभूती या आधारावर त्यांचे पारडे जड आहे. बहुजन चेहरा ही त्यांची जमेची बाजू आहे.
प्रतापरावांना तुल्यबळ लढत देण्याची राजकीय, सामाजिक, ताकद व क्षमता सध्या बहुजन समाजाच्या दोनच नेत्यांमध्ये आहे. ते म्हणजे राष्ट्रवादीचे नेते व पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि काँग्रेसचे माजी आमदार धृपतराव सावळे. डॉ. राजेंद्र शिंगणे हे गेल्या पंधरा वर्षांपासून सिंदखेडराजाचे आमदार आहेत. गेल्या आठ वर्षांपासून ते मंत्री आहेत. त्यांच्या पाठीशी मराठा माळी या बहुजन समाजासोबत दलित मुिस्लम मतदार एकवटू शकतात. प्रतापरावांच्या सहानुभूतीच्या लाटेला थोपवत ती तोडण्याची धमक शिंगणोंमध्ये आहे. साम, दाम, दंड, भेद या सर्व आयुधांनी देखील ते प्रतापरावांचा भगवा रथ थोपवू शकतात. त्यांच्यात ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असल्यामुळेच राष्ट्रवादी या मतदारसंघावरील हक्क सोडण्यास तयार नाही.
यदाकदाचित हा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्यास वासनिकांनी काँग्रेस उमेदवार म्हणून ज्यांची नावे पुढे केली आहेत तो पोरखेळ समजला जातो. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीएवढा तगडा उमेदवार म्हणून माजी आमदार धृपतराव सावळे यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणातील सर्व डावपेचांमध्ये प्रवीण असलेल्या धृपतरावांमध्ये मैदान गाजवण्याचे कसब आहे.