Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मताधिक्य: कुणाचे वाढणार, कुणाचे घटणार?
संजय धोत्रे: विदर्भात टॉपवर
पीयूष पाटील, नागपूर, १६ मार्च

चौदाव्या लोकसभेसाठी २००४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये विदर्भात बहुतांश जागांवर

 

एकतर्फी किवा मोठय़ा मताधिक्याने विजयी झालेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. मात्र पंधराव्या लोकसभेसाठी मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर अनेक उमेदवारांच्या मताधिक्यात फरक पडण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकांमध्ये पराभव स्वीकाराव्या लागणाऱ्या पक्षांनी यंदा त्यांचे उमेदवार चांगली चाचपणी केल्यानंतरच रिंगणात उतरिवण्याची तयारी केली असल्याने यंदा किती रंगतदार लढती होतील याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
सध्याच्या सत्तारूढ यूपीए सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसला गेल्यावेळी झालेल्या निवडणुकांमध्ये विदर्भात दणदणीत पराभव स्वीकारावा लागला होता. नागपूर वगळता सर्व मतदारसंघात त्यांना पराभवाला तोंड द्यावे लागले होते. निवडणुकांमध्ये विदर्भात भाजप-सेना युतीने ११ पैकी १० जागा जिंकून या भागात निर्विवाद यश मिळवले होते.
गेल्यावेळी झालेल्या निवडणुकांमध्ये भंडारा आणि वर्धा वगळता सर्वच लढती एकतर्फी झाल्या. सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा १ लाख ६ हजार ३७१ मतांनी पराभव करून मिळवला. नागपुरात काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांनी भाजपचे अटलबहादूरसिंग यांचा ९८ हजार ५०० मतांनी पराभव केला.
यवतमाळ मतदारसंघात भाजपचे हरीभाऊ राठोड यांनी १८ वर्षे खासदार असलेले काँग्रेसचे उत्तमराव पाटील यांचा ५६ हजार ८०४ मतांनी पराभव केला. मात्र, २००८ साली विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी पक्षाचा व्हीप झुगारून अनुपस्थित राहिल्याबद्दल राठोड यांना निष्कासित करण्यात आले. वाशीममधून शिवसेनेच्या भावना गवळी यांनी ६० हजारांहून अधिक मतांनी त्यांच्या प्रतिस्पध्र्यावर विजय मिळविला. आता पुनर्रचनेत हे दोन्ही मतदारसंघ एकत्र करण्यात आल्याने येथील चुरस वाढली आहे. चंद्रपुरातून भाजपचे हंसराज अहीर यांनी काँग्रेसचे नरेश पुगलिया यांचा ५९, ८२३ मतांनी, चिमूरमधून भाजपचे महादेव शिवणकर यांनी जोगेंद्र कवाडे यांचा ६३, ३६३ मतांनी आणि बुलढाण्यातून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी काँग्रेसचे मुकुल वासनिक यांचा ५९, ९०७ मतांनी पराभव केला.
गेल्या निवडणुकांमध्ये बहुतांश लढती एकतर्फी झाल्या असल्या तरी काही लढती रंगतदार झाल्या होत्या. यामध्ये अनेक दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला होता. यात केंद्रीय विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल, काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांचा समावेश होता. भंडारा मतदारसंघात भाजपचे शिशुपाल पटले यांनी शरद पवारांचे खंदे समर्थक प्रफुल्ल पटेल यांचा केवळ ३ हजार ९ मतांनी पराभव केला. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांना पराभवाला तोंड द्यावे लागले. भाजपचे सुरेश वाघमारे यांनी त्यांचा ३ हजार १८८ मतांनी पराभव केला. तर रामटेकच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुबोध मोहिते यांनी काँग्रेसचे श्रीकांत जिचकार यांचा १४ हजार मतांनी पराभव केला.