Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

इच्छुक काँग्रेस नेत्यांची दिल्लीत मोर्चेबांधणी
अकोला, १६ मार्च / प्रतिनिधी

अकोला लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी मिळवण्यासाठी अकोल्यातील इच्छुक काँग्रेस

 

नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, त्यासाठी दिल्लीत तळ ठोकला आहे.
काँग्रेसने भारिप-बमसंशी युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असा आग्रह उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांच्या समर्थकांनी पक्षाकडे चालवला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागावाटपाचा घोळ अद्याप संपला नाही. अकोला लोकसभा मतदारसंघ दोनपैकी कोणत्या काँग्रेसच्या वाटय़ाला जाणार, या चर्चेला ऊत आला आहे. भारिप-बमसंशी युती करून भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघावर कब्जा करण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत परंतु, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना विरोध असणाऱ्या अकोल्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी अशी मागणी पक्षाकडे रेटून धरली आहे. अकोल्यात स्वराज्य भवन येथे जानरावआप्पा मोळके यांनी यासाठी उपोषणही केले होते. पक्षाकडून आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी ते मागे घेतले. काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरूकेली आहे. माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर, माजी खासदार अनंतराव देशमुख, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष दे.ना. तिरुख, उदय देशमुख, कृष्णा अंधारे, जानरावआप्पा मोळके, सुरेश अतकरे यांचा यामध्ये समावेश आहे. काँग्रेसचे निरीक्षक मोहनलाल शर्मा यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पक्षश्रेष्ठींकडे यादीही सादर केली. येत्या एक -दोन दिवसात जागावाटपाचा निर्णय होणार असून, त्यानंतर हा गोंधळ कमी होणार आहे. प्रकाश आंबेडकरांशी युती न होता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय होऊन अकोल्याची जागा काँग्रेसच्या वाटय़ाला गेल्यास, बाबासाहेब धाबेकर किंवा अनंतराव देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.