Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘भावना’च्या उमेदवारीचे श्रेय हरिभाऊंनाच!
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ
यवतमाळ, १६ मार्च / वार्ताहर

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वाशीमच्या खासदार भावना गवळी यांना यावेळी मिळालेल्या उमेदवारीचे श्रेय भाजपमधून निष्कासित झालेले व काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले

 

यवतमाळचे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनाच असल्याची मजेदार चर्चा आता सेना, भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू आहे. गंमत अशी की, याच मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून हरिभाऊ राठोड समर्थकांसह दिल्लीत तळ ठोकून आहेत, तर त्यांचा पत्ता कट करून आठव्यांदा उमेदवारी मिळवण्यासाठी माजी खासदार उत्तमराव पाटील पाच डझन नेते आणि कार्यकर्त्यांना घेऊन दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या समोर ठाण मांडून बसले आहेत.
जर हरिभाऊ राठोड यांनी डॉ. मनमोहनसिंग सरकार वाचवण्यासाठी भाजपचा पक्षादेश झुगारला नसता आणि सभागृहात अनुपस्थित राहण्याची कृती केली नसती तर भाजपने त्यांची हकालपट्टी केली नसती. साहजिकच हरिभाऊ काँग्रेसमध्ये गेले नसते. त्यामुळे स्वाभाविकच भाजपचे यवतमाळचे विद्यमान खासदार म्हणून त्यांना भाजप-सेना युतीने उमेदवारी दिली असती. यवतमाळ-वाशीम मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्य़ातील चार विधानसभा मतदारसंघ (यवतमाळ, राळेगाव, दारव्हा-दिग्रस आणि पुसद) येतात तर वाशीम जिल्ह्य़ातील फक्त दोनच (कारंजा व वाशीम) मतदारसंघ येतात, त्यामुळे हरिभाऊंचा ‘क्लेम’ सेनेने आणि खासदार भावना गवळी यांनीसुद्धा अमान्य केला नसता. उलट भावना गवळींनी राठोड यांना वाशीम-कारंजामध्ये मदत केली असती. पण हरिभाऊंच्या काँग्रेस प्रवेशाने राजकारणातील सारी समीकरणे बदलवून टाकली. यवतमाळात भाजपजवळ उमेदवारच कुठे आहे, असा भावनांचा रास्त सवाल होता. कारण, एकदा भाजपच्या ‘कमळ’वर निवडून आलेल्या राजाभाऊ ठाकरे यांनी ‘राष्ट्रवादी’चे घडय़ाळ बांधले होते आणि दुसऱ्यांदा निवडून आलेल्या हरिभाऊ राठोड यांनीसुद्धा भाजपला रामराम करून ‘पंजा जिंदाबाद’च्या घोषणा देणे सुरू केले आहे. अशा स्थितीत नव्याने अस्तित्वात आलेल्या यवतमाळ-वाशीममधून सेनेच्या भावना गवळी यांच्या दाव्याला बळकटी आली आणि त्यांचा तर्कसंगत युक्तिवाद सेना-भाजप युतीच्या नेत्यांनी मान्य केला. याचे खरे श्रेय हरिभाऊ राठोड यांनाच आहे, अशी तर्कसंगत आणि मजेदार चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.
विशेष म्हणजे, कार्यकर्त्यांचा उत्साह टिकावा म्हणून भाजप सतत ‘यवतमाळ-वाशीम’वर आपला दावा सांगत होता. मात्र, सेना सुप्रिमो बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या मुंबईतील बैठकीत ठाकरे यांनी ‘यवतमाळ-वाशीम’ मतदारसंघ आमच्या भावना गवळींसाठी सोडत असाल तरच पुढची चर्चा करू, असे सुनावले आणि राजनाथसिंह यांनी ठाकरेंच्या प्रस्तावाला मान्यता दिली. दुसरे असे की, ज्या दिवशी हरिभाऊ राठोड यांनी मनमोहनसिंह सरकारला मदत केली, त्याच दिवशी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिल्लीत भावना गवळींचे अभिनंदन करून त्यांना यवतमाळ-वाशीमची उमेदवारी देऊन टाकली होती. तेव्हापासूनच त्यांनी यवतमाळात प्रचार सुरू केला होता. पंधरा लाख मतदारांना रक्षाबंधनाच्या राख्या पाठवून ‘भविष्यात बहिणीची मदत करा’ अशी विनंती केली होती. उद्धव ठाकरेंसह इतर सेना नेत्यांनी भावनांचा हौसला सतत वाढवला आणि भावना गवळी यांनी यवतमाळात आंदोलने, मोर्चे, रुमणे मोर्चा अशा आंदोलनांनी झंझावात आणला. भाजप नेते उदासीन होते. कारण, त्यांचा खासदार ‘होस्टाईल’ झाला होता. अशा परिस्थितीत सेनेला उमेदवारी देणे भाजपला भाग होते आणि भावना गवळी ‘हॅट्ट्रिक’साठी सज्ज होत्या. पण या साऱ्या घडामोडींचे श्रेय एकटय़ा हरिभाऊ राठोड यांनाच आहे, हे स्वत: भावना गवळी आणि भाजप नेते तर मान्य करीत आहेतच, खुद्द हरिभाऊ राठोड आणि काँग्रेस नेतेसुद्धा मान्य करीत आहेत. राजकारणात यापेक्षा आणखी वेगळी ‘मौज’ ती काय असते?