Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सोने दुप्पट करून देण्याच्या आमिषाने दोन लाखाचा गंडा
बुलढाणा, १६ मार्च / प्रतिनिधी

सोने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एका अंधश्रद्धाळू व्यापाऱ्यास फकिराने २ लाख ७८

 

हजार ६०० रुपयांचे सोने लुटून गंडा घातल्याची घटना चैतन्यवाडीत घडली.
शहरातील चैतन्यवाडीत निर्मल संचेती यांचे संचेती ‘स्टील होम’ हे दुकान आठवडी बाजारात आहे. त्यांच्या दुकानात दुपारी फकिरच्या वेशातील व्यक्ती आली. या फकिराने निर्मल संचेती यांच्याकडे भीक मागितली. तेव्हा संचेती यांनी १ रुपया दिला; परंतु फकिराने नकार दिला. ११ रुपये दिले, त्यानंतर ५१ रुपये दिले. मात्र, फकिराने नकारच देऊन फक्त मला पाणी पाजा, अशी विनवणी केली. करुणा असल्याने संचेती यांनी फकिराला प्यायला पाणी दिले; परंतु त्याने घरचे पाणी पाजा असे सांगितले. श्रद्धाळू निर्मल संचेती यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून चैतन्यवाडीतील घरी नेले व पाणी पाजले, पाणी प्यायल्यानंतर फकिरने संचेती यांना सोन्याचा शिक्का दिला. तेवढय़ा हातचलाखी करून त्याने दोन शिक्के बनवून त्यांच्या हातात दिले. याप्रकारे तुमच्या घरात जेवढे सोने असेल तेवढे दुप्पट करून देतो, असे आमिष दाखविले या आमिषाला संचेती भाळले. त्यानंतर फकिराने सहा उदबत्त्या पेटवून तिजोरीत ठेवण्याचे सांगितले. उदबत्त्या संपेपर्यंत तिजोरीच्या उलट दिशेने तोंड करून उभे राहण्याचा सल्ला दिला. तेवढय़ा वेळात या फकिराने २ लाख ७८ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने कपाटातून काढून घेतले.
बराच वेळ झाल्यानंतर संचेती यांच्या पत्नीला संशय आला. त्यांनी कपाट अघडून पाहिले असता सोन्याचे सर्व दागिने गहाळ झाल्याचे लक्षात आले. संचेती कुटुंबाला याची माहिती मिळेपर्यंत फकीर सोने घेऊन पसार झाला होता.