Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मतदार है की मानता नहीं!
शहरी मतदारच ‘उदासीन’
यवतमाळ, १६ मार्च / वार्ताहर

यवतमाळ-वाशीम मतदारसंघात मतदारांची संख्या १७ लाख ८० हजार ५०५ असली तरी त्यातील तब्बल ४ लाख ३० हजार मतदार ‘उदासीन’ आहेत. त्यांनी अद्यापही आपली छायाचित्रांसह ओळखपत्रे घेतलेली नाहीत. विशेष म्हणजे अशा उदासीन मतदारांमध्ये शहरी मतदारांची संख्या

 

जास्त आहे.
जिल्हाधिकारी संजय देशमुख यांनी वार्ताहरांनाही माहिती देताना सांगितले की, मतदान नागरिकांचा केवळ हक्क नसून कर्तव्यही आहे. म्हणून आम्ही संपूर्ण मतदारसंघात घरोघरी जाऊन मतदारांना ओळखपत्र घ्या म्हणून विनंती केली. ज्यांनी मतदार यादीत नाव नोंदवले नाही व ओळखपत्रेही घेतली नाही, अशा पाच लाख लोकांना आवेदन पत्रे दिली. फोटोसह आवेदनपत्रे भरून तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन केले मात्र, अद्यापही सव्वाचार लाख मतदारांनी अर्ज आणून दिलेले नाहीत. मतदारांची विशेषत: शहरी मतदारांची मतदानाबाबतची ही उदासीनता अस्वस्थ करणारी आहे, असेही ते म्हणाले.
पुनर्रचनेनंतर यवतमाळ जिल्ह्य़ाची स्थिती मोठी विचित्र झाली आहे. या जिल्ह्य़ात पूर्वी विधानसभेचे आठ मतदारसंघ होते, आता एक कमी होऊन सात झाले आहेत. दारव्हा-दिग्रस हे दोन मतदारसंघ होते त्यांचा आता एकच मतदारसंघ झाला आहे. पूर्वी केळापूर हा आदिवासी मतदारसंघ होता, तो बाद झाला व त्याऐवजी आर्णी (आदिवासी राखीव) हा नवा मतदारसंघ निर्माण झाला आहे. दुसरे असे की, वणी आणि आर्णी हे दोन विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात गेले आहेत, तर उमरखेड हा मतदारसंघ थेट मराठवाडय़ात म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघात गेला आहे.
येथे आता यवतमाळ, राळेगाव, पुसद आणि दारव्हा-दिग्रस हे यवतमाळातील चार आणि वाशीम जिल्ह्य़ातील वाशीम व कारंजा हे दोन मतदारसंघ आहेत. पुनर्रचनेतील या नव्या मतदारसंघात पुरुष मतदार ९ लाख २२ हजार ५१९ आहेत तर महिला मतदारांची संख्या ८ लाख ५७ हजार ९८१ आहे. या १७ लाख ८० हजार ५०० मतदारांपैकी ५ लाख ६० हजार ७४४ पुरुष मतदारांनी व ४ लाख ९६ हजार २९९ महिला मतदारांनी छायाचित्रासह ओळखपत्र काढलेले आहेत व अजूनही २ लाख १४ हजार ६८९ पुरुष आणि २ लाख ७८ हजार महिला मतदारांनी ओळखपत्र घेतलेले नाही.
ओळखपत्र न घेतलेल्या मतदारांनी तहसीलदारांकडे दोन फोटोंसह अर्ज नेऊन द्यावा व ओळखपत्र घ्यावे, तसेच मतदार यादीत नाव नसेल तर दोनप्रकारची आवेदन पत्रे भरून व फोटो देऊन ओळखपत्र न्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्हाधिकारी हे आवाहन वारंवार करीत आहेत, मात्र ‘मतदार है की मानता नहीं’ अशी स्थिती आहे.