Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

दहशतवादाच्या छायेतील जनतेला सुरक्षेची हमी देणे पहिले प्राधान्य -विर्क
यवतमाळ, १६ मार्च / वार्ताहर

दहशतवादाच्या छायेत आणि भीतीच्या मानसिकतेत असलेल्या जनतेला सुरक्षेची हमी देणे, दहशतवादाचा स्वबळावर मुकाबला करण्यासाठी पोलीस यंत्रणा चुस्त करणे या गोष्टींना आपले पहिले प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे नवे पोलीस महासंचालक एस.एस. विर्क यांनी व्यक्त

 

केली आहे.
सोमवारी ‘लोकसत्ता’शी दूरध्वनीवरून बोलताना विर्क म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत कायदा आणि व्यवस्था या संबंधीची व्यवस्था मी स्वत:कडे घेतली नाही, कारण त्यासाठी पूर्ण वेळ द्यावा लागतो आणि माझ्या दृष्टीने ज्या गोष्टी प्राधान्याने करायच्या आहेत त्या बाजूला राहतील.
आज जनतेला दहशतवाद्यांच्या धक्क्यातून बाहेर काढणे, स्वतंत्र निर्भय व मुक्त वातावरणात त्यांना जीवन जगता येईल, याची हमी देणे फार महत्त्वाचे आहे. एस.एस. विर्क यांची जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पहिली नियुक्ती यवतमाळात झाली होती. आणीबाणीच्या काळात पोलिसी अतिरेक होऊ दिले नव्हते. त्यामुळे मिसामध्ये अटकेत राहिलेले कार्यकर्ते आदराने त्यांचा उल्लेख करतात.
पंजाबमध्ये पोलीस महासंचालक राहिलेल्या विर्क यांनी तेथील सुवर्ण मंदिरावरील अतिरेक्यांचा हल्ला परतविताना दिलेल्या लढय़ाच्या वेळी प्रत्यक्ष मृत्यू अनुभवला होता. त्यांच्या जबडय़ातून गोळी गेली होती. तरीही इस्पितळातून त्यांनी ‘मै बिलकुल ठीक हूँ’ असा संदेश जनतेला दिला होता. सहकार्याचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांनी मृत्यूची सुद्धा पर्वा केली नव्हती. दिवंगत राष्ट्रपती आर. व्यंकटरामण यांनी त्यांच्या ‘जेव्हा मी राष्ट्रपती होतो.’ या आत्मचरित्रपर ग्रंथात विर्क यांच्या शौर्याचा गौरवाने उल्लेख केला आहे. अत्यूच्य पदावर राहून त्यांनी जीवघेण्या आरोपांचे घाव हसत हसत सहन कसे काय केले, असे विचारले असता विर्क म्हणाले, ‘लोक जीन हादसो, मै मरते है, मुझे ऊन हादसो, ने पाला है, मै गम को खुशी मे ढालता हूँ, मेरे जीने का यही निराला अंदाज है.’
यवतमाळच्या जनतेने आपल्याला जे प्रेम आणीबाणीच्या काळात दिले ती आपली आयुष्याची शिदोरी आहे, असे सांगून विर्क यांनी मराठी शायर दिवंगत भाऊसाहेब पाटणकर यांच्या यवतमाळातील काही मजेदार (आठवणींनाही) उजाळा दिला.