Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘स्नेहस्वाधार’ गृहाचे उद्घाटन
चंद्रपूर, १६ मार्च / प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त निराधार महिलांसाठी ‘स्नेहस्वाधार’ गृहाचे उद्घाटन व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार नुकताच करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला

 

व बालविकास अधिकारी कोवेकर होते.
प्रमुख पाहुण्या म्हणून शोभा पोटदुखे, डॉ. स्नेहल पोटदुखे, माधुरी येरणे उपस्थित होत्या. कोवेकर यांनी यावेळी महिलांसाठी शासनाच्या विविध योजनेबद्दल मार्गदर्शन केले. जागतिक महिला दिनी सर्व महिलांना समान हक्क व रोजगार मिळावा व आधार देण्याच्या संकल्पनेतून स्नेहस्वाधार गृह शोभा पोटदुखे यांच्या प्रयत्नाने गोपालपुरी वॉर्ड येथे सुरू करण्यात आले.
समाजातील गरीब, निराधार स्त्रियांसाठी सतत कार्यरत असणारे शहरी व ग्रामीण कष्टकरी महिला विकास सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी, सदस्यांनी बचत गटातील स्त्रियांची आर्थिक पातळी उंचाविण्याच्या हेतूने त्यांनी स्वत: तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन या वेळी भरविण्यात आले.
शहरातील सामाजिक व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात प्रामुख्याने हेमलता पाजनकर, मीरा कांबडी, अ‍ॅड. खनके, स्नेहलता पाणबुडे, प्रा. शैलजा भलमे व अश्विनी खोब्रागडे यांचा भेटवस्तू, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आला. या कार्यक्रमास अनुराधा जोशी, वंदना हातगावकर, प्रीती वडस्कर, कविता बोतमवार उपस्थित होत्या.