Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

ग्राहक संरक्षण कायद्यातून सामाजिक सुरक्षा झ्र्सरकुंडे
भंडारा, १६ मार्च / वार्ताहर

ग्राहक संरक्षण कायदा हा सामाजिक सुरक्षा देणारा कायदा आहे. उत्पादित मालाची व वस्तूंची खरेदी करताना ग्राहकांनी दिशाभूल व फसवणूक होणार नाही यादृष्टीने जागरूक रहावे, असे

 

आवाहन जिल्हाधिकारी संभाजीराव सरकुंडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी संभाजीराव सरकुंडे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी विजया बनकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी विनोद हरकंडे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे प्रबंधक आर.एफ. राठोड, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, ग्राहक चळवळ संघटित स्वरूपात अस्तित्वात आली आहे. सर्वसमावेशक हित लक्षात घेऊन प्रत्येकाने या चळवळीमध्ये अग्रणी भूमिका वठवावी. अज्ञान व आळसी वृत्तीतून याबाबतची प्रकरणे मंचाकडे दाखल होत नाही तसेच सुशिक्षितांकडूनही ग्राहक मंचाकडे तक्रारी दाखल होत नसल्याचे सांगितले.
उपजिल्हाधिकारी विजया बनकर म्हणाल्या, ग्राहकांचे शोषण करण्याची प्रक्रिया कायम आहे. ग्राहकांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीपासून वेळीच सावध व्हावे. ग्राहक संरक्षण कायद्याबाबत ग्रामीण भागातील लोक जागरूक नसल्याने त्यांची मोठय़ा प्रमाणात फसवणूक होत आहे. ग्राहक संरक्षण कायद्याचे फळ ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्तीला मिळाले पाहिजे.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विनोद हरकंडे, ग्राहक तक्रार निवारण मंचाचे प्रबंधक आर.एफ. राठोड, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची भाषणे झाली. यावेळी कार्तिक मेश्राम यांनी ग्राहक प्रबोधन गीत गायले. ग्राहकांना मार्गदर्शन करणारे माहिती फलक व साहित्याची दुकाने याप्रसंगी लावण्यात आली होती. प्रास्ताविक प्रबंधक आर.एफ. राठोड यांनी केले. आभार सवाई यांनी मानले.