Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मेळघाटातील अनेक गावात पाणी टंचाई तीव्र
धारणी, १६ मार्च / वार्ताहर

मेळघाटातील डोंगरदऱ्यात वसलेल्या अनेक गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील सुमारे सव्वादोनशे खेडय़ातील आदिवासी कुटुंबाची

 

पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे.
पाणीपुरवठा विभागाने कार्यान्वित केलेल्या योजना असलेल्या गावातच पाण्याची भीषण टंचाई गव्हानहोद, विजुधावडी, कुसुमकोर खुर्ट, टेंबली, काराहा, खाऱ्या, गुरपाणी, टिटम्बा, सावऱ्या, ढाकणा, मोर्गदा, झिलागपाड्डी, बारू, राणीगाव, गोलाई, चटवा बोड, कढाव, हरिसाल, चौराकुंड, जाम्बू, मोरवा, चिचघाट, रत्नापूर, सोनाबर्डी अशा दीडशे गावात जीवन प्राधिकरण आणि पाणीपुरवठा विभागाच्या योजना अस्तित्वात असूनही तीव्र पाणी टंचाई आहे. अर्धवट स्थितीतील योजना ग्रामपंचायतींना हस्तांतरित करण्यात आल्यामुळे अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अपूर्णावस्थेत असलेल्या पाणीपुरवठा योजना माथी मारल्यामुळे या योजना चालवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर येऊन पडली आहे. मेळघाटातील बहुतांश ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती या योजना चालवण्याची नाही. त्यामुळे मेळघाटातील अनेक योजनांची दुरुस्ती व देखभाल करण्याची जबाबदारी पाणीपुरवठा विभाग आणि जीवन प्राधिकरणाकडे सोपवण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांत पाणीपुरवठा योजना दुरुस्तीवर कोटींचा निधी खर्च होऊनही या योजना सुरळीत झाल्या नाहीत. पाण्यासाठी आदिवासींची या भागात अनेक आंदोलने केली. कुसुम कोट येथील सामाजिक कार्यकर्त्यां अनिता परवीन यांनी केलेल्या आंदोलनामुळे नरवाटी आणि काल्पी या दोन पाणीपुरवठा योजना तीन दिवसांपूर्वीच सुरू झाल्या असून इतर योजनांचे भिजत घोंगडे मात्र कायम आहे.