Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शोधग्रामला बुधवारपासून दंतेश्वरी देवीची जत्रा
गडचिरोली, १६ मार्च / वार्ताहर

‘सर्च’च्या वतीने येत्या बुधवार, गुरूवार १८ व १९ मार्चला शोधग्राम येथे ‘मां दंतेश्वरी देवीची’

 

जत्रा आयोजित करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ात आदिवासींच्या आरोग्य व विकासाच्या प्रश्नावर ‘सर्च’ संस्था अविरतपणे काम करीत आहे. ‘सहभागी पद्धतीने’ आदिवासी जमातीसोबत काम करण्याचा संकल्प सर्च संस्थेने सुरुवातीपासूनच केला आहे. या संकल्पनेला अनुसरून दरवर्षी, आदिवासींची श्रद्धा असणाऱ्या ‘मां दंतेश्वरी देवीची’ जत्रा सर्चच्या वतीने आयोजित करण्यात येते. या जत्रेला मां दंतेश्वरी जत्रा असे नाव देण्यात आले असून १९९८ पासून ही जत्रा दरवर्षी शोधग्राममध्ये साजरी केल्या जाते. यावर्षीची ही १२ वी जत्रा असून दि. १८ व १९ मार्च २००९ या दोन दिवसात होणार आहे.
जत्रेचा मुख्य हेतू हा आदिवासींसोबत काम करताना त्यांच्या गरजा जाणून घेणे व सहभागी पद्धतीने कार्यक्रम विकसित करण्यासाठी मदत घेणे. सोबतच युवक-युवतीचे संघटन करून त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देणे हा आहे.
जत्रेची सुरुवात आदिवासी संसदेने होणार आहे. सकाळी १० वाजता संसदेला सुरुवात होईल व दुपारी ४.४५ वाजेपर्यंत संसद बैठक सुरू राहील. ४.४५ ते ५.०० पर्यंत संसदेतील निर्णयांची मांडणी होईल. सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान गुंती स्पर्धा झाल्यानंतर आदिवासी जमातीचे पारंपरिक वेशभूषेतील सांस्कृतिक कार्यक्रम रात्री ८.०० ते १२.०० वाजेपर्यंत सुरू राहील. जत्रेच्या दुसऱ्या दिवशी दि. १९ मार्च गुरुवारी सकाळी ९.०० वाजता मां दंतेश्वरीची पूजा होऊन ११ ते दुपारी १ पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.