Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सैलानी यात्रेत पारंपरिक पद्धतीने निघाला संदल
बुलढाणा, १६ मार्च / प्रतिनिधी

लाखो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने रविवारी रात्री पिंपळगाव सराई ते सैलानी बाबा दर्गा अशी संदल यात्रा काढण्यात आली. १५ दिवस चालणाऱ्या सैलानी बाबा यात्रेत संदल महोत्सव अतिशय महत्त्वाचा समजला जातो. मिरवणुकीने जाऊन रात्री उशिरा सैलानी बाबाच्या दग्र्यावर चादर चढविण्यात आली. त्यावेळी लाखोंच्या जनसागराने सैलानी बाबांचा जयजयकार

 

करीत त्यांच्या दग्र्याला अभिवादन केले.
सैलानी बाबाच्या यात्रेत होळी पौर्णिमेपासून प्रारंभ झाला आहे. शनिवारी वादळीवारा, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे यात्रेकरूंची दाणादाण उडाली. मात्र, संदलच्या दिवशी म्हणजे रविवारी दुपापर्यंत परिस्थिती पूर्ववत झाली. सायंकाळपर्यंत पाच ते सहा लाख भाविक सैलानी परिसरात दाखल झाले होते. पाणी पाऊस व चिखलाची पर्वा न करता या भाविकांमध्ये सैलानी दग्र्याचे दर्शन घेण्याची प्रचंड अहमहमिका दिसून आली. त्यामुळे या परिसरात भाविकांची एकच झुंबड उडाली.
रात्री नऊ वाजताच्या सुमारास पिंपळगाव सराई येथील संदल घरात संदलची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. पुष्पहारांनी सजविलेल्या उंटिणीच्या पालखीत हा संदल ठेवण्यात आला. त्यानंतर या उंटिणीची पिंपळगाव सराई ते सैलानी दर्गा अशी तीन किमीची मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशांच्या तुफानी गजर व ठिकठिकाणी करण्यात आलेल्या रोषणाई तथा आतषबाजीने हा परिसर गजबजून गेला. संदल उंटिणीच्या खालून जाण्यासाठी यावेळी भाविकांनी एकच गर्दी केली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणांना प्रचंड अशी कसरत करावी लागली. वेळ प्रसंगी त्यांना सौम्यलाठीमारही करावा लागला. पिंपळगाव सराई येथून निघालेली मिरवणूक पांदण रस्त्याने सैलानी बाबाच्या दग्र्यावर पोहोचली. त्यावेळी संदल यात्रेचे स्वागत करण्यात आले. संदलची पूजा अर्चा करण्यात आल्यानंतर हा संदल सैलानी बाबाच्या दग्र्यावर चढविण्यात आला. यावेळी सैलानी बाबा ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल समद यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.