Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
विविध

परेश मोकाशी यांना श्रीनिवास पारितोषिक
चेन्नई, १६ मार्च/वार्ताहर

चेन्नईमधील गोलापुडी श्रीनिवास फाऊंडेशनने पदार्पणातील सवरेत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्कारासाठी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांची निवड केली. हिंदी, मराठी, तामिळ, मल्याळम अशा विविध भाषांतून आलेल्या १८ स्पर्धकांतून परेश मोकाशी यांची निवड करण्यात आल्याचे फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह दादासाहेब फाळके यांच्या कामावर आधारलेला आहे. गेली दोन दशके मोकाशी मराठी रंगभूमीवर काम करीत आहे. दीड लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

पाकिस्तानात न्यायाधीशांच्या फेरनियुक्तीचे अमेरिकेकडून स्वागत
इस्लामाबाद, १६ मार्च/पीटीआय

पाकिस्तानच्या सरकारने आज सर्वोच्च न्यायालयाचे बडतर्फ सरन्यायाधीश इफ्तिकार महंमद चौधरी यांची त्यांच्या पदावर पुन्हा नियुक्ती करण्याचे जाहीर केले आहे. देशातील गंभीर परिस्थिती निवळावी यासाठी पाकिस्तान सरकारने घेतलेला हा ‘मुत्सद्दी निर्णय’ असून, राष्ट्रीय समेट घडवून आणण्यासाठी उचलण्यात आलेले हे एक ‘महत्त्वपूर्ण पाऊल’ आहे, अशा शब्दांमध्ये अमेरिकेने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

रँगिंगच्या दोन घटनात अहवाल देण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचे दोन राज्यांवर ताशेरे
नवी दिल्ली, १६ मार्च/पीटीआय
हिमाचल प्रदेशातील वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या रॅगिंगच्या घटनेबाबतचा अहवाल महाविद्यालयाचे प्राचार्य आणि रजिस्ट्रार यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाने मागवला आहे. रॅगिंगचा बळी ठरलेल्या अमन कचरू याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांच्या विरुद्ध खटला का चालविण्यात येऊ नये, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने महाविद्यालयाकडे केली होती. कांग्रा येथील राजेंद्र प्रसाद वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या कचरू याचा ८ मार्च रोजी चार वरिष्ठ विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता.

जेटली-राजनाथ वादात संघाची मध्यस्थी
नवी दिल्ली, १६ मार्च/पीटीआय

लोकसभा निवडणुका ऐन तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंग आणि सरचिटणीस अरुण जेटली यांच्यातील मतभेद कायम आहेत. हे मतभेद संपुष्टात आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता प्रयत्न सुरू केले आहेत. भारतीय जनता पक्षातही या समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी एका पुस्तक प्रकाशन समारंभाच्यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत तुम्हाला कदाचित त्यात मोठी बातमी दिसत असेलही पण तसे काही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह सुरेश सोनी यांनी जेटली यांची काल रात्री भेट घेतली. या वादात तोडगा काढण्यासंदर्भात त्यांनी जेटली यांच्याशी चर्चा केली. ईशान्य भारतातील विभागाच्या निमंत्रकपदी ज्येष्ठ व्यापारी सुधांशू मित्तल यांची नेमणूक केल्यापासून हा वाद सुरू झाला आहे. त्यांची नियुक्ती रद्द केल्याशिवाय आपण प्रचार समितीच्या बैठकीस उपस्थित राहणार नाही, असे जेटली यांनी सांगितले आहे. या वादाच्या पाश्र्वभूमीवर पक्षाच्या केंद्रीय प्रचार समितीची बैठक उद्या होत असून, या बैठकीकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे. जेटली या बैठकीला उपस्थित राहणार का, याबद्दल सगळय़ांना उत्सुकता आहे. पक्षनेतृत्व या वादावर निवडणुकीनंतर तोडगा काढण्याच्या मनस्थितीत आहे.

एअर इंडियाच्या विमानात एकाचा मृत्यू
चेन्नई, १६ मार्च/पीटीआय

एअर इंडिया एक्सप्रेसच्या कौलालंपूरहून चेन्नईला येणाऱ्या विमानात एका प्रवाशाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या प्रवाशाचे नाव कन्नाबिरन (वय ३०) असल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कन्नाबिरन हे मलेशियात एका खासगी कंपनीत काम करत होते. कन्नाबिरन हे तामिळनाडूतील चिदंबरम जिल्ह्य़ातील रहिवासी होते. मलेशियातील आपले काम संपवून ते मायदेशी परतत होते.

जम्मू-काश्मीरच्या सीमेवर एकजण ठार
जम्मू, १५ मार्च/पी.टी.आय.

भारत-पाकिस्तान सीमेवरील जम्मू क्षेत्रातील आर एस पुरा भागात घुसखोरी करू पाहणाऱ्या एका अज्ञात इसमाला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळ्या घालून ठार केले आहे. कोटे कुबा सीमेवरील चौकीजवळ हे जवान गस्ती घालत असताना त्यांना सीमेवर विचित्र हालचाल होताना दिसली. सदर इसमाला शरण येण्यास या जवानांनी फर्मावले, पण त्याने पुन्हा पाकिस्तानच्या क्षेत्रात निसटून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पळताना पाहून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याच्यावर गोळीबार केला. तो जागेवरच मरण पावला असून दलाचे अधिकारी या घटनेबाबत अधिक तपास करीत आहेत.

सपाच्या उमेदवारांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
फतेहपूर, १६ मार्च/पी.टी.आय.

समाजवादी पक्षाचे उमेदवार राकेश सचन आणि माजी आमदार कासिम हसन वेरागोपाळ वर्मा यांच्याविरुद्ध निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचन यांनी त्यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन ज्या दुकानात केले त्या दुकानमालकाची त्यांनी परवानगी घेतली नव्हती. वेरागोपाळ यांनी हे दुकान भाडय़ाने घेतले होते. या दुकानात त्यांनी सचन यांचे कार्यालय सुरू केले. मात्र हे करण्यापूर्वी दुकानाचा मालक शिवसहाय निगम याची परवानगी घेतली नव्हती. निगम याने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

मुक्तार माईचा पोलिसाशी विवाह
इस्लामाबाद, १६ मार्च / पी. टी. आय.

स्वत: अत्याचार सोसून तावून-सुलाखून निघालेल्या आणि स्त्रियांवरील अत्याचाराविरुद्ध यशस्वी संघर्ष करणाऱ्या मुक्तार माई हिने एका पोलीस कॉन्स्टेबलशी विवाह केला. १२ वर्षे वयाच्या भावाला वयाने मोठय़ा महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या आरोपात गुंतविण्याचा प्रयत्न मुक्तार माईने हाणून पाडला; पण ती स्वत:च सामूहिक बलात्काराची शिकार ठरली होती आणि मग गावकऱ्यांनी तिच्या कुटुंबाला, तिला वाळीत टाकून बराच अन्याय केला, छळ केला होता. पण मुक्तार माई डगमगली नाही, तिने स्त्रियांवरील अत्याचारांविरुद्ध लढा दिला, सुप्रीम कोर्टाची दारे ठोठावली आणि यशही मिळविले. काल मुजफ्फरगढ येथे एका साध्या समारंभात नसीर अब्बास नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलशी माईचा निकाह झाला. अब्बासचा मात्र हा दुसरा विवाह असून, पहिल्या पत्नीपासून त्याला पाच अपत्ये झालेली आहेत.

मुतालिकला वर्षभरासाठी मंगळूरमध्ये प्रवेशबंदी
मंगळूर, १६ मार्च/पी.टी.आय.

पबवरील हल्ल्याप्रकरणी देशभर कुख्यात झालेल्या ‘श्रीराम सेने’चा प्रमुख प्रमोद मुतालिक याला मंगळूर जिल्हाधिकाऱ्यांनी वर्षभरासाठी जिल्ह्यात प्रवेशबंदी लागू केली आहे. २४ जानेवारी रोजी मंगळूरमधील पबवर झालेल्या हल्ल्यांवरूनच हा आदेश लागू करण्यात आला आहे. याआधी २००३ मध्ये पंधरा दिवसांसाठी त्याच्यावर प्रवेशबंदी लागू करण्यात आली होती. या बंदीला आपण न्यायालयात आव्हान देणार आहोत, असे मुतालिक याने सांगितले.