Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ मार्च २००९

आनंद यादव यांचा राजीनामा
पुणे, १७ मार्च/ विशेष प्रतिनिधी
महाबळेश्वर येथे होणाऱ्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज येथे जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे येत्या शुक्रवारपासून महाबळेश्वर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्याबाबत विचार करण्यास साहित्य महामंडळाचे पदाधिकारी आणि घटक संस्थांच्या प्रतिनिधींची येत्या गुरुवारी, १९ मार्चला महाबळेश्वर येथे तातडीची बैठक होणार आहे. डॉ. यादव यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीत संत तुकाराम यांच्याविषयी आक्षेपार्ह लेखन केल्याच्या आरोपावरून वारकरी आणि वारकरी संप्रदायाने डॉ. यादव यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली होती. दरम्यानच्या काळात डॉ. यादव यांनी आपले पुस्तक मागे घेतले, या प्रकरणी देहूला जाऊन माफी मागितली, संत तुकारामांच्या मूर्तीसमोर डोके टेकले. तरीही वारकऱ्यांचा राग शांत झाला नव्हता. त्यांनी महाबळेश्वरचे संमेलन होऊ न देण्याचा तसेच संमेलनस्थळी अभंगगाथा पारायण करण्याचा इशारा दिला होता.डॉ. यादव हे आज सायंकाळी महाराष्ट्र साहित्य परिषदेत आपल्या काही स्नेह्य़ांसह अचानक आले.

वारकऱ्यांनी निर्माण केलेल्या प्रश्नावर यादव एकाकी
पुणे, १७ मार्च/ विशेष प्रतिनिधी

डॉ. आनंद यादव यांनी लिहिलेल्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीबाबत वारकऱ्यांनी निर्माण केलेल्या प्रश्नी यादव एकाकी पडले, एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाचा घोष करणाऱ्या साहित्यिकांपैकी काही अपवाद वगळता कोणीही यादव यांना जाहीर पाठिंबा, वैयक्तिक पाठबळ दिले नाही, अशी खंत यादव यांच्या निकटवर्तियांनी व्यक्त केली. ‘‘यावेळी विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज यांची आठवण येते. ते असते तर त्यांनी यादव यांना एकाकी पडू दिले नसते,’’ अशी एका जाणकार साहित्यप्रेमीची प्रतिक्रिया खूप बोलकी ठरते. दुर्जनाच्या दुष्कृत्यापेक्षा सज्जनांची हतबलताच भयावह आहे, अशी भावना व्यक्त होते आहे.

नवा अध्यक्ष कोण?
डॉ. आनंद यादव यांच्या राजीनाम्यानंतर आता महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान कोणाकडे जाणार, असा प्रश्न निर्माण झाला असून साहित्य महामंडळ कोणाची निवड करते, याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार शंकर सारडा तसेच ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर आणि संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मराठी साहित्य महामंडळाची तातडीची बैठक महाबळेश्वर येथे येत्या गुरुवारी होत असून त्यात नव्या अध्यक्षांबाबत निर्णय होईल. महामंडळासमोर काही पर्याय असल्याचे साहित्यवर्तुळातून सांगण्यात येते.

वरुण गांधींच्या चिथावणीखोर भाषणामुळे भाजप अडचणीत
अजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल
नवी दिल्ली, १७ मार्च/खास प्रतिनिधी
उत्तर प्रदेशच्या पिलीभीत मतदारसंघातील भाजपचे युवा उमेदवार आणि मनेका गांधी यांचे पुत्र वरुण गांधी यांच्याविरुद्ध दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, असे चिथावणीखोर भाषण केल्याच्या आरोपाखाली आज निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून पिलीभीत जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १५३ (अ) तसेच १२३ (अ) आणि १२३ (ब) कलमांखाली अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आणि भाजपलाही नोटीस बजावली. वरुण गांधी यांनी या आरोपांचे खंडन केले असले तरी त्यांच्या पाठिशी भाजप नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पिलीभीत लोकसभा मतदारसंघातून भाजपने सात महिन्यांपूर्वी वरुण गांधी यांची उमेदवारी जाहीर केली होती. चौदाव्या लोकसभेपर्यंत पिलीभीतचे प्रतिनिधित्व मनेका गांधी यांनी केले आहे.

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे निवडणूक प्रचारनामा!
साडेचार वर्षांच्या कामांचा मांडला ताळेबंद, करवाढ नाही
मुंबई, १७ मार्च / खास प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या धर्तीवर गेल्या साडेचार वर्षांत सरकारने केलेल्या कामांची जंत्री सादर करीत वित्तमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना निवडणूक प्रचाराच्या धाटणीचेच भाषण आज केले. जागतिक मंदीचा राज्याच्या महसुली उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी असल्याने कोणत्याही सवलती देणे सरकारला शक्यच नव्हते. मात्र वळसे-पाटील यांनी वित्तमंत्री या नात्याने आपला पहिलाच अर्थसंकल्प मांडताना गेल्या साडेचार वर्षांतील सरकारच्या कामांचा फक्त आढावा घेतला.

भाजपची ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
किरीट सोमय्या आणि पूनम महाजन राव यांच्या रस्सीखेचीत ईशान्य मुंबईचा उमेदवार अनिर्णित

नवी दिल्ली, १७ मार्च/खास प्रतिनिधी

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसदरम्यान जागावाटपाचा घोळ कायम असताना शिवसेनेशी जागावाटपाचा समझोता करणाऱ्या भाजपने आज आपल्या २६ पैकी ११ उमेदवारांची नावे निश्चित केली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे बीडमधून लढणार आहेत. मात्र, किरीट सोमय्या आणि पूनम महाजन राव यांच्या रस्सीखेचीत ईशान्य मुंबईचा उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाही. भाजपने आपल्या ११ मावळत्या खासदारांपैकी पाच जणांना पहिल्या यादीत स्थान दिले आहे.

ठाण्याच्या राबोडी भागात दंगल; पोलिसांचा गोळीबार
ठाणे, १७ मार्च / प्रतिनिधी

ठाण्यातील राबोडी या अत्यंत संवेदनशील भागात आज रात्री क्षुल्लक कारणावरून दोन गटांत तणाव निर्माण होऊन त्याचे पर्यवसान दंगलीमध्ये झाले. संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. परिणामी राबोडी परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या भागात अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे ठाण्याचे पोलीस आयुक्त अनिल ढेरे यांनी सांगितले. गेल्या वर्षी नवरात्रीच्या काळात कमान उभारण्यावरून दोन गटांत भीषण दंगल उसळली होती. या घटनेला काही महिनेच लोटले असताना आज पुन्हा किरकोळ कारणावरून दोन गटांत संघर्षांची ठिणगी पडली. आकाशगंगा परिसरात क्रांतीनगर झोपडपट्टी आहे. तेथे दुपारी रिक्षांचा अपघात होऊन, त्यामुळे हाणामारी झाली होती. त्या रागातून सायंकाळी दोन गटांमध्ये पुन्हा धुसफूस झाली. त्यातून रात्री अकराच्या सुमारास दंगल उसळली. दोन गटांत जाळपोळ व दगडफेक सुरू झाली. तात्काळ पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी रात्री पावणेबाराच्या सुमारास पोलिसांना गोळीबार करावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले. दंगेखोरांनी एक बेकरी जाळली आहे. तर दगडफेकीत एकजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. रिक्षाबाबतच्या भांडणातून हा प्रकार घडला असून, एकजण जखमी झाला आहे. मात्र तो दगडफेकीत जखमी झाला की गोळीबारात, हे अद्याप कळू शकले नाही. मात्र तेथे अतिरिक्त पोलीस कुमक धाडण्यात आली आहे.

चौथीतील मुलगी अभ्यास करीत नसल्याने आईने जाळून घेतले!
मुंबई, १७ मार्च / प्रतिनिधी

चौथीतील मुलगी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून, टीव्ही पाहत असल्याने स्वत:ला जाळून घेणाऱ्या वर्सोवा येथील महिलेचा आज उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिच्या आत्महत्येमागे अन्य कोणते कारण आहे का, याबाबत वर्सोवा पोलीस अधिक तपास करीत आहेत. वर्सोवा येथे राहणाऱ्या मीनाक्षी विश्वनाथ गुलाटी (३५) या महिलेने सोमवारी रात्री रॉकेल ओतून घेऊन जाळून घेतले होते. दुसऱ्या दिवशी इंग्रजीचा पेपर असतानाही मुलगी टीव्ही बघण्यात दंग होती व वारंवार सांगूनही ऐकत नव्हती. त्यामुळे संतप्त मीनाक्षीने हे टोकाचे पाऊल उचलले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मीनाक्षीने पेटवून घेतल्याचे पाहून मुलीने आरडाओरडा करताच घरातच झोपलेला तिचा पती विश्वनाथ तिला वाचविण्यासाठी धावला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याने तिला उपचारासाठी कूपर रुग्णालयात हलविले. मात्र ९० टक्के भाजलेली मीनाक्षी आज उपचार सुरू असताना मरण पावली.

भिवंडीत विषबाधा
भिवंडी, १७ मार्च / वार्ताहर

भिवंडी येथील ब्रम्हानंद परिसरातील अंगणवाडीमधील शाळकरी मुलांनी खिचडी खाल्लाने विषबाधा झाली. विषबाधा झालेल्या चार मुलांवर पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिला बचत गटातर्फे अंगणवाडीतील मुलांना खिचडी देण्यात येते. दुपारी खिचडी खाल्यानंतर काही मुलांना मळमळणे, उलटय़ा होणे असा त्रास सुरू झाला. मुलांना पालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून इतरांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. चार मुलांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

 


प्रत्येक शुक्रवारी