Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ मार्च २००९
  ध्येयवाद आणि करिअरही
  भारतीय वनसेवेची आव्हानात्मक परीक्षा
  सब ब्रोकर - उपदलाल
  मायक्रोसॉफ्टमध्ये ‘इंटर्नशिप’
  विदेशातील प्रवेश प्रक्रिया : अर्जासोबतच्या कागदपत्रांची पूर्तता
  र्मचट नेव्हीमधील करिअर
  ‘बीएसएनएल’मधील टेलिकॉम ऑफिसरपदाची तयारी
  विस्तारा स्वप्नांच्या कक्षा..
  सुंदर आणि सशक्त

 

मला फॉरेस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे. तरी कृपया मला सरकारी व खासगी क्षेत्रातील संधी व शिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती द्यावी.
- विनायक अडसूळ

- जगाच्या तुलनेत २.५ टक्के भूभाग भारतामध्ये आहे. तर १.८ टक्के वनाचा भाग भारतामध्ये आहे. लाकूड आणि कागदासाठी लागणारा लगदा ही जंगलांपासून मिळणारी मुख्य आर्थिक उत्पादनं असली तरी डिंक, राळ, फळ, तेल, रंग, औषधी वनस्पती, बांबू ही उत्पादनंही जंगलांमधून मिळतात. १००१-२००२ मध्ये भारताला २३,७९८ कोटी रुपयांचं उत्पादन जंगलापासून मिळालं. जागतिक
 

पातळीवर जैववैविधता असणाऱ्या १२ देशांत भारताचा समावेश होतो. भारतामध्ये ८०,००० प्राण्यांच्या प्रजाती आहेत, तर ४,००० वनस्पतींच्या प्रजाती आहेत.
मात्र, भारताच्या या जंगलसंपत्तीची अवस्था सध्या वाईट आहे. शासकीय पातळीवरच्या उदासीनतेमुळे जंगलतोड रोखण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न होत नाहीत. जंगलाच्या ऱ्हासाचा दूरगामी परिणाम पाण्याच्या पुरवठय़ावर, शेतीवर, जैवविविधतेवर, पर्यावरणावर, हवामानावर तसंच मनुष्य जीवनावर होणार आहे. भारतामध्ये एकूण भूभागाच्या २० टक्के भागांवर जंगल आहे. त्यापैकी १.५६ टक्के घनदाट अरण्य आहे. १०.३० टक्के मध्यम प्रतीचं अरण्य आहे. पण उपलब्ध असणाऱ्या जंगलांपैकी ४१ टक्के जंगलं विरळ होत चालली आहेत. जनावरांच्या मोकाट चरण्यामुळेही जंगलांवर विपरीत परिणाम होत आहे. याव्यतिरिक्त जंगलामध्ये अतिक्रमणाची समस्याही भेडसावत आहे. ७० टक्के जंगलांना नैसर्गिक पुनरुज्जीवन अशक्य आहे. ५५ टक्के जंगलांना आगीपासून धोका आहे. केंद्र सरकारने २००७ पर्यंत २५ टक्के भूभाग जंगल व वृक्ष लागवडीखाली आणण्याचं उद्दिष्ट ठरवलं होतं. तर २०१२ पर्यंत ३३ टक्के भूभाग जंगल व वृक्ष लागवडीखाली आणण्याची योजना आहे. भारतामध्ये ९५ नॅशनल पार्क व ५०० अभयारण्यं आहेत. ३०० पेक्षा जास्त नद्यांचा उगम या राष्ट्रीय उद्यानांमध्ये होतो.
अशा या जंगल संपत्तीच्या संवर्धन-संरक्षणासाठी, तिथली जैवविविधता अबाधित राखण्यासाठी व अन्य समस्यांवर मात करण्यासाठी आवश्यकता आहे ती प्रशिक्षित व समर्पित मनुष्यशक्तीची! हे काम करण्यासाठी तरुणांनी फॉरेस्ट्रीमधील करिअरची निवड केली पाहिजे. जंगलं ही सरकारी मालकीची असल्याने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या शासनामध्ये वनांसंबंधीच्या अनेक पदांवर आपल्याला काम करता येऊ शकेल.
या पदांसाठी दोन्ही स्तरांवर स्पर्धा परीक्षेमार्फत प्रवेश दिले जातात. वन विभागाकडे वनाच्या देखभालीचं काम असतं. वनासाठीचा विकास आराखडा बनवणं, सव्‍‌र्हे करणं, वनाच्या सीमा आखणं, वनीकरण मोहीम राबवणं, वन क्षेत्राचं व वनस्पतींचं मोजमाप करणं, जैवविविधतेचं व्यवस्थापन करणं, गुरांच्या अर्निबध चरण्याला आळा घालणं ही कामं वन खात्यामार्फत केली जातात. महाराष्ट्र वन विभागाकडून उपग्रहामार्फत मिळणाऱ्या प्रतिमांचा वापर करून मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम व ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीमचा अनोखा उपक्रम राबवला जात आहे. ग्लोबल पोझशनिंग सिस्टीम व ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीमचा अनोखा उपक्रम राबवला जात आहे. ग्लोबल पोझशनिंग सिस्टीम व फिल्ड सव्‍‌र्हेचाही उपयोग केला जातो. या सर्व माहितीच्या आधारे डिजिटल डेटाबेस करण्याचं कामही वन विभागामार्फत केलं जातं. वन पुनरुज्जीवनासाठी वन रोपवाटिकांची निर्मिती केली जाते.
वनसंपत्ती व्यवस्थापन हा मोठा विषय या विभागाअंतर्गत येतो. आपल्या अखत्यारितील जंगलांचं संरक्षण करणं, अनधिकृत शिकारींना आळा घालणं, बेकायदा लाकूडतोड थांबवणं, गस्त धालणं, अतिक्रमणं थोपवणं आदी कामंही वन विभागाला करावी लागतात.
फॉरेस्ट्रीमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांना इंडियन फॉरेस्ट सव्‍‌र्हिसमध्ये करिअर करण्याची चांगली संधी आहे. भारतीय वनसेवा ही अखिल भारतीय सेवा आहे. भारतीय वनसेवा १९६६ मध्ये स्वतंत्र अ. भा. सेवा म्हणून सुरू करण्यात आली. या सेवेतील अधिकाऱ्यांना राज्यात नियुक्त केलं जातं. म्हणजेच कअर/कढर सेवेप्रमाणे स्टेट केडर दिलं जातं. भारतीय वनसेवेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलं जातं.
वयोमर्यादा - खुल्या प्रवर्गातील- २१ ते ३० वर्षे. ओ. बी. सी. उमेदवारांसाठी- २१ ते ३३ वर्षे.
अनुसूचित जात/ जमातीसाठी- २१ ते ३५ वर्षे.
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुढील विषयांत पदवी शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरतात. अ‍ॅनिमल हसबंडरी व व्हेटर्नरी सायन्स, बॉटनी, झुऑलॉजी, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र (जिऑलॉजी), भौतिकशास्त्र, संख्याशास्त्र, कृषी, फॉरेस्ट्री, इंजिनीयरिंग, गणित.
अटेम्प्टस् : खुल्या प्रवर्गातील उमेदवार जास्तीत जास्त चार वेळा, ओ. बी. सी. उमेदवार सात वेळा, अनुसूचित जाती/ जमातीसाठी २१ ते ३५ वर्षे वयोमर्यादा. कितीही वेळा परीक्षा देण्याची सवलत असते.
परीक्षेचे स्वरूप : आय. एफ. एस.ची परीक्षाही लेखी व मुलाखत अशी दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते.
लेखी परीक्षा - लेखी परीक्षा एकूण १४०० गुणांची असून यात एकूण सहा पेपर्स असतात.
प्रश्नपत्रिका- एक सामान्य इंग्रजी (३०० गुण)
प्रश्नपत्रिका- दोन सामान्य ज्ञान (३०० गुण)
प्रश्नपत्रिका- तीन व चार वैकल्पिक विषय-एक (प्रत्येकी २०० गुण) प्रश्नपत्रिक पाच व सहा वैकल्पिक विषय- दोन (प्रत्येकी २०० गुण) प्रश्नपत्रिका एक व दोन सर्व उमेदवारांना सारख्याच असतात. तर वैकल्पिक विषयांची निवड उमेदवारांनी स्वत: करायची असते. वर उल्लेख केलेल्या विषयांमधून दोन वैकल्पिक विषय निवडायचे असतात. लेखी परीक्षेतील प्रश्न निबंधात्मक असतात. वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी नसतात. परीक्षेचं माध्यम फक्त इंग्रजी असतं. प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी तीन तास वेळ असतो.
मुलाखत- लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना दिल्ली येथे मुलाखतीसाठी बोलावलं जातं. मुलाखतीसाठी एकूण ३०० गुण असतात. मुलाखतीमध्ये उमेदवाराची विचार करण्याची क्षमता, नेतृत्व गुण, प्रसंगावधानता, बहुश्रुतता इत्यादी गुणांची चाचणी घेतली जाते.
परीक्षेचे वेळापत्रक- आय. एफ. एस. सी. परीक्षा दरवर्षी जुलै महिन्यात घेतली जाते. याविषयी फेब्रुवारीत जाहिरात प्रसिद्ध होते. परीक्षेसाठी अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर निर्धारित पोस्ट ऑफिसेसमध्ये उपलब्ध होतात.
प्रशिक्षण व पदोन्नती- निवड झालेल्या उमेदवारांना विशेष प्रशिक्षण दिलं जातं. मसुरी येथील लालबहादूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन येथे फाऊंडेशन कोर्स तसंच देहराडून येथील इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अ‍ॅकॅडमी इथे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येतं. यानंतर एक वर्षांचा प्रत्यक्ष कार्यानुभव त्या त्या राज्यात घ्यावा लागतो. त्यानंतर चार वर्षांच्या अनुभवानंतर सीनिअर टाइम स्केलमध्ये नियुक्ती केली जाते. हे अधिकारी डेप्युटी कॉन्झव्‍‌र्हेटर ऑफ फॉरेस्टस् या पदासाठी पात्र असतात. त्यानंतर कॉन्झव्‍‌र्हेटर ऑफ फॉरेस्ट, चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, अ‍ॅडिशनल, प्रिन्सिपल चीफ कॉन्झव्‍‌र्हेटर ऑफ फॉरेस्ट, प्रिन्सिपल चीफ कॉन्झव्‍‌र्हेटर ऑफ फॉरेस्ट अशी पदोन्नती होते. पर्यावरण सचिव हे या केडरमधील सर्वोच्च पद असतं.
महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा
रेंज फॉरेस्ट ऑफिसर्स परीक्षा : (वनक्षेत्रपाल) या परीक्षेद्वरा बी. एस्सी. पदवीधारकाची एक वर्षांसाठी तर १२ वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येते. निवड झालेल्या उमेदवारांना चंद्रपूर येथील राज्य वनक्षेत्रपाल महाविद्यालयात प्रशिक्षण देण्यात येतं.
फॉरेस्ट सव्‍‌र्हिसेट एक्झामिनेशन : (असि. कॉन्झव्‍‌र्हेस्ट ऑफ फॉरेस्ट) (सहाय्यक वन संरक्षक) पात्रता : नॅचरल सायन्स, गणित, सांख्यिकीशास्त्र, यंत्र अभियांत्रिकी, स्थापत्य, रसायन, अभियांत्रिकी कृषी, अर्थशास्त्र या विषयातील पदवी असणं आवश्यक असतं. गणित, संख्याशास्त्र व अर्थशास्त्रातील विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र हे विषय घेतलेले असणं आवश्यक असतं. वयोमर्यादा- १८ ते २८ र्वष (३३ र्वष अनुसूचित जाती व जमातीसाठी) सर्व उमेदवारांना मराठीचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक.
लेखी परीक्षा
लेखी परीक्षेत पुढील विषयांचा समावेश आहे.
इंग्रजी ४ सामान्य ज्ञान
गणित (सर्वाना अनिवार्य विषय)
खालीलपैकी कोणतेही दोन वैकल्पिक विषय
वनस्पतिशास्त्र स्थापत्य अभियांत्रिकी
रसायनशास्त्र रासायनिक अभियांत्रिकी
भूगर्भशास्त्र कृषी गणित सांख्यिकी शाखा भौतिकशास्त्र अर्थशास्त्र प्राणिशास्त्र
कृषी यांत्रिकी यंत्र अभियांत्रिकी
व्यक्तिमत्त्व चाचणी
लेखी परीक्षेनंतर मुलाखत व व्यक्तिमत्त्व चाचणी घेतली जाते. प्रशिक्षणापूर्वी उमेदवारांना खालील गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक असतं.
चार तसांत २५ कि. मी. चालण्याची शारीरिक चाचणी
वैद्यकीय तपासणी
अभ्यासक्रम
वनरक्षक व फॉरेस्टर प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम
खालील संस्थांमध्ये चालवले जातात.
सेंट्रल फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज, चंद्रपूर
महाराष्ट्र फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज, चिखलदरा
फॉरेस्ट गार्ड ट्रेनिंग स्कूल, जालना
फॉरेस्ट गार्ड ट्रेनिंग स्कूल, शहापूर
फॉरेस्टर ट्रेनिंग स्कूल, पाल, जळगाव
वनरक्षक : कालावधी- सहा महिने
शैक्षणिक पात्रता- सात वी पास
वयोमर्यादा- १८ ते २५ र्वष
फॉरेस्टर- कालावधी एक वर्ष
शैक्षणिक पात्रता- १०वी पास
वयोमर्यादा १८ ते २४ र्वष
बी. एस्सी. (फॉरेस्ट्री)
हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून १२वी विज्ञानशाखेची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला इथे हा अभ्यासक्रम चालवला जातो.
प्रवेशासाठी संपर्क : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चर एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, १३२-ब, भांबुर्डा, भोसले नगर, पुणे- ४११००७. दूरध्वनी- ०२०- २५५३७६८८.
दी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, भोपाळ
वरील संस्थेमध्ये दोन वर्ष कालावधीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेस्ट्री मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम चालवला जातो. खुल्या वर्गातील उमेदवाराला पदवी परीक्षेत कमीत कमी ५०% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. (राखीव वर्गासाठी ४५% प्रवेश मिळवण्यासाठी आय. आय. एम.ची कॅट परीक्षा द्यावी लागते. कॅट स्कोअरवरून विद्यार्थ्यांना मुलाखत व गट चर्चेसाठी बोलावलं जातं. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना १००% जॉब प्लेसमेंट मिळते. वेतनमान सरासरी ४.२० लाख रुपये प्रतिवर्षी इतकं असतं. कॉर्पोरेट सेक्टर, बँका व वित्तीय संस्था, विकास संस्था, पर्यावरण संस्थेमध्येही नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात.
वेबसाईट : www.iifm.ac.in
इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन डेहराडून ही वनखात्यांतर्गत स्वायत्त संस्था आहे.
या संस्थेमध्ये खालील दोन वर्षांचे पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम चालवण्यात येतात.
फॉरेस्ट्री (इकोनॉमिक्स व मॅनेजमेंट)
वूड सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी.
तसंच खालील विषयांमध्ये एक वर्षांचे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा चालवण्यात येतात.
प्लँटेशन टेक्नॉलॉजी
पल्प अ‍ॅण्ड पेपर टेक्नॉलॉजी.
वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (देहरादून)
या संस्थेत पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन वाइल्ड लाईफ सायन्स हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम चालवला जातो. ५५% गुण मिळवून जीवशास्त्रासंबंधी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला पात्र असतात.
वेबसाईट : www.wii.gov.in
ट्रॉपिकल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट (जबलपूर)
या संस्थेमध्ये प्रामुख्याने संशोधनाचं कार्य चालतं. त्याचप्रमाणे जंगलसंबंधातील विविध व्यवसायांचे अल्प मुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रमही वर्षभर राबवले जातात.
वेबसाईट : www.tfri.res.in
इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेस्ट जेनेटिक्स अ‍ॅण्ड ट्री ब्रीडिंग (कोईम्बतूर)
वेबसाईट : www.ifgtb.res.in
इन्स्टिटय़ूट ऑफ वूड सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (बंगलोर)
वेबसाईट : www.iwst.res.in
इंडियन प्लाईवूड इंडस्ट्री रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट (बंगलोर)
वरील संस्थेमध्ये एक वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेकॅनिकल वूड इंडस्ट्री टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम चालवला जातो. विज्ञान तसंच इंजिनीयरिंगमधील पदवीधर वरील अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. तसेच अल्प मुदतीचे अभ्यासक्रमही संस्थेतर्फे चालवले जातात.
वेबसाईट : www.ipirti.gov.in
मेडिसिनल प्लँटस् कॉन्झव्‍‌र्हेशन सेंटर (पुणे)
औषधी वनस्पतीच्या संशोधनाचं काम या ठिकाणी चालतं.
वेबसाईट : www.rcmpcc.org
केरला फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट
जंगल संबंधातील विविध विषयांवर या ठिकाणी संशोधन केलं जातं.
वेबसाईट : www.kfri.org
जंगलसंबंधीच्या अभ्यासाचा व्याप आणि त्याची आवश्यकता ही एवढी विस्तृत आहे. केवळ सरकारी नोकऱ्याच नव्हे, तर कॉर्पोरेट कंपन्या, जंगलातील साधनसामग्रीवर आधारित उद्योग, स्वयंसेवी संस्था, बँका, वित्तीय संस्था, टीव्ही वाहिन्या, नियतकालिक, पर्यावरण संस्था यासारख्या अनेक ठिकाणी आज फॉरेस्ट्रीमधील तज्ज्ञांची आवश्यकता आहे. यामध्ये चांगलं वेतनमानही मिळतं. जीवसृष्टीच्या भवितव्यासाठीही चांगल्या जंगलतज्ज्ञांची आवश्यकता आहे.
आनंद मापुस्कर
फोन : ०२२-३२५०८४८७