Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ मार्च २००९
  ध्येयवाद आणि करिअरही
  भारतीय वनसेवेची आव्हानात्मक परीक्षा
  सब ब्रोकर - उपदलाल
  मायक्रोसॉफ्टमध्ये ‘इंटर्नशिप’
  विदेशातील प्रवेश प्रक्रिया : अर्जासोबतच्या कागदपत्रांची पूर्तता
  र्मचट नेव्हीमधील करिअर
  ‘बीएसएनएल’मधील टेलिकॉम ऑफिसरपदाची तयारी
  विस्तारा स्वप्नांच्या कक्षा..
  सुंदर आणि सशक्त

 

बरेचदा छोटय़ा छोटय़ा गुंतवणूकदारांना गुंतवणुकीविषयक बऱ्याच प्रकारचे प्रश्न भेडसावत असतात. असेही घडते की, स्वत: छोटा गुंतवणूकदार असल्यामुळे, छोटय़ा गुंतवणुकीच्या मार्गदर्शनासाठी कोणाकडे जाण्यास तो संकोच करतो. याचे कारण असे की, मोठय़ा गुंतवणूकदारांना सल्ला देणाऱ्या तज्ज्ञांचा अमूल्य वेळ घेण्यास तो बिचकतो. त्याच्या या संकोची स्वभावामुळे अनेक उत्तमोत्तम संधींना तो पारखा होतो. शेअर बाजारापासून मिळणारा नफा छोटय़ा
 

गुंतवणूकदारांपर्यंत पोचविण्याचे काम उपदलालाद्वारे केले जाते. छोटय़ा गुंतवणूदारांच्या मनातील संकोच दूर करून त्यांची अविरत सेवा करण्याचे व्रत उपदलालाने स्वीकारलेले असते. शिवाय उच्चभ्रू गुंतवणूकदारांपासून तळागाळापर्यंत पोचण्याचे हे एक उत्तम साधन आहे हेही तितकेच खरे. एखाद्याच्या अंगात शेअर बाजारातील दलाल होण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण असतात, परंतु दलाल होण्यासाठी आवश्यक असणारे भांडवल मात्र अपुरे असते. या एका मुद्दय़ावर तो अडून बसत नाही. त्याला त्याचे कौशल्य दाखविण्याची संधी उपदलालाच्या रूपाने शेअर बाजाराने उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी त्याला एका दलालामार्फत सेबीकडे रजिस्ट्रेशन करावे लागते. उपदलाल दलालाचे नेटवर्क विस्तारतो, त्याचबरोबर संपूर्ण गुंतवणूक उद्योगाची खोली वाढविण्यास हातभार लावतो. श्रीपती होल्डींग्ज अ‍ॅण्ड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील उपदलाल नरेंद्र जैन यांचे अनुभवाचे बोल ऐकूया.
आपली कौटुंबिक व शैक्षणिक पाश्र्वभूमी काय आहे?
माझं बालपण आणि सारे विद्यार्थी जीवन आसाममध्ये गेलं. तिथे माझे वडील सिव्हील कॉन्ट्रॅक्टर होते. तिथे मला शेअर बाजारविषयक शिक्षण घेण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठीदेखील संधी नव्हती. त्यामुळे वडिलांच्या सांगण्यानुसार बी. ई. केलं. एका इंजिनीअरिंग कंपनीमध्ये एक वर्ष नोकरी केली.
असं होतं तर मग शेअर बाजारातल्या करिअरकडे कसे आणि का वळलात?
माझे काका मुंबईत राहात होते. ते वस्त्रोद्योगात काम करत होते. नशिब आजमावायला मी काळबादेवीला राहायला आलो. त्या घरापासून जवळच श्रीपती होल्डिंगच ऑफीस होतं. मी एक गुंतवणूकदार म्हणून तिथे गेलो होतो. त्यांनी मला तिथे नोकरी दिली. जेव्हा जॉईन झालो तेव्हा इथेच करिअर करायचं असं ठरवलेलं नव्हतं. कामात गोडी निर्माण होत गेली. अभ्यास वाढत गेला. तसतसा मी इथेच स्थिरावत गेलो. इंजिनीअर म्हणून नोकरीला लागलो तेव्हा मला महिना फक्त पाचशे रुपये पगार होता. इथे मात्र सुरुवात चार हजार रुपयांनी झाली. हेदेखील मला आकर्षक वाटले.
उपदलाल व्हावेसे का वाटले?
मी पाच वर्षे बॅक ऑफिसमध्ये काम केले. माझे अनेक मित्र मला क्लायंट म्हणून मिळू शकतील एवढी क्षमता निर्माण झाली. गेली चार-पाच वर्ष मी उपदलालाच काम करत आहे. यासाठी मी टेक्निकल अ‍ॅनालिस्टचा कोर्स पूर्ण केला. अखेर नोकरीत मिळणाऱ्या वेतनाला मर्यादा असतात. इथे आपण त्यापेक्षा जास्त मिळवू शकू अशी खात्री वाटली आणि तसाच अनुभव आला.
आपल्या क्लायंटला पारदर्शकतेने सेवा देणे हे किती महत्त्वाचे वाटते?
अगदी शंभर टक्के. कारण त्यामुळे विश्वास निर्माण होतो. माझं नेटवर्क मित्रांनी दिलेल्या रेफरन्समुळे वाढत गेले. प्रथम त्यांची गरज आणि त्यांचा स्वभाव जाणून घेतो. काहीजण पूर्णत: स्पेक्युलेटर्स असतात तर काही गुंतवणूकदार थोडय़ा प्रमाणात स्पेक्युलेटर्स असतात. प्रत्येकाची जोखीम क्षमता भिन्न असते. त्यांच्या सर्व गरजांमध्ये मी त्यांना मदत करतो. त्यांना म्युच्युअल फंड, विमा याबाबतीत माझ्या मित्रांचे रेफरन्स देतो. करविषयक काही समस्या असली तर सी. ए. बरोबर चर्चा करून ती सोडवितो. टेक्निकल चार्टची मदत घेऊन सल्ला देतो. अगोदरच स्टॉपलॉसची मर्यादा घालून देतो. त्यामुळे क्लायंटलाही सहज सोपे वाटते.
कामात चूक झाल्यास कशी सुधारता?
कामात चूक झाली तर ती लवकर सुधारता यावी म्हणून ताबडतोब क्लायंटला कळवितो. चूक जेन्युईन असेल तर क्लायंट ती स्वीकारतो अन्यथा कधी कधी तो भरुदड स्वत:ला सोसावा लागतो. ते त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते.
व्यवसाय वाढविण्यासाठी कोणते प्रयत्न करता?
एक तर सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करतो. आयपीओपासून सर्व प्रकारच्या गुंतवणुकांसाठी मार्ग दाखवतो. कधी कार्यालयात, कधी दूरध्वनी करून तर कधी प्रत्यक्ष जाऊन भेट घेतो. कंपनीच्या सेमिनार्स आणि मीटिंगना आवर्जून आमंत्रित करतो. त्यांच्या संपूर्ण बचतीचे विभाजन कसे करावे हे ठरविण्यासाठी माझा सध्या अभ्यास चालू आहे. त्यासाठी मी एक नवीन कोर्सही करणार आहे.
आज आपल्याकडे किती क्लायंट आहेत?
सुरुवातीला पाच होते आता तीस आहेत. पाच वर्षांत पाच-सहा पटीने वाढ झालेली आहे.
श्रीपती होल्डिंगच्या पाठिंब्यामुळे आपल्या यशस्वीतेत भर पडलेली आहे काय?
होय. इथले व्यवस्थापन सहकार्याचे आहे. कंपनीने पायाभूत सुविधांचा पुरवठा केलेला आहे. इथल्या कार्यपद्धतीशी आणि कर्मचाऱ्यांशी माझे चांगलेच जमलेले आहे. त्यामुळे मी माझ्या कामावर एकाग्रतेने लक्ष घालू शकतो.
सेबीच्या नियंत्रणाविषयी आपले मत काय आहे? उपदलाल या कामाला दूर करणे त्यांना शक्य होईल काय?
सेबीमुळे शेअर बाजारात खूपच सुधारणा झालेल्या आहेत. उदा. पेपरफॉर्ममधील शेअर्सच्या बाबतीत, हरविणे व स्कॅम होणे हा प्रकार आता पूर्णपणे बंद झालेला आहे. अशा अनेक बाबी सांगता येतील. मात्र पाच वर्षांपूर्वीची केस, सेबी उकरून काढते ते मला अयोग्य वाटते. पाच वर्षांपूर्वीची परिस्थिती व सारे काही आठवणे अशक्य आहे. उपदलाल हा मध्यस्थ नसावा याविषयी जरी चर्चा झाली, तरी ते प्रत्यक्षात उतरविणे अशक्य आहे. दलालांना सर्व क्लायंटपर्यंत पोचणे अशक्य आहे. त्यांना तेवढा वेळही नसतो. शिवाय भारतातली फक्त चार-पाच टक्के जनताच शेअर बाजारात गुंतवणूक करत आहे. उर्वरित लोकांपर्यंत पोचण्यासाठी उपदलालाचे काम चालू ठेवणे अत्यावश्यक आहे.
नव्याने उपदलाल होऊ इच्छिणाऱ्याने कोणती पूर्वतयारी करायला हवी?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुभव. अनुभव हाच गुरू आहे. कारण पुस्तकात सर्वच घटना लिहिलेल्या नसतात. ते सारे बाजारात अनुभव घेतानाच समजते. पायाभूत प्रशिक्षण तर घ्यायलाच हवे.
या करिअरमध्ये नवयुवकांना संधी आहे काय?
होय नक्कीच. बहुसंख्य जनतेपर्यंत शेअर बाजार पोचलेलाच नाही. त्यांना तो केवळ सट्टाबाजार आहे असे वाटते. परंतु हे गुंतवणुकीचे उत्तम साधन कसे आहे, हे नव्या उपदलालांमार्फत समजू शकेल. त्यांचे गैरसमज दूर झाल्यामुळे कामाला स्कोप वाढेल.
कामाच्या वेळी टेन्शन येते काय? ते कसे घालविता?
काम करताना कधी कधी टेन्शन येते. परंतु दिवसअखेरीस मी शांत असतो. मी बॅडमिंटन आणि बुद्धिबळ खेळतो.
यशस्वी उपदलाल नरेंद्र जैन यांच्या अनुभवातून उपदलाल हे करिअर कसे अल्पमोली बहुगुणी हे लक्षात येते.
सुरेखा मश्रुवाला
शब्दांकन : डॉ. शुभांगी वाड-देशपांडे

shweni45@hotmail.com
फोन: ०२२-२६३२१४८१