Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ मार्च २००९
  ध्येयवाद आणि करिअरही
  भारतीय वनसेवेची आव्हानात्मक परीक्षा
  सब ब्रोकर - उपदलाल
  मायक्रोसॉफ्टमध्ये ‘इंटर्नशिप’
  विदेशातील प्रवेश प्रक्रिया : अर्जासोबतच्या कागदपत्रांची पूर्तता
  र्मचट नेव्हीमधील करिअर
  ‘बीएसएनएल’मधील टेलिकॉम ऑफिसरपदाची तयारी
  विस्तारा स्वप्नांच्या कक्षा..
  सुंदर आणि सशक्त

 

विदेशातील प्रवेश प्रक्रिया : अर्जासोबतच्या कागदपत्रांची पूर्तता
भाग ३

विदेशातील विद्यापीठातील प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची वैयक्तिक कामगिरी, त्याच्या आयडिया व त्याचे करिअरचे उद्दिष्ट यांना खूप महत्त्व दिले जाते. विद्यार्थ्यांने अर्जासोबत जी कागदपत्रे सादर केली आहेत त्यावरून त्याची पाश्र्वभूमी जाणून घेतली जाते. त्याची गुणपत्रिका, शिफारसपत्रे याबरोबरच त्याला स्टेटमेंट ऑफ परपज (एसओपी) किंवा अनेक वैयक्तिक टिपणे
 

लिहावी लागतात. या एसओपीबद्दल, त्यात काय लिहायचे याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात शंका असतात, पण ही माहिती खूप महत्त्वाची असते. या एसओपीबद्दल व ते कसे लिहायचे याबद्दल आज आपण विस्ताराने जाणून घेऊ. लेखात मास्टर्स डिग्रीकरिता एसओपी कसे लिहावे याची माहिती प्रामुख्याने दिलेली असली तरी एमबीए व बॅचलर डिग्रीकरता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा उपयोग होईल.
ग्रॅज्युएट स्कूलना बहुधा खालील माहितीत इंटरेस्ट असतो-
१. हा अभ्यासक्रम करण्यामागील तुमचा उद्देश. याचा अर्थ या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यापूर्वी तुम्हाला त्यावर सखोल विचार करावा लागेल.
२. कोणत्या शाखेत तुम्हाला स्पेशलायझेशन करायचे आहे. याचा अर्थ शाखा निवडण्यापूर्वी तुम्हाला त्याची पुरेशी माहिती आहे.
३. या ग्रॅज्युएट अभ्यासाचा पुढे तुम्ही कसा उपयोग करणार, भविष्यातील तुमच्या योजना व करिअरची उद्दिष्टे यांचा यात समावेश करा.
४. या शाखेतील अभ्यासाकरिता तुम्ही काय विशेष तयारी केली आहे व तुम्ही प्रवेश मिळण्यास का योग्य आहात याची माहिती द्या. तुमचे शिक्षण व त्याचा तुम्ही इतर उपक्रमात केलेला उपयोग याचा उल्लेख करून या दोन्हीमुळे तुम्ही एक विशेष लायक विद्यार्थी कसे आहात ते इथे सिद्ध करू शकता.
५. तुमच्या रेकॉर्डमध्ये काही विसंगती असेल किंवा काही समस्या असतील किंवा एखाद्या सत्रात कमी गुण मिळालेले असतील तर ते लिहा. मात्र ते सकारात्मक रीतीने द्या व पटेल अशी कारणे द्या. वाईट कामगिरीचे खंडन करण्यासाठी हे लिहायचे आहे, त्यामुळे शेवटी तुमच्या क्षमतेविषयी सकारात्मक विधान करा.
६. ‘ह्य़ाच स्कूलमध्ये का शिकायचे आहे?’ असा प्रश्न कदाचित विचारला जाईल. म्हणून त्या स्कूलबद्दल माहिती जमा करून ठेवा व कोणत्या खास कारणाने तिची निवड केली त्याचे उत्तर तयार असू द्या.
७. मुख्यत: एक व्यक्ती म्हणून तुमची माहिती या स्टेटमेंटमधून तुम्ही देत आहात. जी माहिती तुम्ही दिली आहे त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही माहिती नसते. तुम्ही स्वत:च या स्टेटमेंटचा विषय आहात.
एसओपीबाबत काही महत्त्वाचे मुद्दे
१) स्टेटमेंट ऑफ परपज हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाविषयी विधान करते. तुम्ही कोण आहात, तुमची आतापर्यंतची करिअर, तुमचे उद्दिष्ट आणि ते साध्य करण्याकरिता तुमचे नियोजन, हे तुमच्या स्वत:च्या शब्दात लिहा व खूप नेमकेपणाने लिहा.
२) तुमच्या अर्जासोबतच्या कागदपत्रांपैकी आता फक्त एसओपीच तुमच्या हातात आहे, इतर सर्व होऊन गेलेल्या बाबी आहेत. म्हणजे आतापर्यंतच्या शिक्षणात जास्तीत जास्त चांगले यश मिळवलेले आहे, जीआरई, टीओईएफएल, इतर उपक्रम, यात उत्तम यश मिळवलेले आहे. त्यात जे गुण मिळालेले आहेत, त्यात आता बदल करता येणार नाही. अर्ज करणाऱ्या तुम्ही एकुलत्या एक व्यक्ती नसून, जगभरातून अनेकजण अर्ज करत असतात व त्यांनाही तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले असतात.
या गर्दीत इतरंपेक्षा तुमचा अर्ज जास्त लक्षवेधक व्हावा यासाठी तुम्ही एसओपीचा उत्तम उपयोग करून घेऊ शकता. फक्त एसओपीमधूनच तुम्ही संवाद साधू शकता, तुमच्या अंतर्मनातील भावना प्रवेश समितीपर्यंत पोहोचवून त्यांचे मत अनुकूल करून घेऊ शकता. तुमची ज्ञानाची ओढ, जिद्द व करिअरचा फोकस हे एसओपीच्या मजकुरातून स्पष्ट दिसले पाहिजे.
३) विचारपूर्वक, उत्तम लिहिलेला व शैलीदार एसओपी लिहिण्यासाठी वेळ द्यवा लागतो. तितका वेळ मिळेल याची खात्री करा. अनेक विद्यार्थी एसओपी लिहिण्याचे काम शेवटपर्यंत पुढे ढकलत राहतात असे मी बघितलेले आहे.ते इतर सर्व कागदपत्रे जमा करतात. मात्र एक सर्वात छान एसओपी लिहिण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळे एसओपीसाठी काही कल्पना सुचतील याची वाट बघत ते थांबतात. त्याऐवजी पुन: पुन्हा एसओपी लिहिणे ही पद्धत जास्त उपयोगी आहे. तुमच्या कल्पना कागदावर लिहा, कोणत्याही परिच्छेदापासून सुरुवात करा, वाचा व तुमचे समाधान होईपर्यंत पुन: पुन्हा वाचा. तसेच ‘परिपूर्ण एसओपी’ असा काही नसतो हे लक्षात घ्या. तुम्ही ज्या परिस्थितीत आहे त्यासाठी तुम्हाला योग्य होईल असा एक ‘चांगला एसओपी’ लिहिणे हा उद्देश्य असू दे.
४) प्रवेश समितीला शेकडो- हजारो एसओपी वाचावे लागतात. तुमचा एसओपी वाचायला सुरुवात केल्यानंतर, तो वाचण्याचा त्यांचा उत्साह शेवटपर्यंत टिकून राहणे महत्त्वाचे आहे. त्यांचा वेळ वाया घालवणारा कोणताही मजकूर कसोशीने टाळा. तुमचे छंद, कौटुंबिक पाश्र्वभूमी याविषयी विस्ताराने लिहू नका. तुमच्या पुढच्या अभ्यासक्रमाशी संबंधित नसेल तर इतर उपक्रमांविषयीही विस्ताराने लिहू नका. त्याऐवजी तुमच्या कल्पना, योजना, संशोधनाचे विषय इत्यादीविषयी लिहा.
आणखी काही सूचना
ज्यांच्याविषयी तुम्हाला आदर वाटतो, शक्यतोवर तुमची शिफारस लिहिणारे तुमचे प्राध्यापक यांना तुमचे स्टेटमेंट ऑफ परपज वाचायला द्या. त्याबाबत हयगय करू नका. त्यांच्याकडून त्यावर मत द्या. ते काय म्हणतात त्यावर विचार करा. तुम्ही स्वत: जे लिहिले आहे त्याबद्दल तुम्हाला नि:पक्षपातीपणे निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे त्रयस्थ व्यक्तीचे मत जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. नंतर त्यांच्या मतानुसार तुम्हाला त्या एसओपीत सुधारणा करणे आवश्यक वाटले तर करा व पुन्हा मत घ्या.
एसओपीचे दुसऱ्या कोणाकडून मुद्रितशोधन करून घ्या. तुमच्याकडून राहून गेलेले काही त्यांच्या नजरेस येऊ शकेल. जर मदत करणारे मित्र असतील तर दोघांकडून तपासलेले चांगले.
शेवटी अर्ज करत असलेल्या प्रत्येक स्कूलसाठी एकच एसओपी पुन: पुन्हा वापरू नका. तीच माहिती तुम्ही पुन्हा वापरू शकता, पण प्रत्येक स्कूलसाठी त्यात थोडा बदल करा. नाहीतर तुमचा एसओपी जुना आहे असे प्रवेश समितीच्या लक्षात येईल. तुमचा उत्साह व आत्मविश्वास जाणवला पाहिजे!
विनायक कामत
फोन: ९८६७३२२७४८.