Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ मार्च २००९
  ध्येयवाद आणि करिअरही
  भारतीय वनसेवेची आव्हानात्मक परीक्षा
  सब ब्रोकर - उपदलाल
  मायक्रोसॉफ्टमध्ये ‘इंटर्नशिप’
  विदेशातील प्रवेश प्रक्रिया : अर्जासोबतच्या कागदपत्रांची पूर्तता
  र्मचट नेव्हीमधील करिअर
  ‘बीएसएनएल’मधील टेलिकॉम ऑफिसरपदाची तयारी
  विस्तारा स्वप्नांच्या कक्षा..
  सुंदर आणि सशक्त

 

असं म्हटलं जातं की जीवनाला गती देण्याची क्षमता स्वप्नांत असते. स्वप्न आणि वास्तव यामध्ये खूप अंतर असलं तरी स्वप्न हे सुखद, ऊर्जेने भरलेले आणि चेहऱ्यावर स्मित फुलवणारं असतं. बहुतेक जण या स्वप्नांना आक्षेप करताना दिसतात, दिवसा ढवळ्या कसली स्वप्न पाहतोयस? जी स्वप्नं पूर्ण होणार नाहीत ती पाहणं म्हणजेच निर्थक, पण स्वप्न पूर्ण होणारच नाहीत अशा भावनेने स्वप्न पाहायचं सोडून देऊन साऱ्यांनी आपलं अवकाश खुजं करायचं का? आज ते काही भव्य दिव्य दिसतं, जे पाहून आपण प्रशंसा करतो,ते मिळवण्याचं, ते घडवण्याचं स्वप्न नक्कीच कुणीतरी पाहिलंच असेल ना. काहीतरी भव्यदिव्य साकारण्याच्या प्रेरणेतून किंवा लहानमोठय़ा स्वप्नातून जे काही साकारलं गेलं आहे त्याच्या उपयुक्ततेची आणि सुंदरतेच्या आविष्काराची प्रचिती समाजाला आली. ‘ताजमहल’ ही अशीच अतुलनीय, अवर्णनीय प्रतिकृती. ती घडविण्याचं स्वप्नही शहाजहानने पाहिलं असेलच ना. अगदी अशक्य वाटणारं हे स्वप्न. त्यासाठी लागलेला कालावधी. म्हणजे स्वप्नपूर्ततेसाठी भली मोठी किंमत मोजावी लागते. त्याच्या पूर्ततेसाठी योग्य दिशा आखावी लागते.
करिअरच्या बाबतीत प्रत्येकजण काही ना काही स्वप्नं बघतातच. कुणाला डॉक्टर व्हायचं असतं. कुणाला इंजिनीअर, कुणाला प्राध्यापक, कुणाला शास्त्रज्ञ. त्यासाठी दहावी हा टर्निग पॉइंट आहे हे लक्षात घेऊन अ‍ॅडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये
 

मिळावे म्हणून मार्क्‍स मिळविण्यासाठी धडपड केली जाते, ध्येय ठरवली जातात. दिशा आखल्या जातात. म्हणजे आपण अगदी सुरुवातीपासूनच आपल्या छोटय़ा छोटय़ा स्वप्नांच्या पूर्ततेसाठी, आकांक्षांसाठी योजना आखत असतो.
जेवढे स्वप्न भव्यदिव्य तेवढे त्याला पूर्ण करण्याच्या वाटाही अवघड. वाट अवघड असली म्हणून काय आपण चालायचं सोडतो?
तुमच्या स्वप्नांना तुमच्या सकारात्मक विचारांची जोड हवी. परिश्रमाशिवाय प्रारब्ध पांगळे असते. जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची कसोटी आहे.
बहुतेक वेळा अनेक तरुण- तरुणी व्यवसाय करू इच्छितात. टाटा, बिर्ला, अंबानी, किर्लोस्कर यांच्यासारखं साम्राज्य उभारण्याचं मनातही असतं, मग गाडी नेमकी कुठे थांबते? या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर लक्षात येईल की एखाद्या उद्योगात टिकून राहायचं असेल, व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर सतत व्यवसायाचा विकास करत राहणं, व्यवसाय वाढवणं हाच मार्ग असतो. स्पर्धा प्रचंड असते, खर्चही खूप असतो, पण आता बस्स, व्याप वाढवायचा नाही असं एखाद्या उद्योजकाने ठरवलं की आहे तोही व्याप व्यवस्थित सांभाळला जात नाही, हळूहळू व्याप कमी होतो आणि मग व्यवसायही कसाबसा चालतो आणि एखाद्या दिवशी बंद पडतो. व्यावसायिक यशासाठी उद्योजकाने एक लक्षात घेतलं पाहिजे की थांबला तो संपला. सतत काहीतरी नावीन्याचा ध्यास, बाजारातील परिस्थितीचा अंदाज, अचूक निर्णयक्षमता, प्रतिकूल परिस्थितीतही अनुकूल उत्पादन, उत्कृष्ट दर्जा याच्याशी तडजोड करून चालणार नाही.
एखादा उद्योजक एखाद्या उद्योगात यशस्वी होतो, तेव्हा केवळ उद्योगात या वर्षी एवढा नफा मिळवला एवढय़ावर त्याचं यश निर्भर नसतं. तर उद्योजकाने मग तो मोठा असो वा छोटा, निर्माण केलेली रोजगाराची संधी, त्याची सेवा, उत्पादन विकणारे वितरक, दुकानदार यांचा व्यवसाय, त्याच्या उत्पादनामुळे, सेवेमुळे समाधानी असलेले ग्राहक, उद्योजकाकडून प्रेरणा घेऊन निर्माण होणारे नवउद्योजक या साऱ्याचं मोजमाप म्हणजे यश.
त्यामुळे उद्योगात यशस्वी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या साऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की, तुमच्या स्वप्नांच्या कक्षा विस्तारा. मी तयार केलेलं उत्पादन/ माझी सेवा ही उत्कृष्टच असेल. माझं उत्पादन हे माझ्या शहरापुरतं, माझ्या राज्यापुरतं, माझ्या राष्ट्रापुरतं मर्यादित न राहता ते जागतिक पातळीवर कसं नेता येईल आणि त्यातून माझा आणि माझ्या राष्ट्राचा विकास कसा साधता येईल असं स्वप्न पाहा.
तुमच्या व्यवसाय/ उद्योगाच्या स्वप्नपूर्ततेसाठी गरज आहे ती योग्य दिशा निवडून त्या स्वप्नपुर्ततेसाठी वेळीच पावले उचलण्याची. काळाचा रोख लक्षात घेऊन त्याप्रमाणे बदलण्याची.
यशाची काही सूत्रे :
दुर्दम्य इच्छाशक्ती, अचूक निर्णय आणि दूरदृष्टी यांचे संमिश्रण यशासाठी आवश्यकच आहे.
जीवघेण्या स्पर्धेशी टक्कर देण्यासाठी मानसिक संतुलन गरजेचे आहे.
माझं हे स्वप्न आहे, असं केवळ म्हणून होत नाही तर त्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी प्रयत्नांचे पंख लावावे लागतात. कल्पना विलासात रमण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर द्या.
सतत चांगली पुस्तकं वाचा, वाचन करा, वाचनाने माणूस समृद्ध होतो. चांगल्याचं अनुकरण करा.
अपयश आलं तरी न डगमगता ते काम पुन्हा करण्याची मानसिक तयारी ठेवा.
उद्योग सुरू केल्यावरच लगेचच सर्व सुरळीत होईल असं नाही. यशाची वाट ही खडतरच असते पण यशानंतर मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.
काम करायचे म्हणून करू नका तर कोणत२ही काम अतिउत्कृष्ट कसे होईल याकडे कल असू द्या.
आपल्या यशात आपल्याशिवाय इतरांचा सहभाग, पाठिंबा असतोच. कुटुंब आणि समाजाचे नेहमीच ऋणी राहा.
उद्योगातच नव्हे तर इतर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत करणे आवश्यक आहे. मेहनतीला पर्याय नाही.
यशस्वी होण्याची बहुतेकांची इच्छा असते पण ध्येयनिश्चिती अजिबात नसते. एमलेस धडपड निष्फळ ठरते हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचं ध्येय ठरवा.
कोणत्याही कामाची लाज बाळगू नका. हे काम माझे नाही असं म्हणूच नका. सारं काही करायची तयारी असली पाहिजे. अहंपणाला बाजूला ठेवा. खरा उद्योजक तोच ज्याला आपल्या उद्योगातील ए टू झेड माहीत आहे.
तुमच्यामध्ये आत्मविश्वास असायला हवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक विचारसरणी. नकारात्मक विचारांना अजिबात खतपाणी घालू नका.

वेळेचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे.
महिलांसाठी खास- घर आणि करिअर/ व्यवसाय या दोन्ही बाजू सांभाळताना दमछाक होतेच पण ही दमछाक वेळेचे अचूक नियोजन केल्यास नक्कीच टळू शकेल.
व्यावसायिक यशासाठी दृष्टिकोन खूप महत्त्वाचा असतो.
सतत नवनवीन व्यवसायिक कौशल्य शिका आणि स्वत:च्या ज्ञानात भर घाला.
व्यवसायिक निर्णयातील विलंब टाळा.
सर्वच कामे स्वत: करण्याचा प्रयत्न करू नका. काम करून घेणे म्हणजे व्यवसाय.
व्यवसायात भान ठेऊन योजना आखा आणि त्या बेभान होऊन राबवण्याचा प्रयत्न करा.
उद्या व्यवसाय टिकविण्यासाठी आजच नियोजन करा.
व्यवसायात पाच ‘डी’ना महत्त्व द्या.
डिटर्मिनेशन- निर्धार, डिसिप्लीन- शिस्त, डेडिकेशन- समर्पण, डिव्होशन- एकनिष्ठपणा, डिस्क्रीमिनेशन- विवेक.
काम करून घेणे ही जशी व्यवसायिक कला आहे तशीच व्यवसायात काही गोष्टी न करणे, टाळणे हीसुद्धा कला आहे. नेमकेपणाने अनावश्यक गोष्टी टाळता आल्या पाहिजेत.
यश मिळविण्याची इच्छा बहुतेकांची असते पण प्रत्यक्षात खूप कमी लोक यशस्वी होताना दिसतात. यश मिळेपर्यंत पुन: पुन्हा प्रयत्न करावे लागतात. यश जवळ असतं पण प्रयत्न कमी पडतात आणि आपण म्हणतो तो अपयशी झाला. खरं तर अपयश ही एक घटना असते. एक प्रसंग असतो त्याचा सकारात्मक विचार केला तर आपल्याला अपयश यशासाठी प्रेरणा देते.
अपयश आपल्याला सांगते की आपण कुठे
चुकलो, काय बदलले पाहिजे, काय सुधारले पाहिजे, अजून काय करायला हवं, कसं करायला हवं.
एखाद्या व्यवसायात थोडंफार अपयश आलं तर घाबरून जायचं नाही. तर ती यश मिळवण्यासाठी एक संधी आहे असा विचार करावयाचा आणि म्हणायचं हम होंगे कामयाब.. मन में है विश्वास, पुरा है विश्वास.. हम होंगे कामयाब!
सारिका भोईटे- पवार
दू. क्र. ९८१९५९७१३२/ २५३७९९४४