Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ मार्च २००९
  ध्येयवाद आणि करिअरही
  भारतीय वनसेवेची आव्हानात्मक परीक्षा
  सब ब्रोकर - उपदलाल
  मायक्रोसॉफ्टमध्ये ‘इंटर्नशिप’
  विदेशातील प्रवेश प्रक्रिया : अर्जासोबतच्या कागदपत्रांची पूर्तता
  र्मचट नेव्हीमधील करिअर
  ‘बीएसएनएल’मधील टेलिकॉम ऑफिसरपदाची तयारी
  विस्तारा स्वप्नांच्या कक्षा..
  सुंदर आणि सशक्त

 

ब्युटीशियन होण्यासाठीचे अनेक कोर्सेस दहावी-बारावीनंतर उपलब्ध असून, अगदी तीन दिवसांपासून ते तीन वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम आवड व सवडीनुसार उपलब्ध आहेत.
आरोग्यम् धनसंपदा किंवा Health is wealth अशा स्वरूपाचे सुविचार ऐकतच आपण लहानाचे मोठे होत असतो. किंबहुना बऱ्याचदा आजारी पडल्याशिवाय आपणाला उत्तम आरोग्याची किंमतही कळत नाही. त्याचप्रमाणे व्यक्तीचे सौंदर्य म्हणजे व्यक्तीने स्वत:च स्वत:ची केलेली शिफारस असते, त्यासाठी कोणाच्याही ओळखपत्राची जरुरी नसते. या सौंदर्यामध्येच व्यक्तीची शक्ती सामावलेली असते. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी तर एकदा म्हटले होते की, ‘‘सौंदर्य हे स्त्रीचे सामथ्र्य आहे, तर सामथ्र्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे.’’ आपले व्यक्तिमत्त्व चारचौघांमध्ये अधिक उठून दिसावे, खुलून दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते. कोणत्याही समारंभामध्ये, सोहळ्यामध्ये किंवा एखाद्या घरगुती कार्यक्रमात देखील आपण पाहतो की, प्रत्येकालाच (मग ती स्त्री असो वा पुरुष असो) वाटत असते की आपण देखील इतरांपेक्षा थोडंसं हटके दिसावं. मग त्यासाठी चार पैसे जास्त देऊन का होईना
 

परंतु ब्लिच, फेशियल, क्लिन अप, आयब्रो, वॅक्सिंग, पमिंग, मेहंदी, हेअर स्टाईल, मेक-अप, मेनिक्युर, पेडिक्युर असे सोपस्कार करून घ्यायला आपण सहज तयार असतो. त्याचप्रमाणे एकीकडे फास्ट फूड आणि जंक फूडच्या आहारी गेलेला तरुण वर्ग दुसरीकडे स्वत:च्या फिजिकल फिटनेसच्या बाबतीत देखील तेवढाच जागरूक असलेला आढळून येतोय आणि म्हणूनच या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रचंड मोठी संधी येथे उपलब्ध आहे.
सध्या या व्यवसायात कुणी कल्पनाही करू शकणार नाही इतकी म्हणजे जवळजवळ बारा हजार करोड रुपयांपेक्षाही जास्त गुंतवणूक झालेली आहे. येत्या वर्षांमध्ये १५ हजारपेक्षाही जास्त व्यक्तींना या क्षेत्रात व्यवसाय उपलब्ध होऊ शकतो असे या उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे आणि प्रत्येक वर्षी अधिक जलद गतीने म्हणजेच ३० टक्के वाढ या व्यवसायात अपेक्षित आहे. हे क्षेत्र केवळ ब्युटी पार्लर यापुरतेच मर्यादित राहिलेले नसून याच्या कक्षा आता अधिकाधिक विस्तारत चाललेल्या आहेत. कॉस्मेटॉलॉजी आणि कॉस्मेटिक सर्जरी, स्पाज आणि सलून्स, न्युट्रिशन, डाएट, ब्युटी उत्पादने, ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी, हेअर विव्हिंग, मेक ओव्हर इ. प्रकार देखील उदयाला आलेले आहेत. तसेच सलून म्हटल्यामुळे केवळ न्हावी समाजातीलच नव्हे तर इतरही होतकरू तरुण या क्षेत्रात येत आहेत आणि स्थिरावत आहेत.
जे उमेदवार नवनवीन कल्पना राबवू शकतात आणि ज्यांना ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये काम करायची इच्छा आहे असा तरुणांसाठी सौंदर्य क्षेत्रातील व्यवसाय ही करिअरची अत्यंत चांगली सधी किंवा पर्याय आहे असे म्हणता येईल. तुमच्या आवडीनुसार व योग्यतेनुसार तुम्हाला हव्या असलेल्या शाखेमध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता. तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा तुमच्याकडे असलेल्या कौशल्याला येथे जास्त महत्त्व आहे. कॉस्मेटोलॉजिस्ट, हेअर स्टायलिस्ट, ब्युटी थेरपिस्ट, मेकअप आर्टिस्ट, स्पा थेरपिस्ट, फिटनेस तज्ज्ञ, स्वत:चे सलून, सौंदर्य सल्लागार. अशा विविध संध्या येथे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे लग्नसमारंभ, टिव्हीवरील शोज किंवा स्टेज शोज इ. प्रसंगी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करता येते. विशिष्ट हेअर स्टाईल किंवा केस कापून एखाद्या व्यक्तीचे एकूणच व्यक्तिमत्त्व बदलून टाकण्याचे कौशल्य प्राप्त करणे व त्याद्वारे स्वत:चा व्यवसाय वाढवणे हेदेखील शक्य आहे. स्कीन केअर स्पेशालिस्ट हेअर स्टायलिस्ट, हेअर कलर स्पेशालिस्ट म्हणून देखील तुम्ही नाव कमावू शकता. फेशियल मसाज तंत्र, केमिकल हेअर प्रोसेस आणि पमिंग, हेअर ट्रिटमेंट रे थेरपी, इलेक्ट्रिकल ब्युटी ट्रिटमेंट, कॉस्मेटॉलॉजी, मेकअप तंत्र, सलून व्यवस्थापन अशा विविध विभागांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ब्युटीशियन होण्यासाठीचे अनेक कोर्सेस दहावी-बारावीनंतर उपलब्ध असून, अगदी तीन दिवसांपासून ते तीन वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम आपल्या आवड व सवडीनुसार उपलब्ध आहेत.
कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सलूनमध्ये काम करू शकता किंवा एखाद्या हेल्थ क्लब वा जिममध्ये असलेल्या ब्युटी क्लिनिकमध्ये काम करू शकता. मॉडेलिंगच्या क्षेत्रात किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करू शकता. तसेच स्वतंत्र व्यवसाय तत्त्वावर काम करता येईल किंवा सुरुवातीला अनुभवासाठी दुसऱ्या एखाद्या मोठय़ा ब्युटी सलूनमध्ये किंवा क्लिनिकमध्ये काम केल्यानंतर स्वत:चा व्यवसायदेखीलर सुरू करता येऊ शकतो.
यशस्वी कॉस्मेटोलॉजिस्ट होण्यासाठी उमेदवाराकडे संभाषणकौशल्य असणे आवश्यक आहे. स्वत: नीटनेटके राहणे व दिसणे तसेच योग्य शरीर-भाषा यादेखील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विशिष्ट तंत्र आणि पुरेसे शास्त्रीय ज्ञान आणि सौंदर्य प्रसाधनातील व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणे अगत्याचे आहे. कॉस्मेटिक सर्जन होण्यासाठी मात्र मेडिकल सर्जरीमधील व्यावसायिक शिक्षण त्याशिवाय प्लास्टिक सर्जरीमधील पदव्युत्तर पदवी आणि कॉस्मेटिक सर्जरीमध्ये स्पेशलायझेशन असणे आवश्यक आह. तसेच सौंदर्यतज्ज्ञ म्हणून काम करताना तुमचा स्वभाव मैत्रीपूर्ण गोड संभाषण, उत्तम श्रोता हे गुण असणे फायद्याचे ठरते. कामाचे स्वरूप ‘बराच काळ उभे राहून करावयाचे काम’ असे असल्यामुळे तुम्ही स्वत: शारीरिकरीत्या तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे.
फॅशन आणि जाहिरातीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांना म्हणजेच सौंदर्यतज्ज्ञ किंवा हेअर स्टायलिस्ट किंवा मेकअप आर्टिस्टना दिवसाला किमान २००० ते ४००० रु. पर्यंत मोबदला मिळतो, तर या क्षेत्रातील अनुभवी लोकांना त्यापेक्षाही जास्त मोबदला मिळतो. नामांकित ब्युटी पार्लरमध्ये किंवा सलून्समध्ये काम करणाऱ्या ब्युटीशियन्स आणि मेकअप आर्टिस्ट यांना अगदी रु. १०,००० पासून पुढे त्या त्या व्यक्तीच्या अनुभवानुसार व कौशल्यानुसार प्रत्येक महिन्याला उत्पन्न मिळविता येते. एखाद्या हेल्थ क्लबमध्ये किंवा मोठय़ा जिममध्ये काम करणाऱ्या फिजिकल प्रशिक्षकांनादेखील उत्तम मोबदला मिळतो. योगा आणि ऐरोबिक प्रशिक्षकांनादेखील या क्षेत्रात उत्तम संधी असून चांगले उत्पन्न आहे. त्याचबरोबर दुसऱ्याला सौंदर्य आणि शारीरिक तंदुरुस्ती बहाल करताना स्वत:ला देखील त्याचा फायदा करून घेता येतो व त्यांचे स्वत:चे व्यक्तिमत्त्वदेखील विकसित होत जाते.
सध्याच्या स्पर्धात्मक युगात जगताना तसेच धावपळीचे, दगदगीचे, ताण-तणावांचे आयुष्य जगत असताना आज सौंदर्य व फिजिकल फिटनेस या दोन्ही गोष्टींची प्रत्येकालाच आवश्यकता आहे. असं म्हणतात की, ‘समारंभात होते ते प्रदर्शन आणि संस्कारात होते ते दर्शन.’ सध्याच्या जगात यशस्वी होण्यासाठी प्रदर्शन व दर्शन दोहोंचीही गरज आहे. तेव्हा सौंदर्यसाधनेतून प्रदर्शन आणि व्यायाम व शारीरिक तंदुरुस्ती यातून म्हणजेच एका उत्तम संस्कारातून स्वत:चे दर्शन घडवून आणल्यास इतरांना मदत करण्याची इच्छा असलेल्या, स्वत:च्या कल्पनाशक्तीला अधिक चालना देण्याची इच्छा असलेल्या आणि या क्षेत्राची आवड असलेल्या तरुण उमेदवारांनी या क्षेत्रात करिअर करायला काहीच हरकत नसावी!

बिग बॉस हेअर अ‍ॅण्ड ब्युटी इन्स्टिटय़ूट
बिल्डिंग नं. ३, सुंदरम, शिंपोली रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२. [www.harishbigboss.com]
श्नेल हंस इंटरनॅशनल स्कूल,
अ-1अ, मातृ आशिष, नेपियन-सी रोड, मुंबई. [www.schnellhans.com]
अकबर पीरभॉय गर्ल्स पॉलिटेक्निक, डॉ. एन. डी. रोड, फोर्ट, मुंबई.
तळवलकर्स ट्रेनिंग अकॅडमी,
दीनदयाळ हॉस्पिटल जवळ, एफ. सी. रोड, डेक्कन जिमखाना, पुणे-४११००४
[www.talwalkar.net]
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ नॅचरोपॅथी
बापू भवन, तारीवाला रोड, पुणे-४११००१
[http://punein.org.]
रामामणी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिटय़ूट, 1107B/1, हरे कृष्णा मंदिर रोड, मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर, पुणे-४११०१६ [www.bksiyengar.com]
व्ही. एल. सी. सी. इन्स्टिटय़ूट
A-18, लजपत नगर-कक, न्यू दिल्ली-११००२४. www.vlccinstitute.com]
स्टाईल डिझायनर सलून
F-31, ईस्ट ऑफ कैलाश, न्यू दिल्ली-११००४८
अल्प्स कॉस्मेटिक क्लिनिक
I-84, सेन्ट्रल मार्केट, लजपत नगर-कक, न्यू दिल्ली [www.beautyalps.com]
सुहास कदम
email: suhaskadam 11@yahoo.in
(9702442462)