Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ मार्च २००९
  ध्येयवाद आणि करिअरही
  भारतीय वनसेवेची आव्हानात्मक परीक्षा
  सब ब्रोकर - उपदलाल
  मायक्रोसॉफ्टमध्ये ‘इंटर्नशिप’
  विदेशातील प्रवेश प्रक्रिया : अर्जासोबतच्या कागदपत्रांची पूर्तता
  र्मचट नेव्हीमधील करिअर
  ‘बीएसएनएल’मधील टेलिकॉम ऑफिसरपदाची तयारी
  विस्तारा स्वप्नांच्या कक्षा..
  सुंदर आणि सशक्त

 

‘स्वदेश’सारख्या चित्रपटातून मानवी स्वभावाच्या या अत्युच्च पैलूवर प्रकाश टाकला गेला आहे. युवकांनो, हे केवळ चित्रपटातच घडते असे अजिबात नाही. प्रत्येक मनुष्याच्या स्वभावात दडलेला, अंतर्मनात लपलेला ‘गांधी’ जेव्हा प्रत्यक्ष प्रकट होऊ इच्छितो, तेव्हा तेव्हा असे अनेक ‘मोहन भार्गव’ आपल्याला दिसू लागतात. डॉ. प्रकाश आमटे, अनिल अवचट, मेधा पाटकर ही अगदी आपल्या नजरेच्या टप्प्यातली उदाहरणे आहेत. मित्र-मैत्रिणींनो, सोशल वर्क किंवा समाजकार्याच्या माध्यमातून अगदी कुणालाही या क्षेत्रात काम करता येणे सहज शक्य आहे आणि हे केवळ ‘लष्कराच्या भाकरी’ भाजण्याचेच काम नसून यातून उत्तमोत्तम करिअर संधी आज उपलब्ध झाल्या आहेत..
‘स्लमडॉग मिलिऑनर’ने ‘धारावी’ हा ब्रॅन्ड आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमोट केला आहे. आठ ऑस्कर्स मिळवणाऱ्या या चित्रपटाने तळागाळातील लोकांच्या जीवनाविषयी सर्वाच्याच मनात जे कुतूहल निर्माण केले त्याला सहानुभूतीची पाश्र्वभूमी आहे.
 

आज अनेक तरुणांना या स्तरातील जनतेसाठी काहीतरी करावे असे नव्याने वाटू लागले आहे. कारण आज अनेक युवक-युवती लहान वयातच बऱ्यापैकी पैसा कमावून स्थिरस्थावर झालेले दिसतात; परंतु ‘यापुढे काय?’ हा प्रश्न त्यांच्या मनातले रितेपण अधिकच ढळकपणे त्यांना जाणवून देतो. हे रितेपण नेमके कशामुळे आहे याची अनेक कारणे असली तरी ‘जॉब सॅटिस्फॅक्शन’ नसणे हे त्यापैकी बहुतांश युवकांच्या बाबतीत खरे कारण आहे.
आपण उत्तम शिक्षण घेतले कारण आपला जन्म सुशिक्षित कुटुंबात झाला व आपल्याला शिक्षणाच्या संधी सहज उपलब्ध होत गेल्या, सुशिक्षित असल्यामुळे उत्तम नोकरी व मनाजोगता पगारही मिळतो आहे. मध्यमवर्गीय विचारसरणीच्या चौकटीनुसार जे आयुष्यात मिळवायचे ते बरेच आधी मिळवून झाले आहे. आता स्थिरस्थावर झाल्याची जाणीव जुनी होत जातानाच ‘मी, माझं कुटुंब, माझी नोकरी, माझं घर’ या पलीकडल्या जगात थोडेसे डोकावून पाहण्याचे धाडस आजच्या युवकांना करावेसे वाटते आहे.
हे ‘पलीकडले जग’ म्हणजेच जेथे जगण्यामरण्याची लढाई सततच लढावी लागते आहे, शिक्षण ही चैन आहे, स्थानिक भाईगिरीतून होणारी प्रचंड पिळवणूक आहे, दोन वेळची पोटाची खळगी भरण्यासाठी क्षणाक्षणाला जीव पणाला लागतो आहे, नशिल्या पदार्थाची ‘पोचवा-पोचवी’ करता करता लहान वयातच लागलेली त्याची चटक आणि त्या अनुषंगाने येणारी व्यसनाधीनता व गुन्हेगारी आहे.. असे बरेच काही!
पण अशा या जगातही अनेक ‘जमाल मलिक’ आहेत जे जिगरबाज आहेत, अनेक लतिका आहेत ज्यांना कष्टाची रोजी-रोटी कमावून सन्मानाने जगायचे आहे, संसार थाटायचा आहे. पण यांना बाहेर पडण्याचा मार्ग मात्र दिसत नाहीये!
आजच्या सुशिक्षित तरुणाला अशांसाठी खूप काही करता येणे शक्य आहे. आपापल्या क्षेत्रात तुफान यशस्वी असणारी भरपूर पैसा, नाव व प्रतिष्ठा कमावलेली मंडळी अचानक सर्व काही सोडून अशा वंचितांच्या सेवेत का बरे स्वत:ला झोकून देतात? ‘स्वदेश’सारख्या चित्रपटातून मानवी स्वभावाच्या या अत्युच्च पैलूवर प्रकाश टाकला गेला आहे. युवकांनो, हे केवळ चित्रपटातच घडते असे अजिबात नाही. प्रत्येक मनुष्याच्या स्वभावात दडलेला अंतर्मनात लपलेला ‘गांधी’ जेव्हा प्रत्यक्ष प्रगट होऊ इच्छितो तेव्हा तेव्हा असे अनेक ‘मोहन भार्गव’ आपल्याला दिसू लागतात. डॉ. प्रकाश आमटे, अनिल अवचट, मेधा पाटकर ही अगदी आपल्या नजरेच्या टप्प्यातली उदाहरणे आहेत.
मित्र-मैत्रिणींनो, सोशल वर्क किंवा समाजकार्याच्या माध्यमातून अगदी कुणालाही या क्षेत्रात काम करता येणे सहज शक्य आहे आणि हे केवळ ‘लष्कराच्या भाकरी’ भाजण्याचेच काम नसून यातून उत्तमोत्तम करिअर संधी आज उपलब्ध झाल्या आहेत.
कुणा मुठभर आदर्शवादी (व्हिजनरी) मंडळींनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करणे एवढेच हे क्षेत्र सीमित राहिले नसून कमालीची व्यावसायिकता यात आलेली दिसते. या क्षेत्रात असलेल्या ‘करिअर प्रॉस्पेक्ट्स’मुळे तसेच सतत जनसंपर्कात राहिल्यामुळे या क्षेत्राला ‘ग्लॅमर’ प्राप्त झाले असून तुमच्यावर ‘मीडिया’चा प्रकाशझोत सतत राहू शकतो. तरुणांना या क्षेत्राचे आकर्षण वाटले आहे याचे हेही एक कारण आहे हे नाकारता येणार नाही.
तसेच वरील कारणांबरोबरच या क्षेत्रात काम करणाऱ्यांना समाजाकडून मिळणारा मानसन्मान, जनमानसात त्यांचे उंचावलेले स्थान व सर्वापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे स्वत:ची स्वत:च्याच मनात उंचावलेली प्रतिमा व त्यातून मिळणारे समाधान हा या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मिळणाऱ्या पगाराबरोबरचा ‘इन्सेंटिव्ह’ आहे.
या क्षेत्राबाबत थोडेसे जाणून घेऊ या!
समाजकार्य म्हणजे काय?
समाजात उद्भवणाऱ्या आर्थिक, सामाजिक व भावनिक समस्यांना समजून घेऊन, त्याविषयी सखोल अभ्यास करून, संशोधन करून त्यावर उपाय शोधणे व या उपायांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारी यंत्रणेचा पाठपुरावा करणे हे साधारणपणे ‘समाजकार्य’ या विषयात अंतर्भूत असते.
सामाजिक समस्या या केवळ धारावी किंवा तत्ंसम स्तरातील मंडळींच्याच असत नाहीत तर अगदी मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय वा उच्चभ्रू स्तरातील मंडळींच्याही समस्या तेवढय़ाच गंभीर असतात. त्या संदर्भातही ‘समाजकार्य’ याअंतर्गत काम केले जाते. या समस्यांना केंद्रिभूत ठेवून जनजागरण मोहिमा राबवल्या जातात.
आज अनेक समस्या समाजापुढे ठाण मांडून बसलेल्या दिसतात. मुले व स्त्रियांवर होणारा अन्याय, व्यसनाधिनता, एचआयव्ही लागण, मानसिक अवनती (डिप्रेशन), अपंगत्व, गरिबी, बेकारी, वृद्धांच्या समस्या, वातावरण, जंगले, पाणी, प्रदूषणविषयक समस्या, प्राण्यांच्या समस्या, दहशतवाद इ. अनेक समस्या सोडवण्यासाठी प्रचंड आर्थिक पाठबळाची व मनुष्यबळाची गरज असते. आर्थिक भार कधी सरकारकडून, कधी कॉर्पोरेट क्षेत्राकडून तर कधी दानशूर व्यक्तींकडून उचलला जातो; परंतु मनुष्यबळ मात्र प्रशिक्षित असले तर अधिक कार्यक्षमतेने काम करू शकते.
निर्मला निकेतन, मरिन लाइन्स
भारतात समाजसेवा व समाज कार्य या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची फौज निर्माण व्हावी व त्यांच्याद्वारे समाजातील गरीब, उपेक्षित जनतेची सेवा घडावी या हेतूने १९५५ साली ‘डॉटर्स ऑफ द हार्ट अ‍ॅण्ड मेरी’ या कॅथॉलिक सेवाभावी संस्थेने या कॉलेजची स्थापना केली.
स्वतंत्र भारताच्या उभारणीत समाजसेवकांचा वाटा मोठा असून त्यांना असे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांच्याद्वारा वैयक्तिक विकासाबरोबरच, राष्ट्रविकास, राष्ट्रप्रेम, संयम व राष्ट्राप्रती समर्पित भाव अशा मूल्यांची जोपासना व प्रसार केला जावा हाही उद्देश या संस्थेच्या स्थापनेमागे होता. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले हे कॉलेज पदवी प्रशिक्षण राबवणारे मुंबईतील हे एकमेव कॉलेज असून पदव्युत्तर, संशोधन असे इतरही अनेक कार्यक्रम संस्थेद्वारे घेतले जातात. कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलींसाठी निवास (होस्टेल) व्यवस्थाही केली गेली आहे. ‘इग्नू’ने आपले सोशल वर्क प्रशिक्षणाचे डिस्टन्स एज्यु. युनिट या कॉलेजशी संलग्न केले आहे. वरील कोर्सेस व्यतिरिक्त इतर ‘शॉर्ट टर्म कोर्सेस’ही या कॉलेजद्वारा घेतले जातात. जसे डिप्लोमा इन सोशल वर्क, सर्टिफिकेट इन अ‍ॅडव्हान्स्ड सोशल रिसर्च मेथडॉलॉजी, सर्टिफिकेट इन थेरपेटिक स्किल्स फॉर हेल्पिंग प्रोफेशनल्स इत्यादी. मुंबईतील वयोवृद्धांच्या सुरक्षेच्या समस्या वाढत चाललेल्या असल्याने त्यांच्यासाठी खास कोर्सही येथे उपलब्ध आहे.
निर्मला निकेतनमध्ये अप्रतिम रिसर्च युनिट, संपन्न ग्रंथालय, ग्रामिण पाश्र्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश लँग्वेज लेबॉरेटरी, कॉम्प्युटर सेंटर, एव्ही युनिट, नेट सेवा, स्टुडंट लोन व स्कॉलरशिप योजना, तसेच इंटरनॅशनल एक्सचेंज प्रॉग्रॅम्स अशा अनेक उपक्रमांची रेलचेल आहे. कॉलेजमधील वातावरण खेळीमेळीचे असून विद्यार्थी- प्राध्यापक संबंध अतिशय मैत्रीपूर्ण आहेत.
कॉलेजने पदवी वा इतर कोर्स पूर्ण करणाऱ्यांसाठी प्लेसमेंट सेलही
सुरू केला आहे. सरकारी, एनजीओज, कॉर्पोरेट, खाजगी, बँका, इन्श्युरन्स कंपन्या, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअर संधी येथे विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात.
अधिक माहितीसाठी खालील साईट बघा www.nirmalaniketancollegeofsocialwork.org
टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस
भारतीय समाज जीवनात उद्भवणाऱ्या समस्या व मुद्दे यांचा सखोल अभ्यास व संशोधन करून त्यावर सुयोग्य उपाययोजना सुचवण्यासाठी मनुष्यबळ निर्माण करणे या उद्देशाने ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’ द्वारा १९३६ साली या संस्थेची स्थापना केली गेली.
समाजशास्त्र विषयाला वाहिलेली ही भारतातली पहिली संस्था आहे. समाजसेवी मंडळींना सुयोग्य प्रशिक्षण दिले गेले तर त्या कामांना अधिक प्राप्त होऊन ती कामे अधिक प्रभावीपणे केली जातील हा दूरदर्शी विचारही या संस्थेच्या स्थापनेमागे होता.
या संस्थेद्वारा भारतातील समाजशास्त्र शाखेच्या अभ्यासाची व संशोधनाची दिशा ठरवली गेली.
१९६४ मध्ये या संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे अभिमत विद्यापीठाचा (डीम्ड युनिव्हर्सिटी) दर्जा मिळाला. तेव्हापासून ही संस्था शैक्षणिक कार्यक्रम व पायाभूत सुविधांच्या संदर्भातील अभ्यास व संशोधन कार्यक्रमाद्वारे अधिकाधिक प्रगतिशील भारताच्या निर्माणामध्ये व्यस्त आहे.
बदलत्या काळानुसार देशाच्या सामाजिक व शैक्षणिक गरजांमध्येही बदल होत असतो. याचे भान ठेवून वरचेवर त्यासंबंधी संशोधन प्रकल्प राबवणे व त्यातून निघालेल्या निष्कर्षांद्वारे शैक्षणिक पद्धतीत तसेच सामाजिक बाबींमध्येही बदल सुचवणे हे कार्य ही संस्था अतिशय इमानेइतबारे व चोखपणे पार पाडीत आली आहे.
पारंपरिक विद्यापीठांच्या संरचनेची व कार्यपद्धतीची चौकट मोडून या संस्थेचे कार्य समाजसेवा प्रशिक्षण कार्यक्रम (पदव्युत्तर), समाजशास्त्र संशोधन व त्याचा समाजाला होणारा उपयोग, समाजातील विविध घटकांना आवश्यक प्रशिक्षण देणे व समाजात शिरून काम करणे, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर राबवल्या जाणाऱ्या योजना व चळवळींसाठी आवश्यक तो डेटाबेस पुरवणे व राष्ट्रीय आपत्ती दरम्यान रिलिफ कॅम्प, रिहॅबिलिटेशन वडिझास्टर मॅनेजमेंट यासारखेही कार्य हाती घेते.
आतापर्यंत या संस्थेने पॉलिसी, नियोजन, कार्यप्रणाली, मानवसंसाधन व विकास, विविध क्षेत्रांतील विकास, ग्रामिण तसेच शहरी भागातील शैक्षणिक विकास, आरोग्य, राष्ट्रीय एकात्मता, मानवाधिकार, औद्योगिक संबंध व विकास या क्षत्रात मोलाची कामगिरी केली आहे. या सर्व क्षेत्रात काम करताना पददलित व गरीब जनता, संघटित तसेच असंघटित कामगार, आदिवासी जनता यांचा प्रामुख्याने विचार केला आहे.
आज भारत सरकारच्या सर्वच मिनिस्ट्रीद्वारा तसेच राज्य सरकारे, आंतरराष्ट्रीय एजन्सीज जसे यूएन द्वारा या संस्थेला सन्माननीय दर्जा दिला गेला आहे. याची कारणे म्हणजे येथील प्रशिक्षण पद्धतीत असणारे कमालीचे स्वातंत्र्य व सर्जनशीलता, शैक्षणिक संस्थांशी असलेले संबंध, उत्कृष्ट संशोधन व समाजाप्रती असलेले जबाबदारीचे भानही आहेत.
अधिक माहितीसाठी webmaster@tiss.edu वर इ-मेल करा.
शर्वरी जोशी
sharvariajoshi@indiatimes.com